होल्डींग पाँडचे काम अपूर्ण; बेलापूर विभाग पाण्याखाली
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये बेलापूर विभागात सेक्टर-१२ येथे असलेले सिडको निर्मित पावसाळी जलउदंचन केंद्र (पंप हाऊस) ३५ ते ४० वर्षे जुने असून नवीन पंपहाऊसचे भूमीपुजन होऊन देखील वर्षे झाले. परंतु, अद्यापपर्यंत काम पूर्ण न झाल्याने नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे नवी मुंबईत विषेशतः सीबीडी-बेलापूर विभागात सखल भाग असलेल्या सेक्टर-४, ५, ११ येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच सेक्टर-४, ५ मध्ये व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ३ जून रोजी सुध्दा जोरदार पाऊस बरसल्याने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यापार्श्वभूमीवर ४ जून रोजी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील आणि सीबीडी येथील व्यापारी तसेच महापालिका शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर संबधित अधिकाऱ्यांसमवेत बेलापूर येथील होल्डींग पाँडचा पाहणी दौरा केला. तसेच सदर होल्डींग पाँडचे काम लवकरात लवकर केले नाही तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी सूचना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली. त्याचबरोबर अवकाळी पाऊस मे महिन्यातच आल्याने संबंधित परिस्थिती महाराष्ट्रभर उद्भवली. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने येत्या पावसाळ्यात अशी परिस्थिती परत येवू नये याकरिता खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी शहर अभियंता आरदवाड यांना सूचित केले.
गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रभर अवकाळी पाऊस झाल्याने संपूर्ण नदी, नाले, तुडुंब फुल्ल झाले. संपूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली गेले होते. परंतु, बेलापूर विभाग पाण्याखाली गेला असल्याची बातमी प्रसारित केल्या गेल्या. वास्तविक पाहता संपूर्ण नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, रबाले, कोपरखैरणे, वाशी सह इतर विभागही पाण्याखाली गेले असताना फक्त बेलापूर विभागालाच लक्ष करण्यात आले. त्याचबरोबर सीबीडी मधील होल्डींग पाँडचा काम प्रगतीपथावर सुरु आहे. परंतु, होल्डींग पाँडच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण देखील केले गेले आहे. त्यामुळे या अतिक्रमणांवर येत्या ४ दिवसात कारवाई करण्याची मागणीही आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी केली.
सदर पाहणीप्रसंगी गोपाळराव गायकवाड, प्रमोद जोशी, मनोहर बाविस्कर, संजय ओबेरॉय, जयदेव ठाकूर, लाली, तन्सुख जैन, हस्तीमल जैन, नानजी भाई, करसन जैन, लक्ष्मीचंद जैन, मनीष बिजलानी, करणानी, चंद्रकांत कोळी, भाग्यवान कोळी, सुजित कोळी, कल्पेश कुंभार, निलेश पाटील, निलेश डोंगरे, आरती राऊळ, देवयानी मुकादम तसेच बेलापूर विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे, कार्यकारी अभियंता वाघचौरे, उपभियंता पंढरीनाथ चौरे, कनिष्ठ अभियंता अविनाश यादव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.