माथाडी चळवळीमुळे मिळाले प्रदेशाध्यक्ष पद - आमदार शशिकांत शिंदे

तुर्भे: मी माथाडी चळवळ मध्ये असल्याने संघटनेची पक्षाला मदत होईल आणि माझा आक्रमकपणा या गोष्टीमुळे माझी प्रदेशाध्यक्ष निवड झाली, असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे तुर्भे येथे केले. 

शशिकांत शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने सत्कार प्रसंगी ते बोलत होते. शशिकांत शिंदे व आमदार मनोज जामसुतकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि पांडुरंगाची मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

शिंदे पुढे म्हणाले की, पक्ष फुटले तेव्हा मलाही मंत्री पद मिळणार होते; परंतु निष्ठा महत्वाची असल्याने मी शरद पवार यांची साथ सोडली नाही. निष्ठावंत राहिलो म्हणून अध्यक्ष झालो आहे. माथाडी विषय आल्यावर पक्ष बाजूला ठेऊन आम्ही सर्वपक्षीय एकत्र येतो. माथाडी कामगार कायदा दुरुस्तीचा विषयी आला तेंव्हा याचा अनुभव आपण घेतला आहे. कोपरखैरणे आणि घणसोली येथील माथाडी कामगारांच्या घरांना अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी नोटिसा आल्या आहेत. या प्रकरणी महापालिकेवर ३१ जुलै या दिवशी मोर्चा काढण्यात येणार आहे.

ट्रक टर्मिनलची जागा आम्ही दिली नसती, तर सिडको तेथे घर बांधू शकली नसती. हे दर अधिक असल्याने माथाडी कामगार येथे घर घेऊ शकत नाही. ते कमी करण्यासाठी सभागृहात पाठपुरावा केला आहे. त्यामुळे ही घर ३० ते ४० लाखात मिळतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तत्कालीन सरकारने बाजार समितीची ट्रक टर्मिनलची ही जागा प्रधानमंत्री गृह प्रकल्पाला दिली. निवडणुकीसाठी फंड गोळा करण्यासाठी हे केले का, अशी माझी शंका आहे, असेही परस्पर विरोधी वक्तव्य शिंदे यांनी या वेळी केले.

आमदार मनोज जामसुतकर म्हणाले की, निवडणुकीत शत्रू आणि मित्र कोण हे कळले. माथाडी कामगारांनी साथ दिल्याने निवडून आलो. विधान सभेत कामगारांचे प्रश्न प्रकर्षाने मांडणार.
माथाडी नेते नरेंद्र पाटील म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी चळवळीला न्याय मिळेल असे काम केले. या चळवळीतील गुंडगिरी कमी करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सरकारच्या विरुद्ध सतत बोललो, तर सरकार माथाडी कामगारांची कामे करण्यास कानाडोळा करेल, असे पाटील म्हणाले. माथाडीच्या नावावर पत्र देऊन आपले पाकीट बांधतात. माथाडी कामगार चळवळीला नख लावणाऱ्यांचे मनसुबे उधळवून लावा. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात माथाडी कामगारांना न्याय मिळाला नाही, असा आरोप पाटील यांनी या वेळी केला.

या सत्कार समारंभास महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, दिलीप खोंड, रविकांत पाटील, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, कायदेशिर सल्लागार ॲड्. भारतीताई पाटील, खजिनदार गुंगा पाटील, माथाडी पतपेढीचे चेअरमन विठ्ठल धनावडे, माथाडी ग्राहक सोसायटीचे चेअरमन बाजीराव धोंडे, व्यापारी प्रतिनिधी, संस्थांचे अधिकारी-कर्मचारी आणि तमाम माथाडी कामगार उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

राजन विचारे, केदार दिघे यांच्या मागणीनुसार ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सची तपासणी-पडताळणी