नवी मुंबई महापालिका भरती प्रक्रिया
नमुंमपा आयुक्तांचे सर्व पोलीस अधिक्षकांना पत्र
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मध्ये ६६८ पदांकरिता सुरु असलेल्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लेखी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. या भरती प्रक्रियेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना आणि विविध शहरातील पोलीस आयुक्तांना सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या वेळी चोख पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबाबत सूचित केले आहे.
नवी मुंबई महापालिका मध्ये ६६८ पदांकरिता सुरु असलेल्या भरती प्रक्रियेसाठी महापालिकाकडे ८४,७७४ अर्ज प्राप्त झाले आहेत. परिणामी, उमेदवारांना नोकरीस लावून देतो असे खोटे आमिष दाखवून काही समाजकंटक उमेदवारांची दिशाभूल करण्याची आणि पैशाची मागणी करून आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना आणि विविध शहरातील पोलीस आयुक्तांना परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या वेळी पोलीस चोख पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.
तसेच ‘नमुंमपा'च्या सदर भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही फसवणुकीची तक्रार राज्यातील पोलीस ठाण्यांना प्राप्त झाल्यास सदर तक्रार दाखल करुन योग्य कार्यवाही करण्याचे देखील आयुक्तांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. सदर भरती प्रक्रिया अंतर्गत होणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्ताकरिता होणारा खर्च नवी मुंबई महापालिका देणार असल्याचे आयुक्त शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई महापालिकेतील ६६८ पदांकरिता सुरु असलेल्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने लवकरच महापालिका द्वारा महाराष्ट्रातील सर्व जिह्यात लेखी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी सुरु झाली असून जिल्हानिहाय परीक्षा केंद्रांची संख्या, परीक्षेचा दिनांक, वेळ आणि आवश्यक मनुष्यबळ स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
या भरती प्रक्रियेत ३० संवर्गातील ६६८ पदांचा समावेश असून यामध्ये सव्रााधिक पदे लिपीक टंकलेखक (१३५ पदे) असून त्याखालोखाल स्टाफ नर्स-नर्स मिडवाईफ (जीएनएम) ची (१३१ पदे ), लेखा लिपीक (५८), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (५१), ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (एएनएम) ची (३८), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (३५), कक्ष सेवक (वॉर्डबॉय २९), कक्ष सेविका-आया (२८), शस्त्रक्रियागृह सहाय्यक (१५), आरोग्य सहाय्यक महिला (१२), औषध निर्माता (१२), वैद्यकीय समाजसेवक (१५) आदि महत्त्वपूर्ण पदांचा समावेश आहे.
लवकरच लेखी परीक्षा...
दरम्यान, महापालिका राबवत असलेल्या भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद लाभल्यामुळे ८४,७७४ उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याचे शिवधनुष्य महापालिकेला पेलावे लागणार आहे. त्याकरिता महापालिका प्रशासन कार्यरत झाली असून सदर पदभरती प्रक्रिया काटेकोर आणि पारदर्शक पध्दतीने राबविण्याचे आव्हान नवी मुंबई महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी पडू नये. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी ‘नमुंमपा'च्या अधिकृत वेबसाईट https://www.nmmc.gov.in यावर तसेच महापालिकेच्या अधिकृत फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्राम पेजला भेट देऊन अधिकृत माहिती जाणून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.