स्टेशनबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
डोंबिवलीः अनेक वर्ष डोंबिवली पश्चिम स्टेशनबाहेरील परिसर फेरीवालामुक्त आहे. मात्र, डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कल्याण-डोंबिवली महापालिकाकडून कारवाई होऊनही फेरीवाले हटण्यास तयार नाहीत. याआधी ‘मनसे'ने फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्यानंतर मनसैनिकांविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. आता पुन्हा ‘मनसे'ने डोंबिवली स्टेशनबाहेरील परिसर फेरीवालामुक्त करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन होईल, असा इशारा दिला आहे. २५ ऑवटोबर रोजी ‘केडीएमसी'ने डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई केली. पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरु असताना फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली.
डोंबिवली स्टेशनबाहेरील परिसर फेरीवालामुवत करण्याकरिता ‘मनसे'ने आंदोलन केले होते. मात्र, मनसैनिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल झाल्याने यावेळी ‘मनसेे'ने २४ ऑक्टोबर रोजीी डोंबिवली विभाग सहायक आयुक्त सुहास हेमाडे यांची भेट घेतली. फेरीवाल्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी २५ ऑवटोबर रोजी ‘केडीएमसी'चे ‘फ' प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त हेमा मुंबरकर आणि ‘ग' प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त भरत पवार यांनी पोलीस बंदोस्तात फेरीवाल्यांवर कारवाई केली. या कारवाईत पथकप्रमुख आणि कर्मचारी यांनी जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत शेड तोडले. अनधिकृत टपऱ्या, फुटपाथवर केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
मधुबन गल्ली भाजी मंडईत दारु पार्टी...
या कारवाईत मधबन गल्लीतील अनेक ठिकाणी अधिकृत शेडही जमीनदोस्त करण्यात आले. या गल्लीतील भाजी मंडईत दारुच्या बाटल्या दिसल्याने तेथे रात्रीच्या वेळी दारुची पार्टी होतेय का? असा प्रश्न उपस्थित होतो. या ठिकाणी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त ठेवून दारुड्यांना ताब्यात घ्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
कारवाई सातत्य असणे आवश्यक आहे. महापालिकेने फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईचे आम्ही नागरिकांच्या वतीने आभार मानतो. १०० मीटर अंतर फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे. पोलिसांनी येथील फेरीवाल्यांची माहिती घेतली तर अनेक फेरीवाले परप्रांतिय आहेत, याची माहिती मिळेल. याच ठिकाणी फेरीवाल्यांच्या विळख्याने एक रुग्णवाहिका अडकली होती. तर काही महिन्यापूर्वी एका रुग्णवाहिका चालकाला फेरीवाल्यांनी मारहाण केली होती.
- प्रकाश भोईर, कल्याण जिल्हाध्यक्ष-मनसे.