शिवसैनिकांचे दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन
कल्याण: ‘बकरी ईद'निमित्त कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा माता मंदिर तात्पुरते बंद करण्यात आले आहे. ज्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी निषेध व्यक्त केला. भाविकांना मंदिरात घंटा वाजवण्यास आणि दर्शन घेण्यास मनाई केल्याने संताप व्यक्त होत होता.
आजही प्रशासन एका विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावनांची काळजी घेत दुसऱ्या समुदायाच्या हक्कांचे उल्लंघन करत असल्याचे यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले. घडल्या प्रकाराचा निषेध करण्याकरिता ७ जून रोजी ठाकरे आणि शिंदे यांच्या ‘शिवसेना'च्या दोन्ही गटातील शेकडो शिवसैनिक दुर्गाडी किल्ल्याजवळ जमले होते. या आंदोलनावेळी शिवसेना (शिंदे गट) कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक महेश पाटील, अरविंद मोरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
‘घंटानाद आंदोलन'ची परंपरा शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ३९ वर्षांपासून सुरू आहे. ‘बकरी ईद'ला येथील मंदिराला टाळे लावले जाते. शिवसैनिकांनी किल्ल्यावर पोहोचण्याकरिता खूप प्रयत्न केले. पण, पोलिसांनी आम्हाला जाऊ दिले नाही. त्यामुळे मी प्रशासनाचा निषेध करतो, अशा शब्दात माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
दरम्यान, बकरी ईद दिवशी मुस्लिम बांधव किल्ला परिसरात नमाज अदा करतात. त्यामुळे संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी किल्ल्याकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत. निदर्शकांना रोखण्यासाठी लाल चौकी परिसरात पोलिस बॅरिकेडस् लावले होते. बकरी ईद असल्याने परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठीही धार्मिक स्थळे आहेत आणि दोघांनीही त्यांचे हक्क सांगितले आहेत. सदर प्रकरण न्यायालयातही सुरू आहे. ‘बकरी ईद'निमित्त मुस्लिम समाजाचे लोक सकाळी नमाज पठण करतात आणि हिंदूंना मंदिरात जाऊन आरती आणि पुजा करण्यापासून रोखले जाते. दोन्ही धर्मांमध्ये कोणताही वाद होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्तात हिंदूंना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखतात. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ‘शिवसेना'ने १९८६ मध्ये आंदोलन सुरु केले. तेव्हापासून दरवर्षी ‘बकरी ईद' दिवशी शिवसैनिक दुर्गाडी किल्ल्यासमोर निदर्शने करीत आहेत.