स्वच्छता मोहीम समन्वयाने यशस्वी करण्याचा ‘ठामपा'चा निर्धार
ठाणे : स्वच्छ भारत अभियान मध्ये सर्व विभागांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा ठाणे महापालिकेने निर्धार केला आहे. ‘स्वच्छ भारत अभियान'साठी पुढील वर्षी होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणात ठाणे शहराची कामगिरी सर्वोत्कृष्ट असावी यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेने आतापासूनच कामाला लागावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
‘स्वच्छ भारत अभियान'च्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन कै. अरविंद पेंडसे सभागृह येथे करण्यात आले होते. सर्व विभागांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार सदर बैठकीत करण्यात आला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, ‘टीएमटी'चे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे, नगररचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांच्यासह सर्व उपायुक्त, सर्व उपनगर अभियंता, सर्व सहाय्यक आयुक्त आणि सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी ‘स्वच्छ भारत अभियान'साठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, प्राथमिक तयारी आणि सर्व विभागांच्या जबाबदारी यांच्याविषयी सादरीकरण केले.
महापालिका क्षेत्रात स्वच्छता राखणे आपले मुलभूत कर्तव्य आहे. त्याकरिता अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान आणि राज्य सरकारने माझी वसुंधरा अभियान या स्पर्धांचे नियोजन केलेले आहे. आपण आपले काम गुणवत्तापूर्ण करण्याची आवश्यकता आहे. दैनंदिन स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची दिवसातून ४ वेळा नियमित सफाई, शौचालयांची आवश्यक दुरुस्ती, सुस्थितीतील रस्ते, पदपथ, दुभाजक, उद्याने या गोष्टींचा एकत्रित परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होतो. याची जाणीव ठेवून सर्व विभागांनी उत्तम समन्वय साधून या मोहिमेसाठी काम व्हावे, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
शहराची स्वच्छता प्रत्येक नागरिकांच्या अभिमानचा विषय झाला पाहिजे. त्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता दूतांनी त्यांच्या हजेरी पेटीच्या परिसरातील नागरिकांशी कायम संपर्कात रहावे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणारी गृहसंकुले, व्यावसायिक आस्थापना यांच्याकडील कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाट या प्रकल्पांचा नियमित आढावा घेण्यात यावा. स्वच्छतेच्या सर्व उपक्रमात नागरिकांना सहभागी करुन घ्यावे. सदर मोहीम केवळ महापालिकेचीच नसून त्यात सर्व नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय शहर स्वच्छतेच्या सर्व निकषांची पूर्तता करता येणार नाही.
-सौरभ राव, आयुक्त-ठाणे महापालिका.