१७ दिवसांत ९४३ मेट्रिक टन आंबा परदेशात निर्यात
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात हापूस आंब्याच्या हंगामाने जोर पकडला असून, परदेशात देखील आंब्याची मागणी वाढत आहे. वाशी येथील ‘महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ'च्या निर्यात सुविधा केंद्रातून ३ एप्रिल पासून हापूस आंबा निर्यातीला सुरुवात झाली असून, अवघ्या १७ दिवसांमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, युरोपियन देशांमध्ये ९४३ मेट्रिक टन आंब्यांची निर्यात करण्यात आली आहे.
देशातील खवय्यांच्या मागणीप्रमाणे परदेशात देखील हापूस आंब्याला मागणी असते.त्यामुळे दरवर्षी परदेशात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा निर्यात केला जातो. यंदा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ तर्फे ४ हजार मेट्रिक टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ९४३ मेट्रिक टन हापूस आंबा निर्यात झाला आहे . यामध्ये हापूस आणि केशर आंब्यांचा समावेश असून, आंबा निर्यातीने वेग घेतला आहे. वाशी येथील ‘राज्य कृषि पणन मंडळ'च्या सुविधा केंद्रात आंब्यांची तपासणी होऊन बॉक्स पॅकिंगमधून आंबा निर्यात केला जातो. त्यामुळे निर्यातीचा आंबा आयातदार देशांकडून स्वीकारण्यास मदत होते. परदेशात आंबा निर्यात करण्यासाठी निर्यातदारांना नियमांच्या चौकटीतून आंबा निर्यात करावी लागते. आंबा निर्यातीकरीता आंब्याचा आकार, वजन आणि दर्जा महत्वाचा असतो. आखाती देश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कुवेत, युरोपियन देश, जपान, साऊथ कोरिया याठिकाणी आंबा निर्यात होते. वाशी मधील महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या प्रमुख निर्यात सुविधा केंद्रांमधून यंदा ४ हजार मेट्रिक टन आंबा निर्यात करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, ४ एप्रिल पासून हापूस आंबा निर्यातीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक देशात आंबा निर्यात करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. अमेरिका मध्ये आंबा निर्यात करण्यासाठी त्यावर दोन प्रकारे प्रकिया करण्यात आली. उष्णजल प्रक्रियेत ४६ अंश सेल्सियस तापमानात ६० मिनिटे आंबा गरम पाण्यात ठेवला जातो. त्यामुळे आंब्यातील फळमाशी असल्यास नष्ट होते.
भारतातील एकूण ५सुविधा केंद्रांपैकी महाराष्ट्रातील वाशी येथील ‘राज्य कृषि पणन मंडळ'चे व्ही किरण सुविधा केंद्र, व्हीपीएफ सुविधा केंद्र तसेच व्हीएचटी सुविधा केंद्र येथून सर्वाधिक आंबा प्रक्रिया करुन निर्यात करण्यात आलेली आहे. तसेच चालू हंगामामध्ये दक्षिण भारतातील तसेच गुजरात मधील जास्तीत जास्त व्यापारी या सुविधेच्या फायदा घेत आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच उद्दिष्टापैकी ९४३ मेट्रिक टन आंबा निर्यात झाली आहे. दक्षिण भारतातील आंध्रपदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातील सुमारे दहा ते पंधरा निर्यातदारांनी त्यांचा आंबा व्ही किरण प्रक्रियेसाठी ‘राज्य कृषि पणन मंडळ'च्या व्ही किरण सुविधा केंद्रात आणला आहे.
वाशी येथून निर्यात आंबा (मेट्रिक टन)
अमेरिका - ४६० मेट्रिक टन, ऑस्ट्रेलिया -१६.६५ मेट्रिक टन, न्यूझिलंड - १२.२०२ मेट्रिक टन, युरोपीयन देश - ११७. २ मेट्रिक टन, युके - ३३७.५०८ मेट्रिक टन. एकूण - ९४३.५६ मेट्रिक टन.