इकोफ्रेंडली सजावटीसाठी कपडा पुनर्प्रक्रिया केंद्रातील शोभिवंत साहित्य वापरा
नवी मुंबई : केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत ‘वस्त्र समिती'च्या वतीने नवी मुंबई महापालिका समवेत वस्त्र पुर्नप्रक्रिया सुविधा प्रकल्प (टेक्सटाईल रिसायकलिंग फॅसिलिटी) देशात पहिल्यांदाच राबविला जात असून या अंतर्गत सुरु असलेल्या कार्यवाहीची पाहणी करीत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने महत्वाच्या मौलिक सूचना केल्या.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत ‘केंद्रीय वस्त्र मंत्रालय'चे संचालक तपनकुमार राऊत, महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त डॉ. अजय गडदे आणि स्मिता काळे, बेलापूर विभाग सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, प्रकल्प संचालक प्रकाश सैनी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
सदर प्रकल्पाद्वारे टाकाऊ (वेस्ट) कपड्यांवर प्रक्रिया करुन त्यांचा पुनर्वापर केला जात असून याकरिता वापरलेले कपडे गोळा करुन त्यांची वर्गवारी केली जाते. त्यानंतर, त्यावर पुर्नप्रक्रिया (रिसायकलिंग) करुन त्यांपासून धागे (यार्न) वेगळे काढून त्यापासून नवीन कापड तयार करण्यात येत किंवा त्या कपड्यापासून इतर उपयुक्त वस्तू बनविल्या जातात.
‘केंद्रिय वस्त्र मंत्रालय'च्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने बेलापूर, सेक्टर-१ येथे सुनिल गावसकर मैदानाशेजारी या प्रकल्पाचे विशेष केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामध्ये एसबीआय फाऊंडेशन, आयडीएच इंडिया हब आणि टिसर आर्टिसन ट्रस्ट यांसारख्या संस्थांचा सहयोग आहे.
घनकचरा प्रकल्पस्थळी जाणारा पर्यावरणपूरक लाभदायी प्रकल्प...
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २६० सोसायट्यांमध्ये वापरलेले कपडे संकलित करण्यासाठी विशेष वस्त्र संकलन पेट्या ठेवण्यात आल्या असून ते संकलित करण्यासाठी वाहने ठेवलेली आहेत. सोसायट्यांमधून संकलित केलेले कपडे या वस्त्र संकलन केंद्राच्या ठिकाणी आणले जात असून त्याचे ८ प्रकारे वर्गीकरण केले जाते. वर्गीकरणानुसार त्यापासून पुनर्निमिती अथवा पुर्नप्रक्रिया केली जाते. विशेष म्हणजे याद्वारे महिला बचत गटातील सदस्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळालेला आहे.
टाकाऊ वस्त्रांचा पुनर्वापर करणे, कपड्याचा कचरा कमी करणे, पर्यावरणावर होणाऱ्या त्या कचऱ्याच्या नकारात्मक परिणामात घट करणे, नवीन रोजगार निर्माण करणे आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात शाश्वत विकास साधणे अशा सर्व उद्दिष्टांची फलश्रुती या प्रकल्पाद्वारे होत आहे.
मॉल्स, मार्केटस् येथे डिस्प्ले किऑक्स करण्याचे निर्देश...
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सदर केंद्राला भेट देत तेथील कार्यवाहीची पाहणी केली. तसेच तेथील अधिकारी आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. सदर प्रकल्प पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याचे अधोरेखित करीत आयुक्त शिंदे यांनी याची व्याप्ती वाढविण्याच्या सूचना केल्या. कपडे संकलनासाठी पेट्यांची संख्या वाढवून जास्तीत जास्त सोसायट्या आणि वसाहतींमधील नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच त्यादृष्टीने या प्रकल्पाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना केल्या.
या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या शोभिवंत आकर्षक वस्तू नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्केटमध्ये नागरिकांची वर्दळ असते, अशा ठिकाणी त्यांचे स्टॉल करावेत. तसेच महापालिका मुख्यालयासह मॉलसारख्या ठिकाणी डिस्प्ले किऑक्स असावेत. महापालिका मुख्यालय तसेच विभाग कार्यालयांप्रमाणेच इतर शासकीय कार्यालयांमध्येही कपडे संकलनासाठी पेट्या ठेवाव्यात. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी सुरु असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा. त्या अनुषंगाने गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी नागरिकांनी या वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा प्रकल्प केंद्रामध्ये बनविलेल्या शोभिवंत वस्तुंचा वापर करावा. त्यादृष्टीने येथील शोभिवंत वस्त्र साहित्य नागरिकांना सहजपणे उपलब्ध होईल अशाप्रकारे मॉल्स, मार्केटस्च्या ठिकाणी प्रदर्शने मांडावीत.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.