वादळी वारा, संततधार पावसात होर्डिंगचा सहारा नको

पनवेल : सध्याच्या पावसाळी वातावरणात वादळी वाऱ्यासह पाऊस असेल तर अशा परिस्थितीमध्ये मोठमोठ्या होर्डिंगच्या, जाहिरात फलकाखाली किंवा होर्डिंग जवळ उभे राहू नका, असे आवाहन महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पनवेल महापालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांना केले आहे.

महापालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी, विविध आकाराचे आणि उंचीचे जाहिरात फलक उभारण्यात आलेले आहेत. अनपेक्षितपणे मान्सुनपूर्व वादळ, वाऱ्यामुळे असे जाहिरात फलक पडू शकतात. यावर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने यापूर्वीच सर्व जाहिरातदारांना मान्सुनपूर्व कालावधीत सर्व जाहिरात फलकांची प्रत्यक्ष जागेवर जावून तपासणी करणे, त्याचे फाऊंडेशन व्यवस्थित असल्याचे तसेच जाहिरात फलकांच्या लोखंडी सांगाड्यास गंज लागला नसल्याची खात्री करणे, त्यास गंजरोधक रंग लावणे. एखादा जाहिरात फलक धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यास तो तात्काळ निष्कासित करावा. त्यासोबतच जाहिरात फलक वादळ, वारा यामुळे पडणार नाही, यासाठीच्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी मान्सून कालावधीत अशा जाहिरात फलकाच्या खाली अथवा जाहिरात फलकाच्या आसपास थांबण्याचे टाळावे. अथवा आपली वाहने लावू नयेत. टपरी, हातगाडी, पत्राशेड लावून कोणी व्यवसाय करीत असल्यास ते ताबडतोब काढून घ्यावे. जेणेकरुन जीवित अथवा वित्तीय हानी होणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
-मंगेश चितळे, आयुवत-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास २६ मेपासून महागणार