श्रीगणेशोत्सव मंडळांकडून झाडांवर विद्युत रोषणाई
तुर्भे : नवी मुंबई महापालिका मार्फत झाडांवरती विद्युत रोषणाई करण्यास प्रतिबंध घातलेला असतानाही महापालिकाचे मनाई आदेश धुडकावत नवी मुंबई शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांकडून झाडांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या मंडळावर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आली नसल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, झाडांवर विद्युत रोषणाई करण्यास मनाई आहे. या विषयी महापालिका विभाग अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिका उपायुक्त (उद्यान विभाग) किसनराव पलांडे यांनी दिली.
झाडांवर केलेली दिव्यांची सजावट प्रकाश प्रदूषण करणारी असून ती पक्षी आणि झाडांवरील कीटकांसाठी धोकादायक ठरत असल्याचा पर्यावरण तज्ञांचा दावा आहे. या कारणास्तव उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेत राज्य सरकारला नोटीस बजावली होती; मात्र, न्यायालयाने राज्य सरकारला बजावलेल्या नोटीसची दखल न घेता नवी मुंबईतील उपहारगृहे आणि अन्य व्यवसायिक यांनी त्यांच्या दुकानांसमोरील झाडांवर विद्युत रोषणाई केली होती. याविषयी वृत्त दिल्यानंतर प्रशासनाने झाडांवर विद्युत रोषणाई आणि जाहिराती करणाऱ्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळातही झाडांवर मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई केली जात असते. त्याची नोंद घेत प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वीच सर्व संबंधित वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांना विद्युत रोषणाई करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे.
महापालिका प्रशासनाने झाडांवर विद्युत रोषणाई करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची सूचना दिलेली असतानाही अनेक गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेच्या या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामध्ये सीबीडी, नेरुळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, दिघा या महापालिका विभाग कार्यालय क्षेत्रातील शेकडो गणेशोत्सव मंडळांनी मंडपाच्या आजूबाजूला असलेल्या झाडांवर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली आहे. गणेशोत्सव चालू होऊन सात दिवस झाले, तरीही झाडांवरील विद्युत रोषणाई कायम असताना विभाग अधिकाऱ्यांकडून अद्याप यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आले नसल्याचे चित्र दिसत आहे.