जे जे रसोई हॉटेल समोरील अनधिकृत शेड जमीनदोस्त
खारघर : पनवेल महापालिका खारघर प्रभाग कार्यालय तर्फे खारघर मधील जेजे रसोई हॉटेल समोरील अनधिकृत शेड जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आल्याने ‘खारघर संघर्ष समिती'चे कार्यकर्ते समाधान व्यक्त करीत आहेत.
राज्य शासनाने खारघर शहर दारुमुक्त शहर घोषित करावे, या मागणीसाठी ‘खारघर संघर्ष समिती' तर्फे शासन दरबारी पत्रव्यवहार सुरु आहे. दरम्यान, राज्य शासनाने खारघर शहर ‘दारुमुक्त शहर', अशी घोषणा करावी, या मागणीची तड लावण्यासाठी येत्या २८ एप्रिल रोजी ‘खारघर संघर्ष समिती' तर्फे रायगड जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे.
खारघर मधील जेजे रसोई आणि निरसुख हॉटेल यांना मद्यविक्री परवानगी देताना राज्य उत्पादन शुल्क विभागद्वारे चुकीचा अहवाल देण्यात आला आहे. खारघर सेक्टर-७ मधील साई शरण हॉटेल चालकाने ५ मीटर रस्ता तसेच उद्यानाच्या जागेत तर जेजे रसोई हॉटेल मालकाने हॉटेल समोरील २ हजार चौरस फूट जागेत अतिक्रमण केले असून, या अतिक्रमणाकडे सिडको आणि पनवेल महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, असे ‘खारघर संघर्ष समिती' तर्फे शासन दरबारी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदनाची दखल घेवून पनवेल महापालिका खारघर प्रभाग कार्यालयाने २२ एप्रिल रोजी जेसीबीद्वारे जेजे रसोई हॉटेल समोरील अनधिकृत शेड जमीनदोस्त केली.
दरम्यान, येत्या १८ मे रोजी ‘खारघर संघर्ष समिती' तर्फे खारघर सेक्टर-७ मधील साई शरण हॉटेल तर्फे ५ मीटर रस्ता आणि उद्यानाच्या जागेवर केलेले अतिक्रमण हटवून रस्ता नागरिकांसाठी खुला करावा, या मागणीसाठी खारघर मध्ये एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. त्यापूर्वी हॉटेल शाई शरण शेजारील ५ मीटर रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवून रस्ता नागरिकांसाठी मोकळा करण्यात यावा, अशी ‘खारघर संघर्ष समिती'ची अपेक्षा आहे, असे ‘खारघर संघर्ष समिती'चे पदाधिकारी केशरीनाथ पाटील यांनी सांगितले.