‘केडीएमसी'ची नेहरु कप हॉकी स्पर्धा उत्साहात संपन्न
कल्याण : क्रीडा-युवक सेवा, महाराष्ट्र राज्य आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरु कप हॉकी स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत सब ज्युनियर, ज्युनिअर मुले आणि मुलींच्या स्पर्धेचे आयोजन कल्याण पश्चिमेतील डॉन बॉस्को हायस्कुल येथील मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मागदर्शनाखाली करण्यात येऊन स्पर्धेचे उद्घाटन महापालिका क्रीडा-सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
नेहरु कप हॉकी स्पर्धेत ज्युनिअर, सबज्युनिअर मुले आणि मुलींचे एकूण १५ संघ सहभागी झाले होते. १७ वर्ष मुलांच्या अंतिम सामन्यात डॉन बॉक्सो हायस्कुल, कल्याण विरुध्द डॉन बॉक्सो हायस्कुल, डोंबिवली या दोन संघामध्ये अंतिम सामना झाला. यात डॉन बॉस्को हायस्कुल, कल्याण संघ विजयी झाला. त्याचप्रमाणे १७ वर्षाखालील मुलींचा अंतिम सामना रिटा मेमोरिअल, कल्याण विरुध्द डॉन बॉक्सो, कल्याण या दोन संघामध्ये झाला. यात रिटा मेमोरिअल, कल्याण संघ विजयी झाला. १५ वर्षाखालील मुलांच्या संघात डॉन बॉक्सो, कल्याण विरुध्द रिटा मेमोरिअल, कल्याण या संघात अंतिम सामना झाला. यात डॉन बॉक्सो, कल्याण संघ विजयी झाला. सर्व विजेत्या संघांना ट्रॉफी आणि मेडल देऊन गौरविण्यात आले आहे.
यावेळी क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, खेळप्रमुख डॉ. विजय सिंग, रेणुका पिसे, संतोष पाटील, डॉन बॉस्को शाळेचे मुख्याध्यापक, कृष्णा माळी तसेच सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक आणि शिक्षण-क्रीडा विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.