पंचतारांकित हॉटेलमध्ये महापालिका अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महापालिकतील ढिम्म अधिकारी यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून नवी मुंबईतील कोर्ट यार्ड या पंचतारांकित हॉटेल मध्ये किमान १०० च्या वर अधिकाऱ्यांसाठी ११ एप्रिल २०२५ रोजी दिवसभर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याचा तीव्र निषेध ‘मनसे'चे प्रववते तथा नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी नोंदवला आहे.
हॉटेलचा खर्च, जेवणाचा खर्च बहुदा अधिकारी यांच्या पगारातून जाणार आहे की महापालिकेच्या तिजोरीतून? असा खडा सवाल गजानन काळे यांनी यानिमित्ताने महापालिका प्रशासनाला विचारला आहे. २५० कोटी रुपये खर्च करुन बनवण्यात आलेले ‘नमुंमपा'चे मुख्यालय येथे मोठे सभागृह असताना देखील पंचतारांकित हॉटेल मध्ये कार्यशाळेचा घाट का घातला गेला? असा सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.
नवी मुंबई महापालिकामध्ये वेळेवर कंत्राटी कामगाराचे वेतन मिळत नाही. राज्य सरकारकडे बहिणींना द्यायला पैसे नाहीत, अशा वेळी महापालिकाने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उधळपट्टी करणे कितपत योग्य आहे. महापालिका आयुक्त नेहमीप्रमाणे याचेही उत्तर देणार नाहीतच; मात्र आम्ही करदात्यांच्या पैशांचा हिशोब मागणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या आयुक्तांना आपणही जाब विचारणार आहात की नाही? असा प्रश्न गजानन काळे यांनी यावेळी उपस्थित केला. सर्वसामन्यांच्या सरकारमधे जनता उपाशी आणि अधिकारी तुपाशी अशी अवस्था झाली आहे, अशी जळजळीत टीका देखील गजानन काळे यांनी केली.
नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि बेकायदेशीररित्या काढण्यात आलेल्या सहलीमुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यायला ‘नमुंमपा'कडे पैसे नाहीत आणि तशी आयुक्तांची मानसिकता देखील दिसत नाही. ४० दिवस उलटून अजून सहल चौकशी समितीचा अहवाल जाहीर करण्यात आला नाही. आता अशा कार्यशाळा घेवून अधिकारी कार्यक्षम होतील, असा गोड गैरसमज आयुक्तांचा झालेला दिसत आहे.
-गजानन काळे, प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष-मनसे.