डोंबिवलीकर ३ मयतांना मुख्यमंत्र्यांकडून श्रध्दांजली अर्पण
ठाणे : जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीतील ३ जणांना २३ एप्रिल रोजी रात्री हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रुंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला.
अतिरेक्यांच्या या पूर्वानियोजित आणि घृणास्पद हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. मात्र, जनतेत दहशतवादाविरुध्द तीव्र असंतोष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या डोंबिवली शहरातील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस सह-आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी घटनास्थळी भेट देऊन पिडीतांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. नागरिकांनी एकापाठोपाठ एक येत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्याने वातावरणात कमालीची शांतता आणि दुःख पसरले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान संतप्त नागरिकांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सर्व पाकिस्तानी उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली. अनेकजण भावुक होऊन फडणवीस यांना म्हणाले, फक्त तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता. रात्री ९ च्या सुमारास फुलांनी सजलेल्या वाहनांमधून या तिघांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. तत्पूर्वी हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत मोठी अंत्ययात्रा काढण्यात आली. भावपूर्ण श्रद्धांजली असे मोठे बॅनर वाहनावर लावण्यात आले होते, ज्यावर मृतांची नावे आणि छायाचित्रे होती. अंत्ययात्रा डोंबिवली मधील डोमिनोज पिझ्झा, एम. जी. रोड, डोंबिवली स्टेशन (पश्चिम), कोपर रोड, कोपर ब्रिज, टंडन रोड, आर. पी. रोड या प्रमुख मार्गांवरुन नेण्यात येऊन शेवटी शिव मंदिर रोडवरील स्मशानभूमीत सदर तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिक यावेळी आपल्या भावनांना आवरु शकले नाहीत.अनेकजण स्तब्ध उभे होते, तर काहींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. या घटनेमुळे समुदायाला बसलेला मोठा मानसिक आघात वातावरणात स्पष्टपणे जाणवत होता.
यापूर्वी, जेव्हा तिघा जणांचे पार्थिव विमानतळावर पोहोचले, तेव्हा अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी राज्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.