ठाणे जिल्ह्यातील ५ रेल्वे स्थानकांना लवकरच नवी झळाळी

नवी मुंबई : भारतीय रेल्वे प्रशासन तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्टेशन' योजना अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा, शहाड, दिवा, बेलापूर आणि डोंबिवली या रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यामुळे या रेल्वे स्थानकांना लवकरच नवी झळाळी मिळणार आहे.

‘अमृत भारत स्टेशन' योजना अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई मध्ये पत्रकार परिषद मध्ये दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

‘अमृत भारत स्टेशन' योजनेत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर, डोंबिवली या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. ‘अमृत भारत स्टेशन' योजनेमुळे रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्‌स, स्वच्छतागृहे, लिपट्‌स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे, असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील पुनर्विकासासाठी निवडलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये टिटवाळा स्टेशन (निधी : २५ कोटी रुपये), शहाड स्टेशन (निधी : ८.४ कोटी रुपये), दिवा स्टेशन (निधी : ४५ कोटी रुपये), बेलापूर स्टेशन (निधी : ३२ कोटी रुपये) आणि  डोंबिवली रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.

‘अमृत भारत स्टेशन' योजनेमुळे ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना निश्चितच चांगला अनुभव मिळेल, असा विश्वास  आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कल्याणसारख्या ‘ज्ञान केंद्र'ची राज्यभरात उभारणी