उड्डाणपुल, फुटपाथवरील बेघरांवर महापालिका-पोलिसांची धडक कारवाई
अमेरिकेतील पापनगरी
लास वेगास हे अमेरिकेतील शहर जुगाराचे शहर म्हणून जगभर मशहूर आहे. नेवाडा या वालुकामय राज्यात पीक पाण्याची वानवा. तेथील लोकांना रोजगाराचे कुठलेच साधन नाही. त्यांना निर्वाहाचे काहीतरी साधन हवे. म्हणून नेवाडा राज्याने जुगाराला कायद्याने मान्यता दिली आणि कसिनो काढण्यास आपल्या नागरिकांना परवानगी दिली. त्या काळात अमेरिकेतील अन्य सर्व राज्यात कायद्याच्या दृष्टीने जुगार हा दंडनीस अपराध होता. जुगाराला राजरोस मुभा मिळाल्याने अमेरिकेच्या इतर राज्यांमधून लास वेगासला पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे येऊ लागले. त्यांच्या निवासाची उत्तम सोय करण्यासाठी एकापेक्षा एक भव्य हॉटेल्समध्ये नाना प्रकारचे चविष्ट खाद्यपदार्थही माफक दरात मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर पर्यटकांच्या रंजनासाठी आकर्षक करमणुकीचे कार्यक्रम ठेवण्याची कल्पनाही अंमलात आणली गेली.
जगभरचे नामवंत कलावंत, नृत्यकार, नकलाकार, जादूगार, अभिनेते तेथील पलोअर शोज् स्ट्रिपटीझ रेव्ह्यू वगैरे कार्यक्रमात भाग घेऊ लागले. एकाच वेळी शंभर (दोनशे) नर्तकांचा सहभाग असणारे भव्य नेत्रदीपक शो हे लास वेगासमधल्या प्रत्येक हॉटेलचे खास आकर्षण ठरले. त्यामध्ये नाना प्रकारचे ट्रिक सीन्स, बदलते रंगमंच, चमत्कृतीपूर्ण सजावटी वगैरेंचे प्रयोग होऊ लागले आणि या सर्व गोष्टींची माफक दरात लयलूट होत असताना आलेल्या पर्यटकांना अधिकच थ्रील वाटावे म्हणून एकेका हॉटेलात शेकडो स्लॉट मशीन्स बसवण्यात आली. एकाच प्रकारची तीन फळे एकाच रांगेत आली की जॅकपॉट म्हणून एक डॉलरचे पंचवीस-पन्नास डॉलर मिळू लागले. अशा जॅकपॉटमुळे पर्यटकांच्या खिशातून नोटावर नोटा निघू लागल्या आणि तासन्तास त्या मशीनच्या समोर बसण्यात पर्यटकांना धन्यता वाटू लागली. त्याचबरोबर पोकरसारखे पत्त्यांचे खेळ, केनो, रौलेट डझनवारी प्रकारचे खेळही सुरू झाले आणिलास वेगासच्या समृद्धीत भर घालू लागले. अमेरिकेतील इतर संस्थानात लग्न करणे आणि घटस्फोट घेणे यासाठी महिनाभर आधी नोटीस द्यावी लागते. लास वेगासच्या प्रशासनाने ही जाचक तरतूद रद्दबातल करून हव्या त्या क्षणी, हव्या त्या ठिकाणी लग्न करण्याची आणि घटस्फोट घेण्याची मुभा दिली. त्यामुळे अनेक चॅपेल्स व चर्चेस तेथे निघाली आणि तेथील चचंप्रमुखांनाही अमाप कमाईचे मार्ग राजरोस खुले झाले. या झटपट श्रीमंतीला पुढे अनेक फाटे फुटत राहिले. या शहरात रात्रंदिवस विद्युतदीपांचा झगमगाट उजळत राहिली. रात्रीही दिवसापेक्षा जास्त लखलखाट... या शहराला झोप नाही. कुठलाही कॅसिनो चोवीस तास चालू... तशात हूवर डॅममुळे येथील पाण्याचा प्रश्न सुटला. हे धरण हाही स्थापत्यशास्त्रातला चमत्काराच मानला जातो. अनावर बेधुंद कोलोराडो नदीला धरणाचा वेसन घालून पाण्याचा हा प्रश्न सोडवून लास वेगासला वाळवंटातील अद्भुत मायानगरीच बनवले गेले!
जगण्यातले थ्रील... जुगारातले थ्रील... मुक्त स्त्रीपुरुष प्रणयाचे रंगढंग...अल्पावधीत लक्षावधी डॉलर्स कमविण्याचे आमिष... लास वेगासला एकीकडे काही लोक पृथ्वीवरचे नंदनवन बनवत होते, तर दुसरीकडे सिनसिटी/पापनगरी म्हणून काही प्युरिटन तिला नाके मुरडत होते...तरीही लास वेगासची लोकसंख्या वाढत होती...आज लास वेगासची वस्ती तीस-पस्तीस लाखांच्या घरात आहे. अमेरिकेतील इतर शहरांच्या तुलनेने बरीच जास्त.. येथील दहापैकी आठ हॉटेल्स ही जगातील सर्वांत मोठ्या दहा हॉटेल्सच्या यादीत गणली जातात, एकेका हॉटेलमध्ये चार-सहा हजार खोल्या आहेत, आणि हजारो स्लॉट मशीन्स, पंधरावीस रेस्टॉरंटस् नाट्यगृहे, दुकाने...न्यूयॉर्क, पॅरिस, इंग्लंड, इजिप्त, व्हेनिस (इटली) शहरांच्या वा देशांच्या प्रतीकात्मक प्रतिकृती येथे तयार करण्यात आल्या आहेत. या शहराला तुम्ही वाळवंटातले नंदनवन म्हणा, अद्भुत मायानगरी म्हणा की पापनगरी म्हणा, तिची भूल सर्वांना पडते. जन्माला यावे आणि काशीला जाऊन जन्माचे सार्थक करावे. त्याचप्रमाणे लास वेगासला जावे आणि त्या मायानगरीचे दर्शन घेऊन मनुष्य जन्माची संधी पुन्हा लाभावी असा संकल्प सोडावा, अशी या नगरीची जादू आहे. विलक्षण जादूनगरीवर मराठीत आजवर फुटकळ प्रवासवर्णनात्मक लेख अधूनमधून वाचायला मिळत होते. परंतु स्वतंत्र पुस्तक मात्र निघाले नव्हते. ती उणीव आता डॉ. अनंत लाभसेटवार यांनी ‘अमेरिकेतील पापनगरी : एक वारी' हे पुस्तक लिहून भरून काढली आहे. डॉ. अनंत लाभसेटवार हे गेली तीस-पस्तीस वर्षे अमेरिकेत राहतात. पेशाने संशोधक पण पुढे एक बँकही त्यांनी अमेरिकेत खरेदी केली आणि शॉपिंग मॉल्सचेही सौदे त्यांनी केले. एक हजार एकरात शेती केली, आकाशवाणी केंद्र चालवले. त्याबद्दल त्यांनी मोकळेपणाने आपल्या ‘अमेरिकेतील धावपळ' या आत्मकथनात बरेच काही सांगितले आहे.
त्या कमाईतून एक कोटी रुपयांचा एक धर्मादाय ट्रस्ट नागपूरला काढून मराठी लेखकांना आणि लोकसंख्या नियंत्रण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना लाखालाखाचे पुरस्कार देण्याचा उपक्रम चालू केला आहे. अमृतमध्ये डझनावारी लेख लिहून अमेरिकेतील जीवनाचे वेगवेगळे रंगढंग आणि अंतर्विरोध टिपले आहेत. लाभसेटवारांचे एक बलस्थान म्हणजे त्यांचे चौफेर निरीक्षण आणि दुसरे बलस्थान म्हणजे त्यांची मिश्किल विनोदबुद्धी. स्वतःला विनोदविषय बनवण्यात ते कधीच हात आखडून घेत नाहीत, त्यामुळे त्यांचे लेखन हे अघळपघळ गप्पांच्या मैफलीसारखे रंगते. इ.स. २००४ मध्ये चार दिवसांचा लास वेगासचा दौरा डॉ. लाभसेटवार यांनी पत्नीसह केला. सेंट मार्व चौक, इटालियन स्थापत्यशास्त्राचे नमुने... चार हजार खोल्या... १९९७ ते १९९९ या दोन वर्षांत संपूर्ण बांधकाम... सभा संमेलनांसाठी १९ लक्ष चौ. फुट वातानुकूलित दालने... २.३ एकर विस्ताराचे जुगारगृह... २०० जुगार यंत्रे... आरंभी ३ हजार खोल्या (आता आणखी ३००० लोकांची भर) जगातले सर्वांत मोठे हॉटेल २.३ अब्ज डॉलर्स खर्च... या हॉटेलचा मालक शेल्डन ॲडल्सन... व्हेनिसची प्रतिकृती करण्याची कल्पना... पहिल्याच वर्षांत शेअर्स भाव वाढून ॲडल्सनचे भांडवल १४ अब्ज डॉलर्स झाले. इ. वर्णन त्यांनी मनोरंजकपणे केले आहे. व्हिनिशियन हॉटेलमध्ये चौथ्या मजल्यावर छान तलाव... यात केलेला जलतरणाचा कार्यक्रम...अमेरिकन स्त्रियांचा धीटपणा...जास्तीत जास्त अंगप्रदर्शन करून आपलं शरीर सौष्ठत्व उधळण्यात त्यांना वाटणारा आनंद...आपल्याकडे तरुणाचं लक्ष वेधून घेणं हाच त्यांचा उद्देश...आपल्या शरीर प्रदर्शनाकडे कुणी त्रयस्थ माणूस बघत असेल तर त्यांना त्यात काही वावगं वाटत नाही. कोणी बघत असले तरी त्याचं भान अमेरिकन नारीला नसते...स्त्रीसुलभ लज्जा व सोज्वळता अमेरिकन नारीमध्ये सापडत नाही. लासवेगासमध्ये कितीतरी प्रकारची पापं घडतात हे माहीत असलं तरी त्या एकट्याने यायला तरुण मुली भीत नाहीत. उलट ते आव्हानासारखं मानतात. त्या नगरीची अनेकविध वैशिष्ट्ये त्यामुळे लक्षात येतात. लास वेगासला भेट देण्याची ओढ लागावी अशी लाभसेटवार यांच्या लेखणीची एकूणच किमया आहे.
अमेरिकेतील पापनगरी लेखक : डॉ अनंत लाभसेटवार
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठे १६८ भाषा : मराठी
संस्करण. : दुसरी आवृत्ती . /२०१७
मूल्यं :- २२५/-
-सौ. मनिषा राजन कडव