वीज समस्यांवर ‘पाताळगंगा औद्योगिक संघटना'ची ‘महावितरण'च्या अधिकाऱ्यांशी चर्चा

रसायनी : ‘महावितरण'च्या नवनवीन उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी तसेच औद्योगिक संघटनांच्या वीज संबंधी समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी महावितरण तसेच पाताळगंगा येथील औद्योगिक ग्राहकांचे प्रतिनिधी एपीएमए (अतिरिक्त पाताळगंगा मॅन्युफॅक्चरिंग संघटना) आणि पीआरआयए (पाताळगंगा-रसायनी औद्योगिक संघटना) यांची संयुक्त बैठक नुकतीच मे. व्हीलाईट फर्निटेक कंपनी येथे संपन्न झाली. या बैठकीस ‘महावितरण'चे भांडुप परिमंडल मुख्य अभियंता संजय पाटील, पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, कार्यकारी अभियंता, पनवेल (ग्रामीण) विभाग व्ही. एम. शिंदे, आदि उपस्थित होते.

यावेळी पाताळगंगा-रसायनी औद्योगिक क्षेत्रातील वीज ग्राहकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली. ‘महावितरण'चे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी अधिकाऱ्यांना देखभाल-दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून ग्राहकांना अखंडीत आणि योग्य दाबाने वीज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्राहकांचे ग्रुप तयार करून त्यांना ‘एसएमएस'द्वारे संवाद साधण्यास सांगितले. रोहित्र चोरी रोखण्यासाठी कंपन्यांनी त्यांचे सीसीटीव्हीचे कॅमेरे रोहित्रांकडे वळवण्यासाठी सूचना केल्या. तसेच एमआयडीसी आणि महावितरण यांच्या अधिकाऱ्यांना समन्वय राखण्यास संजय पाटील यांनी सूचित केले.

एमआयडीसी आणि इतर विभागामार्फत कामाच्या दरम्यान भूमीगत वाहिन्यांना होणारे नुकसान टाळण्याकरिता समन्वय साधण्याचे निर्देश मुख्य अभियंता संजय पाटील यांनी दिले. कॉल बिफोर यु डिग असे मोबाईल ॲप वापरण्यात यावे. तसेच आवश्यक तेथे वाढीव श्रमतेचे रोहित्रे बसविण्यास मुख्य अभियंता पाटील यांनी सांगितले.

यावेळी एपीएमए-अध्यक्ष परमीजीत सिंग सैनी, एपीएमए-सचिव विनोदकुमार गोंड, पीओएआय-मुख्य कार्यकारी सचिव डी. एस. गुरव, प्रसन्ना जोशी, अतुल राठोड, प्रदीप कुऱ्हाडे, संजय अकोले, मीनल गाडगे-मोकल आणि इतर ग्राहक प्रतिनिधी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बिर्ला मंदिरात विठ्ठल भक्तांची मांदियाळी