उड्डाणपुल, फुटपाथवरील बेघरांवर महापालिका-पोलिसांची धडक कारवाई
मुशाफिरी
या स्वतंत्र भारतात पारशी, जैन, शीख, ख्रिश्चन, बौध्द हेही अल्पसंख्य समुदाय आहेत. पण यांच्यापैकी कुणाकडून देशभरात दंगेधोपे, दुश्मन राष्ट्र पाकिस्तानशी जवळीक, भारतीय क्रिकेट संघ सामना हरल्यानंतर रस्त्यावर येऊन फटाकेबाजी करणे असला नमकहरामीपणा केला जात नाही. तुमचा धर्म, जात, आस्था, पक्ष, प्रान्त, देव, प्रार्थनेची ठिकाणे कोणतीही असोत; जन्मभूमीवरील प्रेम, देशाची सुरक्षितता, शांततामय सहजीवन यांच्याशी कधीही तडजोड केली जाता कामा नये.
होणार होणार म्हणून प्रतिक्षेत असलेला राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी, विश्वासदर्शक सोहळा पार पडला आहे. पण खातेवाटपाचा तिढा कायम आहे. या सगळ्यात ६ डिसेंबर येऊन गेला. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा तो महापरिनिर्वाण दिन. त्यांच्या पणतूने ‘इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे स्मारक, त्यात त्यांचा पुतळा वगैरे उभारण्याऐवजी तिथे अभ्यासिका उभारा, संशोधन केंद्र तिथे उभारले जावे, इंग्लंड-अमेरिकेच्या धर्तीवरील वाचनालय, ग्रंथसंग्रहालय व्हावे, तेथे लोकांनी ज्ञानाची उपासना करावी' अशा प्रकारची मागणी केली आहे ही त्यातल्या त्यात खूपच आशादायक बाब. स्वातंत्र्य मिळाल्याला आता ७७ वर्षे झाल्यावर तरी समाजाचे मागे राहिलेले घटक आता मुख्य प्रवाहात यावेत, त्यांनी गुणवत्ता, कौशल्य, दर्जा याबाबतीत बाकीच्यांशी स्पर्धा करावी व आपला अभ्युदय साधावा अशी अपेक्षा करायला काही हरकत नसावी.
६ डिसेंबर हा जसा डॉ. बाबासाहेबांचा ‘महापरिनिर्वाण दिन' तसाच तो ‘बाबरी मस्जिद पतन' दिनही. परकीय आक्रमकांनी या भारत देशावर हल्ले चढवून येथील देवस्थाने, गावे, महिलांची अब्रू यांच्याशी खेळ करीत भारतीय संस्कृतीला क्षति पोहचवण्याचा कायमच प्रयत्न केला. भारतातील विविध मंदिरे पाडली गेली, पूजनीय दैवतांच्या मुर्त्यांची विटंबना केली गेली व तेथे या देशाचे नसलेल्यांची प्रार्थनास्थळे जुलुम जबरदस्तीने बनवण्यात आली असे इतिहास सांगतो. यातीलच एका मस्जिदीला ६ डिसेंबर १९९२ या दिवशी हटवले गेल्यावर देशभर दंगे उसळले. १९९३ सालच्या मार्च महिन्यात मुंबईत बॉम्बस्फोटांची मालिकाच घडवून आणली गेली. मुंबई पोलिस, मुंबईचे नागरिक यांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या झाल्या. अल्पसंख्यांकांच्या वस्तीजवळ बंदोबस्त करणाऱ्या पोलीसांवर हल्ले चढवले गेले. नंदकुमार गोखले या पोलिस अधिकाऱ्याचा तेथे निर्घृण खून करण्यात आला. ज्या समुदायाने स्वतंत्र भारताच्या फाळणीची मागणी करुन धर्मावर आधारीत एक संपूर्ण देश मागितला व उदार मनाच्या भारतीयांनी तो दिला व कित्येक कोटीही दिले, तरीही हा देश न सोडता येथेच राहुन या देशाला आणखी खिळखिळे करण्याची नीच कारस्थाने करणारे काही नमकहराम लोक त्यांच्यात असल्याने त्यांनी त्यांच्याच अल्पसंख्य समुदायातील देशभक्त भारतीयांना शरम वाटेल अशी कृत्ये १९४७ साली भारताच्या फाळणीच्या वेळी केली व आजही करताहेत.
पाकिस्तानी राजवटीने ज्यांच्यावर लष्कराच्या मदतीने अनन्वित अत्याचार केले; त्या पूर्व पाकिस्तान्यांच्या सहकार्यासाठी स्व.इंदिराजी गांधी या भारतीय पंतप्रधानांनी मोठी भूमिका बजावली व भारताच्या मदतीने २६ मार्च १९७१ रोजी बांगला देश या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली, तो देशही भारतावर उलटला. कुणी म्हणेल की तुम्ही तुमच्या मनाचेच काहीबाही सांगत आहात म्हणून! त्यांनी वस्तुनिष्ठ माहितीसाठी ‘लज्जा' हे बांगला देशी मुस्लिम लेखिका डॉ.तस्लिमा नासरीन यांनी लिहिलेले सत्य घटनांवर आधारित पुस्तक वाचावे. त्यात लेखिकेने बांगला देशातील स्थानिक लोक हे हिंदु व अन्य अल्पसंख्य जनतेवर अत्याचार तर करतातच, पण तेथील मुस्लिम शिक्षित महिलांनाही त्यांचेच देशवासी कसे प्रताडित करीत आहेत याचे साद्यंत वर्णन केले आहे. आपल्याच देशातील, आपल्याच धर्मातील बाई आपल्या धर्माविरोधात लिहिते, बोलते म्हणजे काय? म्हणून तिचे मुंडके उडवण्याचे फतवे निघाले व तस्लिमा नासरीनला १९९४ पासूनच बांगला देश सोडुन इतर देशांचा आसरा घ्यावा लागला. हे झाले तीस वर्षांपूर्वीचे वास्तव! आज बांगला देशात काय स्थिती आहे? विद्यार्थी आंदोलकांच्या नावावरील मोर्चे काढून अराजक पसरवत तेथील सरकारची राजवट उलथवून टाकल्यावर बांगला देशात मोहम्मद युनुस हा सल्लागार असलेले सरकार स्थापन झाले. वाटले होते मोहम्मद युनुस हा शांततेचे नोबेल पुरस्कार विजेता विचारवंत परिस्थिती आटोक्यात आणेल म्हणून! पण तो निव्वळ कठपुतळा, पुस्तकी कीडा निघाला. आजमितीस बांगला देशात या शांतता पुरस्कार विजेत्याच्या राजवटीत निव्वळ अशांतता माजली असून मंदिरे पेटवली जात आहेत. त्या देशाच्या निर्मितीपूर्वीपासून तेथे राहणारे हिंदु, बौध्द, ख्रिश्चन यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. इस्कॉन मंदिर व त्या मंदिराची मालमत्ता यांचे नुकसान केले गेले आहे. देवळाचे पुजारी संत चिन्मय दास यांना अटक करुन ठेवण्यात आले असून त्यांना वकीलही मिळणार नाही याची व्यवस्था केली जात आहे. रस्तोरस्ती अराजकासारखी स्थिती असून बांगला देशातील अल्पसंख्य हिंदु, शीख, बौध्द, ख्रिश्चन समुदायाला एकटे पाडुन त्यांच्या वस्त्या जाळल्या जात आहेत, महिलांची अब्रू लुटली जात आहे. ...आणि या साऱ्याबद्दल तथाकथित भारतीय विचारवंत, येथे धार्मिक कारणांनी वातावरण बिघडवणारे अल्पसंख्य आता मात्र किलोभर मुग गिळून गप्प बसले आहेत.
भारतात असहिष्णुता वाढीला लागली आहे म्हणून गळे काढणारे अखिल भारतीय विचारवंत संघटनांचे स्वयंघोषित बुध्दिजिवी आता कुठे लपून बसले आहेत कोण जाणे! पुरस्कार वापसी, आविष्कार स्वातंत्र्यावर घाला, धार्मिक सौहार्दाला धवका, लोकशाहीची थट्टा, मानवाधिकारांचे उल्लंघन असले जड जड व सर्वसामान्यांना चटकन समजणार नाही असले शब्द वापरुन लगेच निषेध पत्रकांची भेंडोळीच्या भेंडोळी वृत्तपत्रांच्या कार्यालयात धाडणाऱ्या या तथाकथित बुध्दिजिवींचे हात व तोंड आता निषेधाला का बरे धजावत नाही? इथे एक राजकीय उदाहरण देणे अप्रस्तुत ठरणार नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुक महाविकास आघाडीचा घटक बनून लढवणाऱ्या समाजवादी पक्षाच्या अबू असिम आझमी या आमदाराची सध्याची भूमिका पाहा. शिवसेना (उबाठा) पक्षाने येत्या महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्दयाकडे परतण्याचा निर्णय घेतला तर अबूने महाविकास आघाडीतून बाहेरचा रस्ता धरला आहे. त्याचे कारण तो सांगतो की शिवसेना हिंदुत्वाच्या धार्मिक मुद्दयाकडे जात आहे आणि आमचा पक्ष तर ‘सेक्युलर' आहे. आता प्रश्न असा पडतो की जर यांचा पक्ष खराखुरा ‘सेक्युलर' आहे तर तो महाराष्ट्रात केवळ अल्पसंख्य मतदार जास्त असलेल्या ठिकाणीच निवडणुका का बरे लढवतो? समाजवादी पक्ष वरळी, प्रभादेवी, पंढरपूर, डोंबिवली, ठाणे, पनवेल, पेण, उरण, कर्जत अशा विधानसभेसाठी जागेचा आग्रह धरत नाही? त्यांना सर्व धर्म सारखेच असताना ह्या ‘सेक्युलर' पक्षाचे नेते बांगला देशातील हिंदु, बौध्द, ख्रिश्चन, शीख या अल्पसंख्य समुदायांवर तेथील स्थानिक लोक अत्याचार करीत असल्याचा निषेध का बरे करीत नाहीत?
ठाणे शहरापासून ४० किलोमीटरवर असणाऱ्या पडघा बोरीवली गावात ‘इसिस' या दहशतवादी संघटनेशी, दाऊद इब्राहिमशी संबंध असलेला आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी दहा वर्षांचा सजा भोगून तुरुंगातून बाहेर आलेला साकिब नाचन हा दहशतवादी व त्याची टोळी राहते. त्यांच्यावर गेल्यावर्षी ‘एन आय ए' ने छापेमारी केली होती. आणखी एक ताजे उदाहरण देतो... ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळच्या आंबिवली रेल्वे स्थानकाशेजारीच इराणी लोकांची वस्ती आहे. तेथे पाकिटमार, गुंड, मवाली, घरफोडे लोक राहतात. महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुन्हे करुन ते लपायला तेथे येतात. राज्यातल्या कोणत्याही ठिकाणचे पोलीस दल तेथे लपलेल्या गुन्हेगारांना पकडायला आले तर पोलीसांच्या गाडीवर, पोलीसांवर दगडफेक केली जाते. ते करण्यात तेथील इराणी महिला पुढे असतात. ४ डिसेंबर रोजी अंधेरी एमआयडीसी पोलीस हे गुंड ओनु लाला इराणी याला पकडून घेऊन आंबिवली रेल्वे स्थानकावर गेले असता पोलीस व रेल्वे कर्मचाऱ्यांवर रेल्वे मार्गात असणारे दगड फेकण्यात या इराणी वस्तीतील गुंडांप्रमाणेच त्यांच्यातील महिलाही आघाडीवर होत्या. अण्णा हजारे, बाबा आढाव, श्री श्री रविशंकर, जग्गी वासुदेव उर्फ सद्गुरु, सलीम खान, जावेद अख्तर (प्रख्यात संवाद लेखक सलीम-जावेद ही एकेकाळची जोडी) नासिरुद्दीन शाह, कन्हैयाकुमार, आमीर खान, अमोल पालेकर, शबाना आझमी, राजदीप सरदेसाई या आणि अशा अनेक देशी विचारवंतांना या प्रकरणात महाराष्ट्राच्या-देशाच्या पोलीस दलांवर हल्ले करणाऱ्या लोकांचा निषेध करावासा का वाटत नाही? त्यांच्या सेक्युलरपणात या अल्पसंख्य गुंडांचा दहशतवाद बसत नाही की काय? या वस्तीला राजकीय आश्रय देणारा कोण आहे? पोलीस व स्थानिक पालिका प्रशासन या या वस्तीवर बुलडोझर का फिरवीत नाही? भाजपा-शिवसेनेच्या हिंदुत्वात आंबिवलीला राहणाऱ्या नागरिकांची, महिला-मुलींची सुरक्षितता येत नाही का? कुठल्याच राजकीय पक्षाने या विरोधात आजपर्यंत एकही मोर्चा कसा बरे काढला नाही? या मतलबी मौनामागेही मतांची गणिते आहेत की काय?
तुमचा धर्म, जात, आस्था, पक्ष, प्रान्त, देव, प्रार्थनेची ठिकाणे कोणतीही असोत; जन्मभूमीवरील प्रेम, देशाची सुरक्षितता, शांततामय सहजीवन यांच्याशी कधीही तडजोड केली जाता कामा नये. - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई