मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर प्रशासक राजवट

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) संचालक मंडळाचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात आल्याने अखेर   मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीवर पुणे संचालक विकास रसाळ यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. १ सप्टेंबर रोजी विकास रसाळ यांनी एपीएमसी प्रशासक पदाचा कार्यभार सांभाळला आहे. ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'वर प्रशासक नेमला जाणार असल्याचे वृत्त ‘आपलं नवे शहर' मध्ये आधीच छापण्यात आले होते.या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाचा  पंचवार्षिक कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२५ रोजी संपुष्टात येणार होता. त्यामुळे  बाजार समितीवर नवीन संचालक निवडीसाठी निवडणूक प्रकिया सुरू करण्याची सूचना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिवांनी ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी (कृषि उत्पन्न बाजार समिती) तथा ठाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना १ जुलै रोजी दिली होती. सदर सूचना देऊन देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन महिन्यात कुठल्याच हालचाली केल्या नसल्याने अखेर मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने बाजार समितीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.पुणे संचालक विकास रसाळ यापुढे प्रशासक म्हणून बाजार समितीचा एक हाती कारभार  सांभाळणार आहेत. याआधीही २०१३ ते फेब्रुवारी २०२० या दरम्यान प्रशासक राजवट बाजार समितीवर होती. दुसरीकडे, वेळेत   मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक न घेता बाजार समितीवर प्रशासक राजवट आणून गाडा हाकण्याची शक्यता एका एपीएमसी संचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर आधीच व्यक्त केली होती. त्याबाबत वृत्त ‘आपलं नवे शहर' मध्ये छापण्यात आले होते.त्यामुळे या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

प्रशासक नेमणुकीवर विकासकांची छाप?

नवी मुंबई शहरात सध्या इमारती पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. त्यातच मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील इमारती देखील धोकादायक झाल्या असून, त्यांचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. त्यापैकी सर्वात प्रथम एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट आवाराचा पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे बाजार समिती आवारातील १७५ एकर जागेवर पुनर्विकास होणार असल्याने विकासकांसह राजकारण्यांच्या नजरा एपीएमसी आवाराकडे आधीच वळल्या आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आता स्थानिक स्वराज्य संस्था प्रमाणे एक हाती सत्ता ठेऊन मनमानी कारभार चालवत निर्णय घेण्याची शक्यता असून, सदर सर्व प्रक्रिया पूर्व नियोजित होती, अशी शंका एका माजी एपीएमसी संचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.

प्रशासक नेमणूक निर्णयाला न्यायालयात आव्हान

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक प्रकिया सुरु करावी, याकरिता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिवांनी ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी (कृषि उत्पन्न बाजार समिती) तथा ठाणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना १ जुलै रोजी सूचना दिली होती. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी  दोन महिने काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण न केल्याने प्रशासक नेमण्याऐवजी विद्यमान एपीएमसी संचालक मंडळाला मुदतवाढ दिली पाहिजे होती. मात्र, तसे न करता  मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीवर थेट प्रशासक नेमण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात आव्हान दिले आहे, अशी माहिती माजी एपीएमसी संचालक बाळासाहेब सोळसकर यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्रीगणेशोत्सव मंडळांकडून झाडांवर विद्युत रोषणाई