वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत ७४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

भिवंडी : भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी आदेशाद्वारे २०१७ पासून एकच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या ७४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयुक्तांच्या या आदेशाने मागील कित्येक वर्ष एकच विभागात ठाणे मांडून आपले बस्तान बसविलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

२९ ऑगस्ट रोजी सायंकाळी काढलेल्या या आदेशानुसार बदल्या करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने नवीन विभागात रुजू होण्याचे आदेश आयुक्त अनमोल सागर यांनी दिले आहेत. भिवंडी महापालिकेत लिपीक पदावर कार्यरत अनेक कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच विभागात कार्यरत होते. अनेक नागरिक, पदाधिकारी, समाजसेवक यांच्या याबाबत तक्रारी आयुक्तांकडे प्राप्त होत होत्या. विभाग प्रमुखांच्या विहीत कालावधीमध्ये बदल्या होत असतात. मात्र, त्या विभागातील लिपीक वर्षानुवर्ष एकाच टेबलवर किंवा विभागात काम करीत असल्याने त्यांच्या कामामध्ये एक साचेबध्दपणा आला होता. कोणतीही नवीन कल्पना राबविली जात नव्हती. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांच्या सेवा कालावधीमध्ये विविध विभागांचे काम शिकणे आवश्यक आहे. त्यानुसार २०१७ पूर्वीपासून एकाच विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या अन्य विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जर बदली झालेले कर्मचारी नवीन ठिकाणी रुजू झाले नाहीत आणि त्यांनी बदली रद्द करणे किंवा सुधारित करण्यासाठी राजकीय, अराजकीय दबाव आणल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त सागर यांनी दिला असल्याची माहिती प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित महाडिक यांनी दिली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई द्या