प्रशांत दामले आणि पैशाचं पाकीट...

आजपर्यंत अनेक नामांकित व्यक्तींनी ‘अरुण स्टोअर्स' आणि ‘रॉयल कलेक्शन' ला भेट दिली आहे. प्रशांत दामले सारखा दिलखुलास नि प्रसन्न चेह-याचा नि नावाजलेला माणूस आपल्या दुकानात येतो काय नि काहीतरी खरेदी करतो काय याचं आज एवढ्या वर्षांनंतरही अप्रुप वाटतं. प्रशांत दामलेच्याच शब्दात सांगायचे झालं तर सुख म्हणजे नेमकं काय असतं ते अनुभवलं. त्याकाळी मोबाईल फोन नसल्याने त्या ‘खास' व्यक्तीबरोबर सेल्फी काढण्याचा आमचा चान्स मात्र हुुकला.

 साधारणपणे पंचवीस एक वर्षं झाली असतील. माझ्या मुलाने अलिबाग तालुक्यातील पहिलं ठरलेलं असं एसी असलेलं गिपट शॉप ‘रॉयल कलेक्शन' या नावाने सुरू केलं होतं. त्याचं उदघाटनसुद्धा दिमाखात केलं होतं आणि दुस-याच वर्षी आमच्या ‘अरुण स्टोअर्स' चा सुवर्णमहोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला, ज्याची आठवण आजही सर्वांच्या मनात आहे. ‘रॉयल कलेक्शन' चालू करताना ते जास्तीत जास्त आकर्षक बनवायचं मनात होतं आणि एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली की, ती होतेच असा माझा अनुभव आहे. अगदी तसेच आमचं गिपट शॉप तयार झालं. ग्राहकांची पसंती ही सर्वात महत्वाची ! शॉपची प्रसिद्धी एवढी झाली, की अगदी अलिबागपासून खास मराठी ग्रीटिंग्ज घ्यायला येणारे ग्राहक मला मिळाले. फार थोड्या कालावधीत हे यश मिळाल्याचं समाधान होतं.

       एक दिवस अगदी अचानकपणे नाट्यसृष्टीतील एक नावाजलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजेच अभिनेता प्रशांत दामले गिपट शॉपमध्ये आला. क्षणभर विश्वास वाटला नाही; परंतु ते सत्य होतं. जवळच असलेल्या बहिरोळे गावात त्याचं घर आहे हे ऐकून माहित होतं. चोंढी सारख्या एका खेडेगावात असं दुकान पाहून त्याने मनापासून अभिनंदन, कौतुक करत दाद दिली रंगमंचावर वावरताना रसिक प्रेक्षकांकडून सतत दाद मिळविणारा एक अभिनेता आमच्या दुकानाला दाद देतोय हे पाहून आम्हांला त्यावेळी काय वाटलं असेल ते वाचकहो तुम्हाला नव्याने सांगायला नकोच. असो !

        दुकानात आल्यावर काही तरी घ्यायला हवं हे जरी खरं असलं तरी नेमकं काय घेणार ? कारण त्याच्याकडे काय नव्हतं, जे तो  इथे घेईल. त्याने एकदा दुकानात चौफेर नजर फिरवली. जशी रंगमंचावर एन्ट्री घेतल्यावर नाट्यगृहातील प्रेक्षकांवर फिरते, अगदी तश्शीच ! त्यानंतर काऊंटरमध्ये ठेवलली वॅलेटस्‌ ( म्हणजे पैशाची पाकिटं हो) त्याने मुलाला दाखवायला सांगितली. त्यातील छानसं पाकीट पसंत पडलं ते घेतलं. नाटकाचे शेकडो प्रयोग करत असताना हज्जारो रुपये कमवणा-या प्रशांत दामलेला त्यामधील काही रक्कम माझ्या दुकानातून खरेदी केलेल्या पाकीटात ठेवावंसं वाटणं हेच आमच्यासाठी आनंददायी होतं.

      प्रशांत दामले दुकानातून निघून गेल्यावरही खूप वेळ आणि त्यानंतरही खूप दिवस ते सारं आठवायचं. खरोखर प्रशांत दामले सारखा दिलखुलास नि प्रसन्न चेह-याचा नि नावाजलेला माणूस आपल्या दुकानात येतो काय नि काहीतरी खरेदी करतो काय याचं आज एवढ्या वर्षांनंतरही अप्रुप वाटतं. प्रशांत दामलेच्याच शब्दात सांगायचे झालं तर सुख म्हणजे नेमकं काय असतं....अर्थात आजपर्यंत अनेक नामांकित व्यक्तींनी ‘अरुण स्टोअर्स' आणि ‘रॉयल कलेक्शन' ला भेट दिली आहे. त्याकाळी मोबाईल फोन नसल्याने त्या प्रत्येक ‘खास 'व्यक्तीबरोबर सेल्फी काढण्याचा आमचा चान्स चुकला एवढं मात्र खरं ! आणि म्हणूनच त्या सा-या आठवणी आता शब्दबद्ध करुन तुमच्याबरोबर शेअर करतोय. -विलास समेळ, घणसोली 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

प्रेरणेची ओंजळ..