सापाबद्दलचे समज गैरसमज
आपल्या भारतीय संस्कृतीत सण खूप महत्वाचे आहेत.प्रत्येक महिन्यात विविध सण येत असतात. ते आपण उत्साहाने साजरे करत असतो. विविध सण हे शेती, निसर्ग, निसर्गातील वन्य प्राणी, पक्षी, याच्याशी निगडित आहेत. यात आदर, पूज्यभाव, कृतज्ञता दिसून येते. पण हे सण साजरे करत असताना त्यातील खरे महत्व, त्याचे वैज्ञानिक कारण समजून घेतले पाहिजे.
जसे की नागपंचमी वेळी सापाचे शास्त्रीय महत्त्व, निसर्गातील स्थान, त्याच्याबद्दल असणारे समज गैरसमज समजून घेतले पाहिजेत.यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वतीने विविध शाळा, कॉलेज,सोसायटी येथे र्सपविज्ञान कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यात सापाचे विविध प्रकार,त्याचे पर्यावरणातील,अन्नसाखळीतील स्थान,त्याचे विविध अवयव, सापाबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धा समज, गैरसमज याबद्दल पीपीटीद्वारे माहिती दिली जाते.यामुळे आज मोठया प्रमाणात विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकामध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. तसेच विविध संस्था,र्सपमित्र,हाफकीन इन्स्टिटयूट, शासन ही जागरूकतेसाठी प्रयत्न करत आहे.नागपंचमी निमित्त आपण सापाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेऊ या व आपल्या मनात असणारे गैरसमज दूर करूया.
सापाबद्दल समज गैरसमज
१)साप दुध पितो? : साप दुध पितो हा गैरसमज असून साप हा मांसाहारी प्राणी आहे दुध पिल्यास त्याला श्वसनाचा त्रास होऊ शकतो. बरेच दिवस त्याला पाणी दिले जात नाही त्यामुळे तो पाणी समजून दूध पितो.
२)साप पुंगीच्या तालावर डोलतो, नाचतो ? : सापाला बाह्यकर्ण म्हणजे कान नसतात. त्यामुळे संगीत ऐकण्याचा प्रश्न येत नाही.पुंगी वाजवताना जे वायब्रेशन होते त्याला साप प्रतिसाद देतो व हालचाल करतो.आपल्याला मात्र ते नाचतोय असे वाटते.
३) साप डूख धरतो, पाठलाग करतो, बदला घेतो? : सापाचा मेंदू अविकसित आहे. त्याची स्मरणशक्ती,बुद्धी, कमकुवत असते.सापांना तीन फुटापेक्षा जास्त अंतरावरचे दिसत सुध्दा नाही.सापाला विचार क्षमताच नसल्यामुळे तो कुठल्याही व्यक्तीला ओळखू शकत नाही.त्यामुळे साप डुक धरतो किंवा बदला घेतो ही गोष्ट अशास्त्रीय आहे.
४)साप खजिना/धनसंपतीचे रक्षण करतो? : कथा, चित्रपट किंवा मालिकांमध्ये असे चित्रित करून दाखवले जाते. पण वास्तवात तसे पण कुठेही नसते.
५)सापाच्या डोक्यावर नागमणी असतो? सापाच्या/नागाच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचा नागमणी नसतो. काही वेळा डोक्यावर काचेचे खडे चिकटवले जातात.
६)मेलेल्या सापावर रॉकेल टाकल्यास तो जिवंत होतो? : नुकत्याच मारलेल्या सापावर रॉकेल टाकल्यास जखमेस वेदना होतात त्यामुळे तो वळवळ करतो ही हालचाल काही क्षण असते.
७)साप मारल्यावर त्याच्या रक्तातून अनेक पिल्ले तयार होतात? : सापाचे प्रजनन दोनच मार्गाने होते अंडज आणि पिलज. त्यामुळे सापाच्या रक्तातून पिल्ले तयार होत नाहीत.
८)केवडा रातराणी झाडा जवळ सुंगाधासाठी साप येतात? रातराणी केवडा यांच्या सुगंधाने कीटक आकर्षित होतात. ते कीटक खाण्यासाठी पाल, सरडे, बेडूक येतात हे पाल, सरडे ,बेडूक खाण्यासाठी खाण्यासाठी अशा ठिकाणी साप येतात.
९) सर्वच साप विषारी असतात?: नाही. सर्वच साप विषारी नसतात. सापाचे विषारी (नाग, मन्यार, घोणस, फुरसे) निम विषारी(मांजऱ्या, हरणटोळ, रेती सर्प, उडता सोनसर्प) बिनविषारी (अजगर,नाणेटी, दिवड,धामण,वाळा,) मांडूळ असे तीन प्रकार पडतात.
असे विविध प्रकारचे सापाबद्दल गैरसमज असून या गैरसमजामुळे अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या आहेत यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात जागृती होणे गरजेची आहे.
-प्रदीप कासुर्डे