शासकीय प्रसुती रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांचे हाल
उल्हासनगर : उल्हासनगर येथील कॅम्प-४ येथील शासकीय प्रसुती रुग्णालयात अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यामुळे रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळत नाहीत, असा आरोप ‘मनसे'ने केला आहे. दरम्यान, शासकीय रुग्णालयाचा कारभार सुधारला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ‘मनसे'तर्फे रुग्णालय प्रशासनाला निवेदनातून देण्यात आला आहे.
शासकीय प्रसुती रुग्णालयात येणारे रुग्ण गरीब किंवा सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. असे रुग्ण या रुग्णालयात येण्याचे कारण म्हणजे त्यांना खासगी रुग्णालयाचे दर परवडत नाही. मात्र, उल्हासनगर मधील शासकीय प्रसुती रुग्णालयात डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णाला परत जावे लागते किंवा कर्मचाऱ्यांना उपचार करायचे नसल्याने त्यांना परत पाठवले जाते, असा गंभीर आरोप ‘मनसे'ने केला आहे.
या रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने काही खासगी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, सदर डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नसतील, तर अशा डॉक्टरांचा उपयोग काय? डॉक्टर उपलब्ध नसून त्यांची बिले बनवली जातात. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी गैरवर्तन केले जाते. रुग्णांना औषध वितरण केंद्रांवर तासन्तास थांबावे लागते, तर रुग्णवाहिका सेवाही अनेकदा उपलब्ध नसते. जन्म दाखल्याच्या नावावर बेकायदेशीर वसुली आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून रुग्णांकडून पैसे उकळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
याव्यतिरिक्त रुग्णालयात स्वच्छतेच्या गंभीर समस्या आहेत. ज्यामुळे रुग्ण आणि नवजात बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभागातील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नसल्याने संसर्ग पसरण्याचा धोका आहे. ओपीडीच्या वेळाही अनियमित असल्याने रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, असे अनेक गंभीर आरोप ‘मनसे'ने निवेदनातून केले आहेत.
या संदर्भात ‘मनसे'च्या वतीने रुग्णालयाचा कारभार लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावा, अन्यथा मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा ‘मनसे'चे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख व शहराध्यक्ष संजय घुगे यांनी वैद्यकीय अधिकारी दोडे यांना दिला आहे. याप्रसंगी निवेदन देताना उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश शेठपलानी, मनविसे शहराध्यक्ष वैभव कुलकर्णी, संघटक अशोक गरड, विभाग अध्यक्ष नटवर वसिता, शाखा अध्यक्ष विशाल परदेशी, संदीप गरड, नवीन पवार यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.