पावसाळी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी केडीएमसी आयुक्तांनी घेतली मान्सूनपूर्व आपत्कालीन बैठक
कल्याण : पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत शुन्य जिवित हानी आणि कमीत कमी मालमत्ता हानी व्हावी या दृष्टीकोनातून कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे आणि प्राधिकरणांतर्फे सुरु असलेल्या पूर्व तयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टीकोनातून तसेच पावसाळयात नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येवू नये यासाठी महापालिका व इतर प्राधिकरण यांच्या समन्वयासाठी आज मान्सूनपूर्व आपत्कालीन बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.
या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, महापालिकेचे सर्व उपायुक्त, प्रभागांचे सहाय्यक आयुक्त, महापालिकेचे इतर अधिकारी तसेच एमएमआरडीए, एमएसईबी, पोलिस, एमएसआरडीसी व इतर शासकिय प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. येणाऱ्या पावसाळयानिमित्त आपली काय तयारी आहे, गैरसुविधा टाळण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याकडे काय जबाबदारी दिली आहे याची प्रामुख्याने चर्चा करण्यासाठी आज मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.
महापालिका मुख्यालयातील तसेच सर्व प्रभागातील नियंत्रण कक्ष हे पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत २४X७ सुरु राहतील, पावसाळयापूर्वी नाले सफाई योग्य रितीने होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने किती मनुष्यबळ व किती मशिनरी सफाई साठी वापरली याचा अहवाल दररोज सादर करावा असे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. त्याच प्रमाणे सर्व अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने अग्निशमन विभागाच्या अधिकारी वर्गाने आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज रहावे. पावसाळयात उद्भवणाऱ्या आजारांबाबत आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी, प्रभाग अधिकाऱ्यांनी धोकादायक होर्डिंग वर त्वरित कार्यवाही करावी अश्याही सूचना आयुक्त अभिनव गोयल यांनी या बैठकीत दिल्या.
महापालिकेची ६ अग्निशमन केंद्र असून सर्व ठिकाणी बोटी, लाईफ बॉय, लाईफ जॅकेट, जीवरक्षक तसेच विमोचनासाठी लागणारी इतर साधन सामग्री उपलब्ध राहिल अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी यावेळी दिली. तर महापालिकेच्या मुख्य रुग्णालयात 10 बेडचा आप्तकालीन कक्ष पावसाळयात स्थापन केला जाईल तसेच पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विभागाची वैद्यकिय पथके सज्ज राहतील अशी माहिती वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ला यांनी दिली.
पावसाळयात दुर्घटना टाळण्यासाठी अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाश्यांना स्थलांतरीत करण्यासाठी पोलिसांनी देखील महापालिकेस सहकार्य करावे असे निर्देश अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना दिले. पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने स्थलांतरीत करावयाचे झाल्यास महापालिकेच्या शाळा उपलब्ध करुन दिल्या जातील अशी माहिती शिक्षण विभागाचे तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी या बैठकीत दिली.