वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी

नवी मुंबई :  महाराष्ट्राच्या जनतेसाठी समर्पित असलेले ‘महाराष्ट्र भवन’ हे भव्य आणि लखलखते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. या बहुउद्देशीय भवनाच्या बांधकामस्थळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. 

या भवनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील जनतेसाठी एक सशक्त सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रशासकीय केंद्र उभारणे हे आहे. अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त सभागृह, प्रदर्शन गॅलरी, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त व्यासपीठ अशा अनेक सोयी येथे उपलब्ध होणार आहेत. तसेच महाराष्ट्र भवनाच्या प्रथम दर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य बैठी पुतळा असणार आहे. 

पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार म्हात्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा वेग आणि गुणवत्तेवर भर देण्याच्या सूचना दिल्या. "महाराष्ट्र भवन हे आपल्या राज्याच्या संस्कृतीचा आणि प्रगतीचा प्रतीक ठरणार आहे. हे भवन वाशीत उभं राहणं म्हणजे नवी मुंबईच्या विकास यात्रेत एक ऐतिहासिक पाऊल आहे,” असे त्या म्हणाल्या.

येत्या काही दिवसातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र भवनाच्या वास्तूचे भूमिपूजन होणार असल्याचे आ. मंदाताई म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.   

महाराष्ट्र भवन हे 14 मजल्याचे असून त्याचबरोबर अशा या सुंदर महाराष्ट्र भवनामध्ये अभ्यागतांसाठी विश्रांती कक्ष, व्ही.आय.पी. रूम तसेच लोकप्रतिनिधीं सोबत येणारे त्यांचे सारथी, सहकारी, वाहन चालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता ही विश्रांती रूम असणार आहेत. त्याचबरोबर ई-लायब्री, कॉनफरंन्स हॉल, फूड प्लाझा अशा अनेक विविध प्रकारच्या सुसज्ज सुख-सुविधांची रेलचेल या महाराष्ट्र भवनामध्ये पहावयास मिळणार आहेत. 

 

 

 राज्य निहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने नवी मुंबई वाशी येथे उभी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, अशा विविध ठिकाणाहून नागरिक कामांसाठी विविध स्पर्धा परीक्षा व नोकर भरतीसाठी मुंबई येथे येत असतात. मात्र, जागा नसल्याने व हॉटेलचा खर्च परवडत नसल्याने अनेक जण मिळेल तो आसरा शोधतांना दिसतात. ज्या महाराष्ट्र भवनासाठी सन 2014 पासून माझा जो लढा चालला होता त्याला आज पूर्णविराम लागला असून या महाराष्ट्र भवनाचा फायदा हा नवी मुंबईलाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे भवन महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. 

 - आ. मंदाताई म्हात्रे.

 

यावेळी भाजपा महामंत्री नवी मुंबई जिल्हा तथा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, माजी नगरसेवक राजू शिंदे, भाजपा महामंत्री नवी मुंबई जिल्हा कविता कटकधोंड, वाशी मंडळ अध्यक्ष विकास सोरटे, मंगेश चव्हाण, क्षितिजा घोरपडे, प्रवीण भगत, निलेश भगत, नंदकुमार भगत, गुणाबाई सुतार, राखी पाटील, जेम्स आवारे, भरत मावळे, जयंत पाटील तसेच असंख्य स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मतदार याद्यांतील ‘घोळ' विकोपाला