२४ तासांचा शटडाऊन; पण १२० तास पाणी नाही

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील श्रीरामनगर परिसर ५ दिवसांपासून पाण्यावाचून तहानलेला असल्याने नागरिकांचा संयम अखेर तुटला आहे. पाणीपुरवठा विभागाने केवळ ‘२४ तासांचा शटडाऊन' असल्याचे जाहीर केले असताना तब्बल १२० तास उलटूनही नळातून पाण्याचा थेंबही न आल्याने संतप्त महिलांनी डोक्यावर रिकामे हांडे घेऊन रस्त्यावर उतरत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. नागरिकांच्या रोषाला पाहून भाजप पदाधिकारी योगेश म्हात्रे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करत आंदोलनाला हिंसक वळण दिले.

उल्हासनगर कॅम्प क्र.४ मधील श्रीरामनगर परिसरात ९ ऑक्टोबर पासून नळ कोरडे पडले आहेत. पाणीपुरवठा विभागाने १० ऑक्टोबर रोजी २४ तासांसाठी शटडाऊन घेतल्याचे सांगितले होते. मात्र, शटडाऊन संपून ५ दिवस झाले तरी पाणीपुरवठा सुरु झाला नाही. त्यामुळे १३ ऑवटोबर रोजी प्रभात गार्डन परिसरातील पाणीपुरवठा कार्यालयासमोर ‘आम्हाला पाणी हवे, आश्वासन नको आणि २४ तास म्हणाले; पण १२० तास झाले' अशा घोषणा देत महिलांनी मोठा हंडामोर्चा काढला. महिलांनी अधिकाऱ्यांना शहरातील इतर भागात पाणी असताना श्रीरामनगरलाच पाणी का नाही? असा थेट जाब विचारला. अधिकाऱ्यांच्या उडवा-उडवीच्या उत्तरांनी वातावरण अधिकच तापले.

दरम्यान, भाजप पदाधिकारी योगेश म्हात्रे यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यासाठी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप करुरून त्यांना रोखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आणि नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. या आंदोलनात योगेश म्हात्रे, भाविका म्हात्रे, बापू सावंत, प्रकाश माळी, निखिल पाटील यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की, सदरचा गेल्या काही महिन्यांतील तिसरा पाण्याचा मोर्चा असून, प्रत्येकवेळी केवळ आश्वासने दिली जातात. यावेळीही प्रशासन जागे न झाल्यास श्रीरामनगर चौकात रस्ता रोको आंदोलन करुन शहर ठप्प करु, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. महिलांच्या डोळ्यातील राग आणि लहान मुलांच्या हातात रिकाम्या बाटल्या घेऊन करण्यात आलेल्या या आंदोलनाने उल्हासनगरमध्ये प्रशासनाच्या निष्क्रियतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

पाच दिवस झाले, तरी पाणी नाही. अधिकारी जागे झाले नाहीत, तर आम्ही तीव्र आंदोलन उभारु.
-योगेश म्हात्रे.

एवढ्या मोठ्या शहरात आम्हाला अजुनही बादलीत पाणी साठवावे लागते, ते लाजिरवाणे आहे.
-भाविका म्हात्रे.

२४ तासांचे शटडाऊन सांगून लोकांची दिशाभूल केली. आता आमचा संयम संपला आहे.
-प्रा. प्रकाश माळी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक