होळी-धुळवडीत १७२ नशेबाज वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध वाहतूक उपविभागात वाहतूक पोलिसांनी होळी आणि धुलिवंदनाच्या अनुषंगाने ५ परिमंडळात बेशिस्त वाहन चालकावर कारवाई करण्याकरिता लावलेल्या सापळ्यात १७२ नशेबाज अडकले. त्यांच्यावर गुन्हा आणि दंडात्मक कारवाई केल्याची माहिती वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिली. तर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट ४१३ आणि २७४ ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयात वाहतूक विभागातील ७०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नाकाबंदीसाठी तैनात करण्यात आले होते. होळी-धुलिवंदन कालावधीत मद्य किंवा नशा करुन वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची व्यूहरचना वाहतूक विभागाने केली होती. ठाणे पोलीस आयुवतालय अंतर्गत ५ परिमंडळात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदीत नशापान किंवा मद्यप्राशन करुन दुचाकी, चारचाकी वाहने चालविणाऱ्या तब्बल १७२ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

ठाणे वाहतूक शाखेच्या पथकाने शहरात मोक्याच्या ठिकाणी लावलेल्या बंदोबस्त आणि नाकाबंदीत ठाणे उपवाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत ९ नशेबाज, ८५ विना हेल्मेट वाहन चालविणारे तर १५ ट्रिपल सीट प्रकरणी कारवाई केली. वागळे विभागाने १८ नशेबाज आणि अंमली पदार्थ सेवन करणारा १ अशा १९ जणांवर कारवाई करीत ९९ विनाहेल्मेट आणि १२ ट्रिपल सीट प्रकरणी कारवाई केली. भिवंडी विभागाने २० नशेबाजांवर तर ४८ जणांवर विनाहेल्मेट आणि १६ जणांवर ट्रिपल सीट प्रकरणी कारवाई केली. कल्याण विभागाने १८ नशेबाज आणि १ अंमली पदार्थ सेवन करणारा अशा १९ जणांवर कारवाई केली. उल्हासनगर विभागाद्वारे वाहतूक पोलिसांनी २४ नशेबाजांवर, तर ३२ विनाहेल्मेट आणि १६० ट्रिपल सीट प्रकरणी कारवाई केली.

वाहन चालकांनी वाहतूक विभागाचे नियम पाळावे. यामुळे अपघात होणार नाहीत जीवितहानी होणार नाही. तसेच वाहतूक विभागाला सहकार्य होईल. आपली कुणीतरी घरी वाट पाहतो आहे. याची जाणीव वाहन चालकांनी ठेवावी. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करु नये. नशेया अंमलाखाली वाहन चालवू नये. सुरक्षित प्रवास करावा आणि सुरक्षित रहावे.
-पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त-वाहतूक, ठाणे पोलीस आयुक्तालय. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतून विमाणोड्डाणाला जून २०२५ चा मुहूर्त