‘गडकरीं'च्या ‘रोडकरी' प्रतिमेला धक्का
उरण : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सध्या देशभरात उत्कृष्ट महामार्ग बनवण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते बांधणीचे काम करीत आहे. मात्र. उरण मतदारसंघातील रस्ते अर्धवट असल्याने ते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. त्यात संबंधित प्रशासनाच्या टक्के वाढीच्या कारभारामुळे तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे नितीन गडकरी यांच्या ‘रोडकरी' अशा सकारात्मक प्रतिमेला धक्का बसत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उरण तालुक्याच्या विकास कामांकडे जातीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत जनमानसात व्यक्त केले जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको आणि जेएनपीए प्राधिकरण यांच्या भ्रष्ट कारभारामुळे उरण तालुक्यातील हजारो वाहन चालकांना रोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्वात जास्त वाहने आणि प्रवासी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, पुणे, पेण, अलिबाग, महामार्गातून तालुक्यातील रस्त्यातून मार्गक्रमण करीत असतात. त्यामुळे उरण तालुक्यातील जासई, चिर्ले, दिघोडे, खोपटा, द्रोणागिरी नोड या मार्गावर प्रचंड वाहतूक असते. त्यात संबंधित प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे गव्हाण फाटा ते दिघोडे, चिर्ले ते दिघोडे, खोपटा पुल ते कोप्रोली असे रस्ते खड्डेमय असल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरु आहे. तसेच करंजा बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सिमेंट काँक्रीट वाहून गेल्याने टु व्हिलर गाड्या रस्त्यावर रुतून पडत आहेत. यामुळे नितीन गडकरी यांच्या ‘रोडकरी' अशा सकारात्मक प्रतिमेला धक्का बसत आहे. त्यामुळे देशभरात उत्कृष्ट रस्ते बांधणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औद्योगिक दृष्ट्या विकसित होत असलेल्या तालुक्यातील या रस्त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या टक्के वाढीच्या देवाण-घेवाण कारभारामुळे आज तालुक्यातील बहुतांश रस्त्याची दुरवस्था होत आहे. त्यामुळे खड्डे युक्त रस्त्यावर अपघातांची संख्या बळावली असून निष्पाप प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागत आहे. याला सर्वश्री मंत्री आणि संबंधित प्रशासनाचे अधिकारी जबाबदार आहेत. आज पहिल्याच पावसात दिघोडे, खोपटा, द्रोणागिरी नोड, करंजा या ठिकाणावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने जनतेचा अंत पाहू नये. एक दिवस उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही.
- बी. एम. ठाकूर, सामाजिक कार्यकर्ता.