उड्डाणपुल, फुटपाथवरील बेघरांवर महापालिका-पोलिसांची धडक कारवाई
होम शॉप
दहा वाजले तसे विजयच्या लक्षात आले, शांती शाळेच्या वाटेला असणार, आजकाल त्याला शांतीला भेटल्याशिवाय चैन पडत नसे. त्याने सायकल काढली आणि शाळेच्या दिशेने दामटली. या वाटेवर फारशी मुले नसत, कारण शाळेत जाणारी मुलं मुख्य रस्त्यावरून जात. शांतीला मात्र ही वाट जवळची.
शांती आणि तिची मैत्रीण शाळेला चाललेली, शांतीचे लक्ष मागे मागे होतं, विजयच्या सायकलच्या घन्टीकडे. एव्हड्यात विजयने सायकल आडवी घातलीच.
शांती - वाट सोड, कृष्ण लागून गेलंस राधेचो रस्तो अडवणारो.
विजय - अगो कृष्णच मी.. मागे शाळेच्या नाटकात कृष्णाची भूमिका केलेली, माहिती आसा मा..
शांती - पयल्यांदा काय तरी काम धंदो बघ.. मग माझ्यावर लाईन मार.
विजय - अगो, लाईन मारुचा कामच करतंय मी..
शांती - तेना पोट भरणा नाय.. चल, वाट सोड माजी.
विजय - संध्याकाळी नदीकडे येतलंस..
शांती - माका सवड नाय, पुढच्या आठवड्यात परीक्षा आसा..
असं म्हणून शांती जोरात चालू लागली विजय मागे वळला. आपण बारावीतुन शाळा सोडली, आपल्याला नोकरी कोण देणार? अभ्यासात गती नाही. घरची दहा गुंठे जमीन..बाबा आपल्या लहानपणीच गेला..आयेने लोकांचा कामधंदा करून आपल्याला वाढवलं..एमआयडीसी कामाला जावं तर पुरा दिवस काम करून घेणार आणि पाच सहा हजार हातावर टेकवणार.. आता खर्च किती वाढलेत? आणि शांतीबरोबर पाट लावायचा म्हणजे तिचा किती खर्च? छे. छे.. जास्त पैसे मिळायला हवे? पण कसे?
तो संध्याकाळी सायकल घेऊन नदीकाठी गेला रोजच्याप्रमाणे. शांती नदीवर येते काय, हे त्याला पहायचे होते. शांती कुठे दिसेना. थोडावेळ नदीकडे पहात तो उठला आणि सायकल हातात धरून विचार करत करत घरी जाऊ लागला. इतक्यात हिरोहोंडा वर बसुन रोहन समोर आला. रोहन हा त्याचा शाळेतील मित्र. हल्ली बरेच दिवस भेटत नव्हता, त्याची गाडी बघून त्याला नवल वाटले.
विजय - रोन्या, गाडी केवा घेतलास? आणि हल्ली करतंस काय?
रोहन गाडीवरून खाली उतरला. त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणाला..तू पण अशी गाडी घेऊ शकतंस.
विजय - मी? गाडी? अरे सायकलीत हवा मारुक पैसो नाय माझ्याकडे.. आणि मी गाडी कसली घेतलंय.
रोहन - घेशीत घेशीत, तू माझ्याबरोबर ये एकदा कणकवलीक, मग बघ, तूझ्या माझ्या सारखे कितीतरी तरुणांनी दोन महिन्यात हिरो होंडा घेतली, वर्षात मारुती घेतली.
विजय - अरे पण कसा काय?
रोहन - नवीन होमशॉप नावाची कंपनी इलिया, म्हणजे कंपनी जुनीच आसा. तिकडे दिल्ली.. आग्रा भागातून अहमदाबाद मुंबई करत कोकणात इलिया.
विजय - काय तयार करतंत या कंपनीत?
रोहन - तयार काय पण करणंत नाय, घरगुती वस्तू विकूचे आसतात. आपण तीन हजार देऊन त्यांचा मेंबर व्हायचा, मग कंपनी तीन हजाराचे वस्तू देतली.. आपण तीन मेंबर करायचे.. ही साखळी चालू रवातली.. आपल्या मेंबरनी पुढे मेंबर केले की नाय हेच्यावर लक्ष द्यायचा, तुझे मेंबर वाढू लागले की तुका कमिशन मिळत रवातला.. दोन महिन्यांनी हिरो होंडा.. वर्षात मारुती.
विजय - रोन्या, माका घेऊन चल तुज्या कंपनीत.
रोहन - मग तुका माज्याकडून तीन हजाराचे वस्तू घेउचे लागतले.
विजय - तीन हजार,? पैसे खायसून हाडू?
रोहन - ही सायकल विकून टाक, दोन महिन्यात तुझी होंडा येत, तोपर्यत माज्या गाडीवरसून जाऊया कणकवलीक.
विजय - पण आये चिडतली सायकल विकलंय तर.. माज्या बाबांची आठवण आसा ही सायकल.
रोहन - तुज्या आयेक मी सांगताय, माजी ही गाडी बघीनलेन, की तिका खात्री पडतंली.
दोघे रोहनच्या होंडावरुन विजयच्या घरी आले. विजयचे घर म्हणजे काय, मातीचा मांगर होता. वर मातीची कौले, भिंती जुनाट मातीच्या, मोठया पावसात कधीही कोसळतील अश्या. रोहनने विजयच्या आईला आपली नवीन गाडी दाखवली आणि विजयला आपल्या कंपनीत नोकरीला लावतो म्हणून शब्द दिला. त्यासाठी तीन हजार सुरवातीला कंपनीत भरायला हवे, त्याने नुकसान नाही. कारण कंपनी जवळजवळ तेव्हड्याच किमतीच्या वस्तू देते. आपण कंपनीचे मेंबर झालो आणि अजून मेंबर केले की कंपनी कमिशन सुरु करते, मग दोन महिन्यात होंडागाडी आणि वर्षात मारुती दारात.
विजयची अशिक्षित म्हातारी ऐकत बसली. वर्षात दारात चारचाकी गाडी, हे ऐकून ती खुश झाली.
विजयने चार हजाराला सायकल विकली आणि रोहन बरोबर तो कणकवलीला गेला. विजय रोहनच्या मागे बसुन कणकवलीत पोचला, रोहनने गाडी एका नवीनच बांधलेल्या बिल्डिंगखाली लावली आणि लिपटने तिसऱ्या मजल्यावर पोचले. त्या बिल्डिंगच्या टोकाला असलेल्या ऑफिसमध्ये विजयने रोहनसह प्रवेश केला, आत गार एअरकंडिशन होते. विजयने प्रथमच असले एअरकंडिशन अनुभवले. सुगंध पसरला होता. ऑफिसमध्ये चार मुली कॉम्प्युटरसमोर बसल्या होत्या. रोहनसारखे अनेकजण त्या मुलींकडे पैसे जमा करत होते, त्या मुली पैसे स्वीकारून त्याच्या स्लिप्स देत होत्या.
विजय तोंड उघडे टाकून असे वैभव पहात होता. रोहनने त्यातील एका मुलीकडे चौकशी केली आणि विजयला घेऊन तो जाड काच ढकलून आत गेला. आतमध्ये एका खुर्चीवर एक मध्यम वयाचे पोट सुटलेले, तोंडात मावा भरलेले गृहस्थ आणि त्यांच्या बाजूला अत्यंत देखणी अशी मध्यम वयाची बाई बसली होती. रोहन आत गेला आणि त्याने साहेबाना आणि मॅडमना नमस्कार केला.
मॅडम - काय रोहन?, झाले काय मेंबर?
रोहन - होय झाले, हा विजय पण मेंबर झालंय, माझा गावातला मित्र.
मॅडम - पैसे भरले काय याने? आणि आधार कार्ड, पॅन कार्ड कॉपी पण दे काउन्टरवर, बँकेचे अकाउंट नंबर दे., कारण पैसे सरळ अकाउंटवर जमा होतात आपल्या कंपनीत.
बाबुराव साहेब - बरं का माझं नाव बाबुराव, ह्या शाखेचा मॅनेजर आहे मी. आणि ह्या अलका मॅडम. आम्ही दोघं या जिल्हयातील या कंपनीचा कारभार पहातो. एकदा तुम्ही पैसे भरून मेंबर झालात की कंपनी तुम्हाला तेव्हड्याच किमतीच्या वस्तू देते, मग तुम्ही अजून मेंबर वाढवत राहा.. जसजसे तुम्ही मेंबर वाढवाल तसे तुमचे कमिशन बँकेत जमा होतं जाईल. आमच्या बहुतेक मेंबरनी गेल्या दोन वर्षात इनकम टॅक्स भरला, होंडा गाड्या घेतल्या.. काही जणांनी मारुती कार घेतल्या.तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे, तुम्ही जेव्हडे मेंबर करणार आणि कंपनीत पैसे जमा करणार, त्या पटीने तुम्हाला कमिशन मिळणार.
विजय या भपक्याने भारावून गेला होता. बाहेर जाऊन त्याने तीन हजार भरले, बाहेरील मुलीने त्याला वस्तू दिल्या आणि कंपनीची कागदपत्रे दिली. दोन दिवसांनी येऊन त्याच्या नावाचे व्हिजिटिंग कार्ड घेऊन जा, असे सांगितले.
दोन दिवस विजय हवेत होता, त्याने ऑफिसमध्ये जाऊन आपल्या नावाचे व्हिजिटिंग कार्ड आणले, कधीकाळी आपल्या नावाचे कार्ड असेल असे त्याला वाटले नव्हते. त्याने कार्ड आपल्या आईला दाखवले, आईने त्याची दृष्ट काढली. त्याने आपले कार्ड शांतीला दाखवले, ती भलतीच खूष झाली, त्या कार्डतील दोन कार्डे तिने आपल्यासाठी ठेवली आणि ती मैत्रिणींना दाखवू लागली. व्हिजिटिंग कार्ड मिळताच विजय आपल्या मामाकडे, मावशीकडे, चुलतबहिणीकडे गेला, सर्वाना हा कामाला लागला याचा आनंद झाला, सर्वांनी खुशीने तीन तीन हजार रुपये दिले आणि मेंबर झाले.
विजयने मग आणखी मेंबर केले, त्याच्या मामाने, मावशीने, चुलत बहिणींनी आपल्या ओळखीचे मेंबर केले.
पहिल्या महिन्यात विजयला पंधरा हजार कमिशन आले. ते पैसे त्याने आईकडे दिले, आईने देवासमोर ठेवले. पुढील महिन्यात पंचवीस हजार कमिशन आले. विजय रात्रीचा दिवस करून फिरत होता नवीन नवीन मेंबर करत होता. मग त्याने बँकेचे स्टेटमेंट दाखवून फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले आणि त्याची होंडा गाडी आली. आईला खुप आनंद झाला, त्यापेक्षा शांतीला जास्त आनंद झाला. आता वेळ असेल तेंव्हा तो शांतीला शाळेत सोडू लागला.
विजयच्या मामा, मावशींना पण कमिशन येत होते, सर्वजण खुप आनंदात होते. विजयला रोहन आणि त्यांच्या कंपनीतील सिनियर माणसे सांगत होती, हे जे पैसे कंपनीकडे येत आहेत, त्याची प्रॉपर्टी कंपनी खरेदी करते. अनेक समुद्रकिनाऱ्या लगत कंपनीने मोठी प्रॉपर्टी खरेदी केली आहे, तशीच पुणे मुंबई भागात मोठे पलॅट्स खरेदी केले आहेत. बाबुराव सर जरी या भागाचे मुख्य असले तरी इनकमटॅक्सला अडचण नको म्हणूंन मॅडम आणि त्यांच्या बहिणीच्या नावावर सर्व खरेदी केली आहे.
या नंतर होम शॉप कंपनीने लोकांकडून डिपॉझिट घ्यायला सुरवात केली, पंधरा टक्के दराने व्याज कंपनी देत होती आणि त्याचे व्याजाचे चेक डिपॉझिट मिळताच मिळणार होते. होमशॉप कंपनीचे एजेंट होंडा गाडी घेऊन गावोगावी होतेच. त्यानी आपल्या ओळखीच्या लोकांकडून डिपॉजिट घ्यायला सुरवात केली, पंधरा टक्के व्याज मिळत होते. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार खुप वाढले, त्यांना या पैशाचे काय करावे हे कळेना. ही पंधरा टक्के व्याज देणारी कंपनी त्यांना दिसली, या कंपनीचे अनेक एजन्ट मारुती घेऊन फिरताना दिसत होते. शिवाय त्यातील बहुतेकजण त्यांच्या ओळखीचे होते.
विजय आपल्या माजी शिक्षकांना भेटला, ग्रामसेवक, तलाठी, बँक कर्मचारी, आंबा बागायतदार, निवृत्त कर्मचारी अनेकांनी भरघोस रक्कम होमशॉप मध्ये गुंतवली. विजयने पन्नास लाखापेक्षा जास्त रक्कम जमा केली.
कंपनी आगाऊ व्याजाचे चेक देत होती आणि चेक जमा होत होते. सर्वत्र आनंदीआनंद होता. विजयचे कमिशन वाढले, आता मॅडम त्याला "मारुती बुक कर; कारण त्यामुळे कंपनीची पत वाढते," असे सांगू लागल्या. विजयने मारुती घेतली, ती चालवायला तो शिकला. त्याच्यासारखी रोहन आणि अनेकांनी मारुती घेतल्या आणि त्यावर होम शॉप'चे स्टिकर लावले.
विजयने मारुती गाडीतून आईला फिरवले, दहा मैलावरील देवाला घेऊन गेला. विजयच्या आईला हे सत्य आहे की स्वप्न हे कळेना, तिला वाटू लागले, हे दिवस पहायला विजयचे बाबा असायला हवे होते. आता सुट्टीच्या दिवशी शांती विजयच्या गाडीतून कणकवलीत जाऊन सिनेमा पहात होती, हॉटेलमध्ये बिर्याणी खात होती.
होमशॉप कंपनीच्या मिटींग्स होतं असत, कधी जिल्ह्यातील मोठया हॉटेलमध्ये, कधी गोव्यातील फोर स्टार हॉटेलमध्ये. मिटिंगना मॅनेजर बाबुराव, मॅडम आणि त्यांची बहीण तसेच अनेक सिनियर मॅनेजर असायचे. विजयने रोहनला विचारले, "हे सिनियर मॅनेजर काय काम करतात? ”
रोहन त्याला म्हणाला, "हे मॅनेजर अनुभवी आहेत, या आधी अनेक मार्केटिंग कंपनी मध्ये त्यानी काम केलेले आहे. पैसे कसे जमा करायचे आणि कुठे गुंतवायचे हे यांना माहित असते, शिवाय काहीजणं कंपनीच्या मुख्य ऑफिसमध्ये असतात. जमवलेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम कंपनीत जमा होते, बाकी रकमेने प्रॉपर्टी खरेदी होते. सर्व हिशेब मुख्य ऑफिसमध्ये असतो तिथूनच सर्वांचा हिशेब करून कमिशन पाठवले जाते.”
मॅडम आणि त्यांच्या बहिणीने मोठ्ठा बंगला खरेदी केल्याची बातमी पसरली, बाबुराव साहेबांचा मुक्काम याच बंगल्यावर असायचा. तसेच कंपनीने पुण्यात अख्खा मॉल खरेदी केल्याची आणि तीन सिनेमे प्रोड्युस केल्याची बातमी होती. होम शॉप कंपनीची कोटीच्या कोटी उड्डाणं सुरु होती, मॅडम आणि त्यांची बहीण आता मार्सिंडीज मधून फिरत होत्या. चारही बाजूनी पैसे येत होते. सर्व सिनियर्स चैन करत होते. फाईव्ह स्टारमध्ये पाटर्या करत होते. मॅडमच्या हातात आता जिल्ह्याचा कारभार आला होता, बाबुराव नाममात्र होता. सिनियर मॅनेजरनी खुप पैसे मिळवले अशी बातमी पसरली होती.
विजय जीव तोडून काम करत होता, त्याला घर बांधायचे होते. त्याने एकाला सांगून चिरे मागवले, रेती मागवली. घर बांधले की शांतीबरोबर लग्न करायचे होते. आता त्याला महिन्याला चाळीस हजार कमिशन येत होते, एका वर्षानंतर साठ हजार होईल असा त्याचा अंदाज होता.
अचानक कंपनीतील सिनियर्स, ज्यांनी खुप पैसे मिळवले, त्या मंडळींनी राजीनामे दिले. मॅडम आणि त्त्यांची बहीण ऑफिसमध्ये येईनाशी झाली. एका रात्री पुण्यामध्ये कंपनीच्या ऑफिसमध्ये ठेवीदारांनी गर्दी केल्याची बातमी टीव्हीवर दाखवत होते, कंपनीने दिलेले चेक रिटर्न आले होते. जिकडे तिकडे गोंधळ सुरु झाला. फोनवर फोन येऊ लागले. ती बातमी पाहून प्रत्येक जिल्ह्यातील ठेवीदार ऑफिसकडे जमा होतं होते. विजयला फोनवर फोन येऊ लागले, तो प्रत्येकाला "घाबरू नका.. कंपनीकडे पैसे आहेत..प्रॉपर्टी आहे.. तात्पुरता प्रॉब्लेम आहे.. काही दिवसात चेक जमा होतील, ” असे सांगत होता.
विजय सकाळी उठून कणकवलीत गेला, बारा वाजले तरी ऑफिस उघडले नव्हते, बाहेर हजारो ठेवीदार जमा झाले होते, घोषणा देत होते. रोहनपण त्याच्यासारखाच काळजीत उभा होता, अजून अनेकजणं होतेच. बाबुराव मॅनेजरचा फोन बंद होता. मॅडम आणि त्यांच्या बहिणीचा फोन बंद होता. सिनियर्सनी आधीच राजीनामे दिले होते.
जिकडेतीकडे होमशॉप कंपनीच्या ऑफिसबाहेर लोक जमा झाली होती, सगळी ऑफिसे बंद होती, सगळे मॅनेजर पळून गेले होते.
ठेवीदारांचे लाखो रुपये कंपनीत होते अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या संस्थेत जास्त व्याजाच्या आशेने पैसे गुंतवले होते. बस ड्रायव्हर, कंडक्टर, सफाई कामगार, भाजीवले, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी अनेकांचे पैसे..
सायंकाळी दमून विजय आणि रोहन घरी आले, तर त्यांच्या घरी ही गर्दी जमा झाली होती. शांतीचे भाऊ, वडील, मामापण आले होते, या सर्वांनी विजयच्या खात्रीवर कंपनीत पैसे ठेवले होते. सर्वांनी विजयवर प्रश्नांचा भडीमार केला. विजय रडवेला होऊन "सगळ्यांचे पैसे मिळतील, चार दिवस थांबा ” असे काकूळतीने सांगत होता.
कसेबसे लोक गेले पण दुसऱ्या दिवशी त्यापेक्षा जास्त लोक जमले. सर्व पेपरमध्ये होमशॉप मार्केटिंग कंपनीच्या बातम्या पहिल्या पानावर छापून आल्या होत्या. रोहन आणि विजय परत कणकवलीच्या ऑफिसमध्ये पोहोचले, ऑफिसला कुलूप होते. कुणीतरी पोलीस कॅम्लेंट दिली. बाबुराव आणि कंपनीविरुद्ध वारंट निघाले. पोलीस बाबुरावला शोधू लागले.
गावात विजयची हवा तंग झाली, ठेवीदार त्याला जेऊ देईनात, झोपू देईनात. वाट बघून बघून शांतीच्या भावाने आणि वडिलांनी शांतीसमोर त्याला मार मार मारले आणि परत शांतीसोबत दिसलात तर हाडे मोडून हातात देईन अशी धमकी दिली. बिचारी विजयची आई रडत रडत होती, आपल्या नवऱ्याने मुलाचे हे धिंडवडे पाहिले नाहीत, याचे तिला समाधान वाटले. विजयने त्याच्या खात्यावरील जी रक्कम होती ती काही ठेवीदारांना देऊन टाकली तेंव्हा त्यानी त्याला सोडले. एका खातेदाराने त्याची होंडा गाडी नेली.
पोलिसांनी बाबुरावला कागलमधून अटक केली, सर्व चेक्सवर त्याच्या सह्या होत्या. मॅडम आणि त्त्यांची बहीण बेपत्ता झाल्या, कंपनीच्या या जिल्ह्यातील सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर होत्या. ठेवीदारांनी प्रयत्न करूनही वसुली झाली नाही. कंपनीचे सर्व डायरेक्टर भूमिगत झाले. शांतीला तिचा भाऊ मुंबईला घेऊन गेला आणि एका चाकरमान्याबरोबर तिचे लग्न लाऊन दिले.
विजय परत उघडा पडला. त्या कंपनीत जायच्या आधी खिशात पैसे नव्हते.. पण आजूबाजूची माणसे, नातेवाईक तरी बरे होते, अडीअडचनणींना मदत करत होते. आता सर्वच वाईट झाले होते.
विजय आणि त्याची आई एकएक दिवस ढकलत होते. दोन वेळ खायची पंचाईत झाली. एक दिवस त्याचा चुलत काका जो कुडाळमध्ये होता, तो त्याच्याकडे आला.
काका - विज्या, असो बसान किती दिवस रावतलास, माज्याबरोबर चल, माज्या कारखान्यात शिक कायतरी. असलो हरामाचो धंदो करूंक गेलंस. कष्ट कर. आयते पैसे नको.. ते पचणत नाय.. चल.
विजय काकाबरोबर कुडाळला गेला, काकाच्या कारखान्यात फॅब्रिकेशन मन लाऊन शिकला. चांगला फॅब्रिकेटर बनला. काकाने त्याचे गावचे घर बांधून दिले आणि कनेडीमध्ये फॅब्रिकेशन कारखाना घालून दिला. आता मन लाऊन विजय धंदा करत आहे. संध्याकाळी घरी जात आहे. काकाच्या ओळखीने त्याचे लग्न ठरले आहे.
होम शॉप कंपनीने लोकांना फसवले, ठेवीदारांना बुडवले म्हणून मार्केटिंग कंपनीची कमी नाही, आता नवीन नावाने एक कंपनी जिल्ह्यात दाखल झाली आहे आणि होमशॉपचे सिनियर, ज्यांनी पैसे मिळवून वेळेत कंपनी सोडली, ते सर्व लोकांना मूर्ख बनवायला सज्ज झाले आहेत.
पुन्हा ते विजय, रोहनसारखे बेकार तरुण शोधणार आहेत, त्यांच्यामुळे ठेवी गोळा करणार आहेत आणि पुन्हा भूमिगत होणार आहेत. - प्रदीप केळुस्कर