चला, पाणी वाचवूया-भविष्य सुरक्षित करुया
डोंबिवलीः कल्याण-डोंबिवली महापालिका (पर्यावरण विभाग) यांच्या सहकार्याने मिलापनगर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन, सुदर्शननगर निवासी संघ-एमआयडीसी डोंबिवली, शिवाई बालक मंदीर शाळा, के. रा. कोतकर माध्यमिक विद्यालय (ज्ञानमंदीर शाळा), एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप, पर्यावरण दक्षता मंडळ, ऊर्जा फाउंडेशन, श्री लक्ष्मीनारायण संस्था आणि विवेकानंद सेवा मंडळ (स्वच्छ डोंबिवली अभियान) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च रोजीच्या ‘जागतिक जल दिन'चे औचित्य साधून ‘पाण्याचे महत्त्व आणि पाणी वापर' याविषयी जनजागृतीसाठी २१ मार्च रोजी डोंबिवलीमध्ये जल सुरक्षा दिंडी काढण्यात आली. यावेळी ‘चला, पाणी वाचवूया-भविष्य सुरक्षित करुया' अशी घोषणा देण्यात आली.
शिवाई बालक मंदिर शाळा, निवासी बस स्टॉप, लक्झुरिया बिल्डिंग रस्ता, श्री गणेश मंदिर, शिवप्रतिमा हॉल, शिवाई बालक मंदिर शाळा, के. रा. कोतकर माध्यमिक विद्यालय, कावेरी चौक, सुदर्शन नगर उद्यान, साईबाबा मंदिर, आजदे - औदुंबर कट्टा, सिस्टर निवेदिता शाळा, चतुरंग बिल्डिंग, मिलापनगर बस स्टॉप, ओंकार शाळा रस्ता, के. रा. कोतकर माध्यमिक विद्यालय या मार्गांवर विद्यार्थ्यांनी जलदिंडी काढली. या ‘जलसुरक्षा दिंडी'मध्ये शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
‘जलसुरक्षा दिंडी'मध्ये शिवाई बालक मंदिर शाळा आणि के. रा. कोतकर माध्यमिक विद्यालय मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. पाणी वाचवणे आपली सामुहिक जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या परिसरात होणाऱ्या या जनजागृती ‘जलदिंडी'मध्ये सहभागी व्हा आणि पाण्याच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यास मदत करा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले होते. सदर ‘जलसुरक्षा दिंडी'आयोजनासाठी सुरेखा जोशी, वर्षा महाडिक, हर्षल सरोदे आदिंनी विशेष मेहनत घेतली.