बदलापूर रेशनिंग कार्यालय मुरबाड तहसील कार्यालयामध्ये हलवू नका
भिवंडी : बदलापूर येथील रेशनिंग कार्यालय मुरबाड तहसील कार्यालयामध्ये समाविष्ट करु नका, अशी मागणी खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्न-नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य सरकारडून एक विधानसभा एक रेशनिंग कार्यालय या धोरणाची अमंलबजावणी करण्याचे नियोजन सुरु असून शासनाच्या या धोरणाचा फटका भिवंडी लोकसभा मतदारसंघातील बदलापूर येथील रहिवाशांना बसणार आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार बदलापूर मधील सद्यस्थितीत असलेले रेशनिंग कार्यालय मुरबाड तहसील कार्यालयामध्ये समाविष्ट होणार आहे. मात्र, बदलापूर ते मुरबाड अंतर ३० ते ३५ कि.मी. असून प्रवासाला सुमारे दीड तासापेक्षाही जास्त कालावधी लागतो. त्यातच मुरबाड येथे जाण्यासाठी दळणवळणाच्या हव्या तितक्या सुविधा नसल्याने नागरिकांना केवळ राज्य परिवहन मंडळाच्या बससेवेवर अवलंबून रहावे लागते. तसेच बससेवा एक ते दीड तासाच्या अंतराने असल्याने बदलापूर येथील नागरिकांना नवीन शिधापत्रक घेणे किंवा शिधापत्रिकेच्या आवश्यक कामकाजाबद्दल बदलापूर येथून मुरबाडला जाणे त्रासदायक होणार आहे, असे खा. सुरेश म्हात्रे यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे.
भविष्यात सदर त्रासामुळे मोठा जनक्षोभ उसळण्याची शक्यता असल्याने बदलापूर येथील रेशनिंग कार्यालय मुरबाड तहसील कार्यालयामध्ये समाविष्ट करु नका, अशी मागणी खासदार बाळ्या मामा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे अन्न, नागरी पुरवठा-ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बदलापूर येथे २० ते २५ वर्षापासून अन्न-नागरी पुरवठा विभागाचे रेशनिंग कार्यालय आहे. सध्या या रेशनिंग कार्यालयात धान्यांचा लाभ घेणारे १२,०६८ कार्डधारक लाभार्थी असून या कार्डावर ४८,८१७ लोकसंख्येची नोंद आहे. धान्य न मिळणारे केशरी शिधापत्रिकाधारक १३,७४८ आहेत. त्यांची लोकसंख्या ४७,४९९ इतकी आहे. तसेच शुभ्र शिधापत्रिकाधारक २०,५२५ असून त्यांची लोकसंख्या ७६,७०९ इतकी आहे. असे मिळून एकूण शिधापत्रकधारक ४७,०७१ असून त्यावरील लोकसंख्या १,७६,४४९ एवढी आहे. त्यातच आता बदलापूर शहर मोठ्या प्रमाणात विस्तारत असून येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बदलापूर येथील रेशनिंग कार्यालय मुरबाड तहसील कार्यालयात समाविष्ट झाल्यास बदलापूर मधील नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे बदलापूर येथील रेशनिंग कार्यालय मुरबाड तहसील कार्यालयात समाविष्ठ करु नये, अशी मागणी खासदार सुरेश म्हात्रेे यांनी केली आहे.