न्यायालयाचे आदेश डावलणारी राजकीय बॅनरबाजी !

पालिका प्रशासन, नगर परिषदा एकीकडे नगर-शहरांचे आणि गावांचे सौंदर्य वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत, तर दुसरीकडे रस्त्यांवर होर्डिंग्स लावून परिसर बकाल करण्यामध्ये राजकीय पक्षांत  चढाओढ लागलेली पहायला मिळते आहे. मुंबई विद्रूप करणाऱ्या राजकीय बॅनरबाजीवर थेट उच्च न्यायालयानेच बंदी घातली आहे. तरीही बॅनरबाजी करणाऱ्या मंडळींवर तिळमात्र फरक पडलेला नाही.

शहरे आणि गावांत नाक्यानाक्यांवर लावण्यात येणाऱ्या बेकायदेशीर होर्डिंग्समुळे शहरांचे आणि गावांचे विद्रुपीकरण होत असल्याचे उच्च न्यायालयाने प्रशासनाच्या वेळोवेळी लक्षात आणून दिले आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांचे अभिनंदन करणाऱ्या होर्डिंग्स सर्वत्र लावण्यात येतील हे लक्षात घेऊनच उच्च न्यायालयाने राज्य सरकार, महापालिका, नगर परिषद आणि पोलिसांना सतर्क राहून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच दिले होते. न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न केल्यास त्यास युडीडीचे प्रधान सचिव, पालिका आयुक्त, नगर पालिका प्रशासनाचे संचालक, जिल्हाधिकारी, पोलीस आस्थापना, मुख्य कार्यकारी अधिकारी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील असेही न्यायालयाने बजावले आहे. असे असतानाही निवडणूक निकालानंतर त्याच रात्री सर्वत्र विजयी उमेदवारांचे अभिनंदन करणारे होर्डिंग्स शहरासह गावागावांत दिसून आले. यातील बरेचसे होर्डिंग्स हे विजयी झालेल्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने स्वतः लावलेले नाहीत, तर समाजातील त्यांच्या हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वखर्चाने लावले आहेत असे होर्डिंग्सवरील शुभेच्छुकांची नावे आणि चेहरे यावरून दिसून येत असले तरी प्रत्यक्षात ते कोणाकडून प्रायोजित केले जातात हे सर्वांनाच ठाऊक आहे.

निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून देऊन जनतेने त्यांचे प्रतिनिधी निवडले आहेत; मात्र विजयाच्या उन्मादात न्यायालयाच्या आदेशांनाच डावलले जात असेल, तर ही मंडळी आपल्या कार्यकाळात कायद्याचा योग्य तो मान ठेवतील का, अशी शंका मनात आल्यावाचून रहात नाही. निवडून आलेले लोकप्रतिनिधी जसे आनंदात असतात तसे त्यांचे शब्द झेलणारे, यांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्या शब्दाखातर काहीही करण्याची तयारी असणारे त्यांचे कार्यकर्तेही आनंदात असतात. या आनंदाच्या भरात लावण्यात आलेल्या होर्डिंग्सबर कारवाई करणे म्हणजे त्यांच्या रोषाला सामोरे जाणे हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माहित असल्याने हे सर्व अनधिकृत आहे आणि त्यावर कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत हे माहित असतानाही कोणीही त्यावर कारवाई करण्यास धजावत नाहीत.
काही ना काही निमित्त साधून राजकीय पक्षांकडून नाक्या-नाक्यांवर होर्डींग्स, बॅनर्स आणि फलक लावणे आता नित्याचे झाले आहे. केवळ शहरांतच नव्हे तर ग्रामीण भागातही ही क्रेझ आज कायम आहे. पालिका प्रशासन, नगर परिषदा एकीकडे नगर-शहरांचे आणि गावांचे सौंदर्य वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत, तर दुसरीकडे रस्त्यांवर होर्डिंग्स लावून परिसर बकाल करण्यामध्ये राजकीय पक्षांत  चढाओढ लागलेली पहायला मिळते आहे. मुंबई विद्रूप करणाऱ्या राजकीय बॅनरबाजीवर थेट उच्च न्यायालयानेच बंदी घातली आहे. तरीही बँनरबाजी करणाऱ्या मंडळींवर तिळमात्र फरक पडलेला नाही. सण, उत्सव जवळ आले की ही बॅनरबाजी जोमात असते. नाक्यांवर लावण्यात येणारे बहुतांश होर्डिंग्स आणि बॅनर्स विनापरवाना लावलेले असतात. पुढाऱ्यांतील कलह आणि राजकीय पक्षांतील वादही बऱ्याचदा या बॅनरबाजीतून चव्हाट्यावर आणले जातात. त्यांना उत्तर देण्यासाठी पुन्हा दुसऱ्या पक्षाकडून बॅनरबाजी केली जाते. अनधिकृतपणे  केलेल्या बॅनरबाजीवरसुद्धा अनेकदा या राजकीय मंडळींकडून अधिकार दाखवले जातात.

अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचे प्रसंगही मुंबईत अनेकदा घडले आहेत त्यामुळे न्यायालयाचे आदेश असूनही अशा अनधिकृत बॅनरबाजीवर कारवाई करताना पालिका कर्मचाऱ्यांवर बंधने येतात. आपल्या पक्षाचे होर्डिंग काढून त्याजागी दुसऱ्या पक्षाने होर्डिंग लावले म्हणूनही कार्यकर्त्यांमध्ये भांडणे आणि मारामाऱ्या होतात. ज्याचा ताण विनाकारण पोलीस प्रशासनावर पडतो. सण-उत्सवांव्यतिरिक्त राजकीय पुढाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे वाढदिवस, विवाहसोहळे या निमित्तानेही वर्षाचे बारा महिने बॅनरबाजी सुरूच असते. परिसरात कोणी मंत्री, राजकीय पुढारी, महनीय व्यक्ती येणार असेल तेव्हा प्रमख रस्त्यापासून समस्त परिसर होर्डिंग्स आणि बॅनर्सने भरुन टाकला जातो. या बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे, न्यायालयाकडून त्यावर वेळोवेळी ताशेरे ओढले जात आहेत याबाबत राजकीय नेतेमंडळींना पूर्णपणे कल्पना असूनही कोणताही राजकीय नेता आपल्या कार्यकर्त्यांना अशी बॅनरबाजी न करण्याबाबत सांगत नाही. त्यामुळे ही पोस्टरबाजी थांबणार तरी केव्हा असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.  
जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

महाविकास आघाडीच्या पराभवाची वस्तुनिष्ठ कारणे