पर्यावरणाला हानी; आरएमसी प्लांट बंद करण्याचे आदेश
भाईंदर : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागूनच असलेल्या काशीमिरा परिसरातील माशाचा पाडा या निसर्गरम्य भागातील इको सेन्सेटिव्ह झोन मधील तसेच २०० मीटर परिसरात नागरी वस्ती आणि शाळा असलेल्या ठिकाणीच बेकायदेशीररित्या चालणाऱ्या ३ आरएमसी प्लांट (सिमेंट काँक्रीट रेडी मिक्स प्लांट ) त्वरित बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत. त्याचबरोबर या प्लांटला वीजपुरवठा करणाऱ्या अदानी पॉवर कंपनीला प्लांटचा वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश दिले आहेत.
मिरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या आरएमसी प्लांट सुरु आहेत. त्यामुळे शहरातील प्रदुषणामध्ये वाढ होताना दिसत आहे. एकीकडे स्वच्छ हवा आणि जल प्रदुषण रोखण्यासाठी शासन विविध प्रकारे योजना राबवत असताना मिरा भाईंदरमध्ये वेगळे चित्र आहे. शहरात सर्रासपणे मातीचे डेब्रीज, आरएमसी पलांटच्या गाड्या रस्त्यावर भरधाव वेगाने धावतात. परिणामी, रस्त्यावर माती आणि सिमेंट पडलेले असते. यामुळे अनेक अपघात देखील होत आहेत.
शहरातील विकासक, अवैध माती भराव करणारे भूमाफिया आणि आरएमसी प्लांट धारक यांच्यामुळे प्रदुषणात वाढ होेत आहे. याकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मिरा-भाईंदर महापालिका अधिकारी मात्र डोळेझाक करीत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरी वस्ती, ईको सेन्सेटिव्ह झोन, सीआरझेड क्षेत्रात आरएमसी प्लांटना परवानगी देता येत नाही. त्यामुळे असे प्लांट अनधिकृत ठरले आहेत. तसेच त्यामुळे लहान मुले ,ज्येष्ठ नागरिक यांच्या दमा, डोळ्यांचे आजार, फुपफुसाचे आजार याला कारणीभूत ठरत आहेत. याचा विचार करुन महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी आरएमसी प्लांट त्वरित बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर त्यांना वीजपुरवठा करणाऱ्या अदानी पॉवर कंपनीला प्लांटचा वीजपुरवठा खंडीत करण्याचे सुध्दा आदेश दिले आहेत.