दिवसाची सुरुवात सायकलनेच -जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ
ठाणे : सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण, आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणाऱ्या ‘आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन'च्या दुसऱ्या एडिशनच्या जर्सीचे अनावरण ठाणे मध्यवर्ती कारागृह परिसरात १६ ऑक्टोबर रोजी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. तसेच लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्व वयोगटांमध्ये सायकलिंगची आवड निर्माण करणे, तृतीयपंथीयांना समाजाच्या प्रवाहात आणणे आणि विविध सामाजिक उपक्रम सायकलच्या माध्यमातून राबवणे, अशी उपक्रमशीलता अत्यंत प्रशंसनीय आहे. जास्तीत जास्त लोकांनी सायकलचा वापर करावा आणि या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पांचाळ यांनी यावेळी केले.
डॉ. पांचाळ यांनी नव्या जर्सीचे बारकावे पाहून तिच्या डिझाईन, फॅब्रिक आणि रंगसंगतीचेही विशेष कौतुक केले. आरोग्य आणि सामाजिक जबाबदारी या दोन गोष्टींचा उत्तम संगम या संस्थेच्या कार्यात दिसतो, असे त्यांनी नमूद केले.
सदर अनावरण सोहळ्याला ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक राणी भोसले तसेच अमोल कुळकर्णी, अजय भोसले, ज्ञानदेव जाधव, गुरुप्रसाद देसाई, दुर्गा गोरे, आदि सायकलप्रेमी उपस्थित होते. संस्थेच्या ‘फिट राहा, हिट राहा' या घोषवाक्यासह नव्या जर्सीची नोंदणी सुरु असून सायकलप्रेमींनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.