उड्डाणपुल, फुटपाथवरील बेघरांवर महापालिका-पोलिसांची धडक कारवाई
मुशाफिरी
बहाणे अर्थात थापा अर्थात सबबी सांगत राहणे हा काही लोकांचा स्थायीभाव असतो. यामागे बऱ्याचदा चामडीबचाऊपणा, माघार, पुढची फजिती टाळण्याचा प्रयत्न, खर्चाच्या मामल्यातून सुटका करुन घेणे, नकोशा मामल्यातून अलगद बाजूला होणे, आपले संभाव्य अपयश झाकणे आदि अनेक कारणे लपलेली असतात. पण पहिल्या महायुध्दाच्या परिणामांत जशी दुसऱ्या महायुध्दाची बीजे पेरलेली होती, तशी या बहाण्यांमागची खरी कारणे आणि परिणामही कालांतराने समोर येतात!
गोष्ट तेवीस-चोवीस वर्षांपूर्वीची आहे. माझा मुलगा त्यावेळी शाळेत असेल. आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळी त्याचा घरुन दिलेला डबा जेवणाच्या वेळी टेबलवरुन पडायचा..आणि मग तो शाळा सुटल्यावर तसाच डब्यातील उरलेसुरले पदार्थ न खाता उपाशीच घरी घेऊन येत असे. याचा बारकाईने अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की त्याला न आवडणारी भाजी डब्यातून दिली की त्या दिवशी त्याचा डबा टेबलवरुन खाली पडत असे. वास्तवात डबा पडणे हा केवळ बहाणा होता..त्याला नकोशी भाजी डब्यातून दिल्याचा निषेध तो त्या बालवयात या कृतीतून करीत असे. तो एम एम एस होऊन चांगल्या कंपनीत कामाला लागल्यावर ‘नकोशी' भाजी घरात बनताना दिसली रे दिसली की तो डबा नेतच नाही, ‘मी कंपनीच्या कॅन्टीनमधून काही घेऊन खाईन' असे सांगून मोकळा होतो.
बहाणे अर्थात सबबी, कारणे ही प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी सांगायची वेळ येतेच. अनेकदा ती खरी, पटण्यासारखीही असू शकतात. सर्वात बिकट अवस्था असते ती लग्नासाठी मुलगी बघायला गेल्यावर! कारण कोणतेही असो..पाहायला गेलेल्या मुलीला नकार देणे हा मोठा संवेदनशील मामला असतो. त्यातही ती मुलगी ओळखीच्या, नात्यातल्या व्यक्तीने दाखवली असेल तर नकार देण्याचे प्रकरण आणखीच गुंतागुंतीचे बनते. तेथे ‘नंतर कळवतो' असले उत्तर देऊन जमत नाही. अलिकडे लग्नाळू मुलीला तिच्या घरी जाऊन चहा-कांदेपोहे यांच्या साक्षीने बघण्याऐवजी बाहेरच्या बाहेर, अन्यत्र बघण्याची, विवाहेच्छुंना एकमेकांशी बोलू देण्याची प्रथा पडली आहे, ती खूप चांगली म्हटली पाहिजे. मुलीला पाहायला घरी येणार म्हटल्यावर तिच्या घरच्यापेक्षा शेजार-पाजारचे, चाळीतले, सोसायटीतले लोकच जास्त उत्तेजित होत असत. तिला नकार मिळाल्यावर यातील अनेकांना आसुरी आनंदही होत असे. ते सारे या नव्या प्रथेमुळे टळले आहे. आजपासून चौतीस वर्षांपूर्वी माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग मला येथे सांगावासा वाटतो. मी काम करीत असलेल्या कंपनीतीलच एका गृहस्थाने त्याच्या नात्यातील एका मुलीचे स्थळ मी तिच्या घरी जाऊन पाहावे यासाठी आग्रह धरला होता. मी मात्र त्यासाठी उत्सुक नव्हतो. पण मैत्रीसंबंधांमुळे बहाणे सांगणेही अवघड होते. त्या गृहस्थाने मग ‘आपण तिला बाहेरच्या बाहेर हॉटेलमध्ये बोलावू, तुम्ही पाहा आणि होकार असल्यास आम्ही निघताना माझ्याकडे पाहुन होकारार्थी मान डोलवा व नकार असल्यास नकारार्थी मान हलवा..मला वाईट वाटणार नाही' असा तोडगा सुचवला. हेही तसे अवघडच काम होते. पण ते अमान्य करण्यासाठी कोणतीही योग्य सबब नसल्याने मी होकार दिला. ठरलेल्या ठिकाणी मी, मेहुणे, माझी बहीण आणि त्यावेळी पाच वर्षाचा असलेला व माझ्या अंगाखांद्यावरच मोठा होत गेलेला माझा भाचा असे आम्ही गेलो. तो गृहस्थ मुलीला घेऊन आला व आम्ही तेथे अचानक भेटल्यासारखे त्याने दाखवले. आम्ही मुलगी पाहिली. आम्हाला मुलगी पसंत पडली नाही. तिची माहिती आधी मी मिळवून ठेवली होतीच म्हणा! ते दोघे हॉटेलमधून बाहेर पडताना ठरल्याप्रमाणे मी त्या गृहस्थाकडे पाहुन नकारार्थी मान हलवली आणि ते गेले. एवढा वेळ खाद्यपदार्थांचा शांतपणे आस्वाद घेत असलेला माझा भाचा निरागसपणे माझ्या बहीणीला म्हणाला..‘आई ती मुलगी कोण होती? तिला काय म्हणायचं?' माझी बहीण त्याला म्हणाली.. ‘तुझ्या मामाला ती आवडली असती ना..तर तिला मामी म्हटलं असतं. आता काही नाही म्हणायचं..मुकाट डिशमधलं संपवायचं आणि घरी निघायचं.'
बऱ्याच वेळा चुलत, मामे, आते, मावस भाऊ आणि आपण यांच्यात चांगलं मेतकूट असतं. एकत्र अभ्यास, एकत्र भटकंती, एकमेकांकडे जाऊन मुक्काम ठोकणं, नाटक-सिनेमा-जत्रा-विविध लग्नसमारंभ यांना एकत्रच जाणं वगैरे. हेच मुलींच्याही बाबतीत घडतं आणि मित्रा-मित्रांमध्येही घडत असतं. पण अनेकदा असे पाहायला मिळते की या मित्रांची, भावांची एकदा का लग्ने झाली की समीकरणे बदलायला सुरुवात होते. मग एकत्र मिळून कुठे जायचे बेत झाले रे झाले व तशी एकमेकांना विचारणा केली गेली की ‘हिला विचारुन सांगतो, नंतर कळवतो' असे बहाणे सुनावले जातात. बहाणे सांगण्यात दारुडे, व्यसनासक्त लोक आघाडीवर असतात. दारु पिण्यासाठी पैसे मागताना कोणत्याही सबबी सांगायला ते मागेपुढे बघत नाही. तंबाखू, मावा, गुटखा यांच्या व्यसनांच्या आहारी गेलेल्यांना कुणी ह्या ‘व्यसनांचा त्याग करा' म्हणून सांगितले की त्यांच्यासमोरच ते ‘ही बघा आजपासून सोडली' म्हणत पुडी फेकून देण्याची बहाणेबाजी (ॲक्शन) करतात. पण दुसऱ्याच दिवशी हे तंबाखूचोळे लोक तंबाखूला आणि स्वतःच्याच बोलाला चुना लावताना दिसून येतात. मुख्य म्हणजे आपण काही गैर, चुकीचे, स्वतःसोबत इतरांचेही आरोग्य धोक्यात आणणारे कृत्य करीत आहोत अशी कोणत्याही प्रकारची अपराधभावना (guilty feeling) सुध्दा यांच्या चेहऱ्यावर नसते.
दुसऱ्याने केलेला मोबाईल कॉल न उचलणे, सर्वांनी कुठे एकत्र जायचे असेल तर ठरलेल्या भेटण्याच्या ठिकाणी उशिरा उगवून इतरांना वाट पाहायला लावताना स्वतःचे (नसलेले) महत्व वाढवायचा अपयशी प्रयत्न करणे, आपले आर्थिक दारिद्रय लपवण्यासाठी लोणकढ्या थापा मारणे असे करणारेही अनेकजण अवतीभवती सहज सापडतात. ‘मोबाईलची बॅटरी उतरली, मोबाईल चार्जिंगला लावला होता, बाथरुममध्ये होतो, मुलाने मोबाईल खेळायला घेतला होता, मोबाईल कुठे ठेवला तो सापडतच नव्हता' असली फालतू कारणे फोन न स्विकारण्यासाठी सांगणारे खूपजण आहेत. पण मोबाईलवर ‘मिस्ड कॉल'मध्ये त्या दरम्यान कुणाकुणाचे कॉल्स येऊन गेले हे समजण्याची प्राथमिक व्यवस्था साऱ्याच मोबाईलमध्ये असतेच की! पण यांना बहाणेच सांगायचे असतात, त्यांना कोण काय करणार? विशेषकरुन ज्यांचे पैसे यांनी घेतलेले असतात त्यांच्या कॉल्सना उत्तर देण्याची नामुष्की नको म्हणून ते असली थापेबाजी नालायकपणे करीत असतात. ‘पुढच्या महिन्यात माझ्या पन्नास हजाराच्या एफ डी ची मॅच्युरिटी आहे तेंव्हा परत करीन..आता प्लीज मला दहा हजार रुपये द्या' अशी थाप मारत मित्रांकडून पैसे घेऊन ते अनेक महिने परत न करणारे कित्येक महाभाग आहेत. अनेकांच्या घरात पगाराचे सारे पैसे बायकोच्या हातात सोपवण्याची प्रथा असते. मग महिनाभर मेहनत करणाऱ्या नवऱ्याला स्वतःसाठी काही करताना बायकोपुढे हात पसरावे लागतात. पैसे मागण्यामागची व्यवस्थित कारणे तिला पटवून द्यावी लागतात. त्यातून मग ‘ऑफिसमधल्या बोंद्रेचा ॲक्सीडेन्ट झाला..लगेच शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात डिपॉझिट भरायचे आहेत, सर्वजण देताहेत आपणही दिले पाहिजे; ऑफिसच्या शिपायाचे वडील वारले..बॉडी सोलापूरला शववाहिनीतून पाठवायची आहे, त्यासाठी सर्वजण मदत करताहेत' असल्या थापा मारुन काही लोक आपापल्या बायकांकडून पैसे उपटतात. विविध महानगरात आमदार, खासदार, नगरसेवक अशी लोकप्रतिनिधी मंडळी खरोखरच अडचणीत आलेल्या लोकांना सद्हेतूने मदत करत असतात; पण त्यांनाही भलतीसलती कारणे सांगून पैसे काढणारे लोक निघतातच. एका परप्रांतीय महाभागाने ‘माझ्या वडिलांचे गावी ऑपरेशन आहे' असे सांगून दवाखान्याच्या खर्चासाठी एका आमदाराकडून घसघशीत रक्कम उकळली. ते इतरांना कळले. त्यांनी लागलीच आमदाराला जाऊन सांगितले की ‘याला बाप तरी किती आहेत?' गोंधळलेल्या चेहऱ्याच्या आमदाराने ‘असे का विचारता?' असे म्हणतात, ‘अहो, तीन वर्षांपूर्वीच याचे वडील वारले, त्यांच्या क्रियाकर्मासाठी याने खासदाराकडूनही पैसे काढले होते' अशी माहिती पुरवली. त्यावर मग आमदाराकडे काहीच उत्तर नव्हते.
फार्म हाऊस, हॅालिडे होम, शेत, शेजारी नदी, विहिर, जवळच ओढा, तलाव असे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. अनेकांची आर्थिक परिस्थितीही बऱ्यापैकी गुटगुटीत झाली असल्याने ते अशा मालमत्तांचे मालकही बनले आहेत. काहीजण प्रतिमाणशी दिवसाचे काही हजार भरुन व्यावसायिक तत्वावर चालवल्या जाणाऱ्या रिसॉर्ट्स, फार्म हाऊसवर जाऊन मौज करत असतात. आता नाताळ, ३१ डिसेंबरनिमित्त हे सारे पुन्हा एकदा पाहायला मिळेलच. मला सहा वर्षांपूर्वी एकजण म्हणाला होता..‘आपण माझ्या फार्म हाऊसवर सहपरिवार जाऊन मस्तपैकी पोपटी लावू, जवळच्या देवस्थानांना भेट देऊ, दोन दिवस मजा करु.' खरे तर या फार्म हाऊसचे अथवा पोपटीचे मला कसलेही ‘कवतिक' उरलेले नाही. मीच माझ्या दहावीच्या बॅचमधील मित्रमैत्रीणींना घेऊन माझ्या भावाच्या फार्म हाऊसवर वर्षाच्या हिवाळा, उन्हाळा, पावसाळा अशा साऱ्याच ऋतुत मुक्कामासाठी जात असतो. पोपटीचा आस्वाद घेत असतो. कराओके म्युझिकचा आनंद लुटत असतो. मला पार सांगली, सोलापूर, पुणे, सातारा, नाशिक, पालघर अशा ठिकाणी नेणारे कित्येक मित्रमैत्रीणी आहेत. विविध उपक्रमांसाठी मला पाहुणा, वक्ता म्हणून विविध ठिकाणी सोबत नेणारी अनेक सेवाभावी-स्वयंसेवी मंडळे-संस्था आहेत. त्यामुळे काहीजणांच्या अशा सोबत नेण्याच्या थापेबाजीबद्दल मला फारसे काही वाटत नाही. पण ‘पचेल तेवढेच खावे' या धर्तीवर ‘समोरच्याला पचेल एवढीच थाप मारावी' एवढीच काय ती इच्छा. सर्वांना येणाऱ्या नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
(मुशाफिरी) राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई