उड्डाणपुल, फुटपाथवरील बेघरांवर महापालिका-पोलिसांची धडक कारवाई
मंतरलेलं प्रशिक्षण..!
नवीन पदावर कार्य करण्यास नवीन ऊर्जा मिळावी; नियमांची उजळणी व्हावी व प्रभावी कार्यालयीन कामकाज पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांनी करावे म्हणून शासन अशा सर्वच अधिकाऱ्यांना यशदा-पुणे, वनामती-नागपूर, प्रबोधिनी-पैठण तसेच प्रबोधिनी-अमरावती अशा नामांकित ठिकाणी राज्यस्तरावरून प्रशिक्षणाचे आयोजन करते.
पदोन्नती म्हटलं की नोकरी करणाऱ्या बहुतांशी जणांना हवीहवीशी वाटणारी गोष्ट अन् जिव्हाळ्याचा विषय. सर्वच माणसांचं मन काही केल्या एका जागेवर रमत नाही; मग अधिकारी तरी त्याला कसे अपवाद असतील? म्हणून कोणत्याही नोकरीत पदोन्नतीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. त्यात कधी कोणी वयाच्या लवकर तर कोणी उशिरा पदोन्नत होत असतात.
तसं पाहिलं तर पदोन्नती झाल्यावर वर्षभराच्या आतच हे प्रशिक्षण होणं गरजेचं असतं; परंतु प्रशिक्षणार्थींची संख्या व राज्याची ध्येय धोरणे तसेच अतिमहत्त्वाच्या काळात उदा. सार्वत्रिक निवडणुका अशांमुळे ते विहित कलमर्यादेत अधिकाऱ्यांना देण्यास प्रशासनाला थोडं जड जातं. मला या प्रशिक्षणास २ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२४ या कालावधीत संधी मिळाली ती डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी अमरावती येथे ! बऱ्याच बॅचेस यशदा-पुणे, पैठण (जायकवाडी)-प्रबोधिनी, वनामती-नागपूर येथे महिना दोन महिना अंतराने सुरू होत्या. तसं पाहिलं तर माझा अमरावतीला नंबर लागला म्हणून मी थोडा नाखुशच होतो. कारण माणसाला एकदा एका ठिकाणी राहायची सवय लागली म्हणजे ते ठिकाण इतक्या दिवस सोडायचं अन् नवीनच ठिकाणी राहायचं याचं खूप टेन्शन असतं तसंच माझंही झालं.
जवळपास महाराष्ट्रातल्या एकूण ११० पदोन्नत झालेल्या कृषी अधिकाऱ्यांची बॅच होती. यादीवर सहज नजर फिरवली तर कृषी पर्यवेक्षक पदावर असताना संघटनेत कामकाज केल्याने बऱ्यापैकी महाराष्ट्रातले मित्र ओळखीचे होते म्हणून जरा बरं वाटलं. औरंगाबाद विभागाचे पण हरिभाऊ कातोरे, प्रशांत गोसावी अन् कल्याण शेजुळ असे आम्ही चौघेजण पहिल्या दिवशीच म्हणजे दोन डिसेंबरला सकाळी सातला छत्रपती संभाजीनगरहून निघालो. जायला थोडा उशीर झाला म्हणजे जवळपास दुपारचा १ तरी वाजला असावा. ५५ जणांच्या शिवनेरी वर्ग व देवगिरी वर्ग अशा दोन बॅचेस केल्या होत्या.
मुख्य दरवाजातून आत जातानाच नोंदणी तसेच ”वर्ग सुरू झालेत लवकर जा; उशीर झाला तर तुम्हाला जॉईन करून घेणार नाहीत.” अशी प्रवेशातच माहिती मिळाली. आतापर्यंत अनेक ठिकाणी प्रशिक्षण झालेत त्याप्रमाणे इथेही असेल असा गोड गैरसमज आम्हा चौघांचाही होता; परंतु मनात होतं त्यापेक्षा इथलं वातावरण खूपच वेगळं होतं. उशीर झाला म्हणून थेट आयुक्तालयात फोन करून विनंती केली म्हणून आम्हाला सामावून घेतलं आणि तेव्हाच आम्हाला अमरावतीच्या प्रबोधिनीची शिस्त समजली. दुपारचे वर्ग जेवणानंतर सुरू होणार होते म्हणून जेवण केलं अन् आम्ही वाटप केल्याप्रमाणे ‘शिवनेरी' अन् ‘देवगिरी' अशा वर्गांत जाऊन बसलो अन्खऱ्या अर्थाने प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
संध्याकाळी रूमवर आल्यावर अन्मेसला जेवताना बरेचजण भेटले तेव्हा कोण म्हणायचं ”लै कडक बुवा; एवढं कुठं असतं का?” तर दुसरा, ”शेवटपर्यंत आपली कड लागायचं अवघड दिसतंय!” तर तिसरा, ”लै धारेवर धरलंय यांनी आपल्याला!” अशी चर्चा करत दुसऱ्या दिवशी सकाळीच सहा वाजताच योग वर्गाला जायचं होतं म्हणून त्या दिवशी जेवणं आटोपून आम्ही सर्वजण झोपी गेलो. सगळ्यांसाठी ते ठिकाण नवीन होतं म्हणून काहींना झोप लागली तर काहींना पुढचे दहा-बारा दिवस कसे जातील याची चिंता सतावत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळीच साडेसहाला बुटे सरांनी योगाचा श्वासावर नियंत्रण ठेवत वर्ग सुरू केला तसं आमचे इतरही दिवसभराचे वर्ग अगदी वेळेवर आणि प्रसन्न वातावरणात होऊ लागले. सकाळचा योगा त्यानंतर नाश्ता दुपारी दीड वाजेपर्यंत दोन वर्ग मध्ये मध्यान भोजन आणि नंतर पुन्हा संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत दोन वर्ग व पुढे रूमवरचा थोडा आराम आणि रात्री आठला संध्याकाळचं जेवण अन् मग कॉटवर पडताक्षणी झोप अशी आमची दिनचर्या सुरू झाली. पटपट दिवस कसे गेले अन् रविवार आला म्हणून आम्ही प्रबोधिनीला मेळघाटला जायचं अशी विनंती केली अन् एक दिवस त्यांनी आम्हाला परवानगी दिली अन् आम्ही बरेच प्रशिक्षणार्थी ज्याच्या त्याच्या सोयीने सकाळीच मेळघाट गाठलं.
मेळघाट म्हटलं की घनदाट जंगल अन् तिथले वाघ लगेच डोळ्यासमोर येतात. लहानपणापासून भूगोलाच्या धड्यात चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अन् मेळघाटचं जंगल वाचलेलं बघायचा योग खूपच वर्षांनी आला. अमरावतीच्या निवासी प्रशिक्षणासाठी राहण्याचा योग आला म्हणून जमलं. नाहीतर खास करून इथं मेळघाटला कोण येतंय अन् आम्ही सर्व चाळीशीच्या वरची अधिकारी मंडळी पण इथं या अगोदर फार थोडी जण येऊन गेली असतील.
आठवड्याची सुरुवात झाली तेव्हापासूनच मनाशी चिखलदरा अन् मेळघाट व्याघ्र प्रकल्प पाहण्याचं आम्ही मित्रांनी ठरवलं. रीतसर सफारीचं बुकिंग दोन दिवसांपूर्वीच केलेलं असल्याने बाकी टेन्शनचं काम मिटलं होतं. शनिवारपर्यंत सलग तासिका झाल्यावर आम्ही सर्व प्रशिक्षणार्थींनी प्रबोधिनीतून रीतसर परवानगी घेऊन रविवारी पहाटे ४ वाजता मेळघाटला निघायचं ठरवलं. तसं पाहिलं तर वर्षभरात उमरेड भिवापूरचं जंगल, पेंच व्याघ्र प्रकल्प अन्आता मेळघाट अशी माझी ही तिसरी जंगल सफारी होती.
पहिल्यांदा जानेवारीत जेव्हा भिवापूरला गेलो तेव्हा संध्याकाळची जंगल सफारी केली. दिवसभर आपापल्या शिकारीच्या शोधात थकून भागून पशुपक्षी भटकत संध्याकाळचे वेळी सफारीत बरेच जणांना दिसतात असं त्यावेळी आमचे मित्र मार्कंड खंडाईत यांनी आम्हाला सांगितलं. संपूर्ण जंगल सफारीत त्यावेळी आमची घोर निराशा झाली. पूर्ण सफारीत तेंव्हा फक्त एक पांढरं मांजर सोडून आम्हांला काहीही दिसलं नाही. शेवटी आपल्या नशिबात नाही म्हणून आम्ही तसंच माघारी फिरलो.
मार्च २४ उन्हाळ्यात असंच सावनेर, पारशिवनी अन् रामटेक असा तीन तालुक्यांना आंतरविभागीय सूक्ष्म सिंचन तपासणीच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. म्हणून कामात काम पेंच धरण प्रकल्प व व्याघ्र प्रकल्पही बघायची संधी आली म्हणून आम्ही थेट कोलीतमारा येथे आदल्या दिवशीच रात्री मुक्कामाला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळची जंगल सफारी आम्ही नक्की ठरवली होती. त्याप्रमाणे सकाळी वेळेच्या अगोदरच आम्ही जिथं मुक्कामाला होतो तिथं रेस्ट हाऊसच्या समोर गाडी येऊन थांबली अन् बरोबर सकाळी ६ वाजेला आमची जंगल सफारी सुरू झाली.
कोलीतमाऱ्याच्या पुढं खरी जंगलाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात जसजसं आम्ही पुढे जाऊ तसतसं चितळ, सांबर, घुबड, गरुड, स्पायडर, रानडुक्कर असे अनेक प्राणी दर्शन देऊ लागले. खरं एवढ्या लांब आलो ते वाघोबा पाहण्यासाठी परंतु अजून काही मेळ बसत नव्हता. गाईडने जंगलाची बरीचशी माहिती दिल्यावर एका निर्जन ठिकाणी गाडी थांबली. आजूबाजूला एकदम किरर्ररर अंधार अन् भयानक शांतता पसरलेली. वाटलं होतं आजूबाजूचा जवळपास अर्धा किलोमीटर परीघातलं स्पष्ट दिसायचं म्हणून गाईडने गाडी थांबवली होती. लांबूनच रानडुकरांची एक टोळी त्यानं पळताना आम्हाला दाखवली.
थोडं पुढं गेल्यावर गाईडने आम्हाला वाघाच्या पावलांचे ठसे दाखवले म्हणून आम्ही थोडं आशादायी नजरेने जंगलात वाघ दिसतोय का कुठे? असं बघत पुढे चाललो होतो तेवढ्यात अचानक गाईडने ”गाडी थांबवा.” अशी ड्रायव्हरला सूचना केली अन् गाडीच्या बाजूला पडलेल्या लेंड्यांकडे बोट करून दाखवत ,”ही वाघाची लेंडी!” आम्ही सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडेच बघत होतो. यांनी वाघ दाखवायचा दिलं सोडून अन् हे काय लेंड्या दाखवताय म्हणून मनाला खूप वाईट वाटलं अन् आम्ही माघारी फिरलो. तिथं पेंचला वाघ जरी दिसला नाही तरी चितळ, सांबर, रानडुक्कर, गरुड, स्पायडर, पेंचच्या पाण्यातली मगर असे बरेच प्राणी दिसले म्हणून काही वाटलं नाही; परंतु इथं प्राण्यांमध्ये आम्हाला फक्त गवा दिसला म्हणून आम्ही थोडं नाराज झालो; पण करणार काय? मी मेळघाटची तुलना थोडी पेंचशी केली म्हणून आम्ही इथल्या घनदाट जंगल सफारीतून फिरलो याच आनंदात माघारी फिरलो. येताना ज्यांनी त्यांनी ज्यांच्या त्यांच्या सोयीने जेवणं केली अन् पुन्हा मुक्कामाला प्रबोधिनीत आलो.
संध्याकाळच्या जेवणात प्रत्येक ग्रुप मेळघाट सफरीचे अनुभव एकमेकांना सांगत होता. त्यात एका ग्रुपला अस्वल दिसलं, काहींनी हत्तीवरची सफारी केली. तर काहींनी नुसतच घनदाट जंगल पाहिलं म्हणून तो दिवस खुशीत गेला, असं म्हणत मेळघाटच्या सफारीला पूर्णाविराम दिला.
दुसऱ्या दिवशी सोमवारपासून पुन्हा आमचे वर्ग सुरू झाले अन् दिनचर्या खूपच व्यस्त होऊन गेली. शुक्रवार कसा आला ते अजिबात समजलं नाही. शेवटच्या दिवशी सकाळीच सहा वाजेला यादव तरटे सरांनी फिरून दाखवलेली बांबू गार्डन खूपच अप्रतिम वाटली. वन खात्यातल्या ‘सलीम या वनरक्षकाने तीस वर्षांपूर्वी बांबू आणि त्याच्या विविध प्रजातींच्या संकलन व जोपासना या एका मनातून केलेल्या उपक्रमाची फलश्रुती काय असू शकते हे देशाला दाखवून दिलं. नंतर असं समजलं की असं भव्य दिव्य बांबू गार्डन देशभरात अमरावती येथेच आहे म्हणून ते पाहिल्यावर मला खूप बरं वाटलं. देशभरातल्या विविध प्रजातींच्या बांबूंची बेटे,पशुपक्षी, फुटका तलाव युरोपातून स्थलांतर करून आलेले पक्षी घनदाट जंगल पुन्हा एकदा नजरेस पडलं. पूर्वेकडे तलाव बघताना नुकताच विलोभनीय सूर्योदय अन्पक्ष्यांचा किलबिलाट शांततेत अनुभवला अन् आम्ही माघारी प्रबोधिनीला आलो.
शेवटचा दिवस आमच्यासाठी खरंच कुतूहल निर्माण करणारा होता. अजून थोडे दिवस प्रशिक्षण चालावं असं मला तरी वाटत होतं. पण इकडं थांबून शासकीय कामकाज तिकडं ठप्प कसं पडू द्यायचं म्हणून विहित कालमर्यादा संपली अन् आम्हां सर्वांना निरोप समारंभासाठी एकत्र बसवलं. मनोगतात प्रबोधिनीने त्यांनी आम्हाला जास्त व्यस्त कशामुळे ठेवलं याचं सविस्तर मार्गदर्शन केलं अन् प्रशिक्षणार्थींच्या वतीने दोघा-तिघांना बोलण्याची संधीही दिली होती.
प्रबोधिनीत प्रवेश करतानाचा दिवस व आज सोडून जातानाचा दिवस निश्चितच वेगळा भासत होता. प्रत्येकाला या बारा दिवसांत योगापासून तर कार्यालयीन कामकाजाचे नियम कायदे शिकल्यामुळे आपल्यात झालेले बदल निश्चितच बदलल्याची जाणीव होत होती. नक्कीच हे प्रशिक्षण मंतरलेलं आहे अशी सर्वांना पदोपदी जाणीव होत होती. गुण्यागोविंदाने एकत्र राहून प्रत्येक जण आपापल्या घरी निघाला होता अन् मलाही शब्द फुटत होते..
तन मन आमुचे धन्य जाहले
प्रबोधिनीत राहता राहता १
हसत खेळत शिकलो आम्ही
नियम इथले पाळता पाळता २
तंदुरुस्ती दिल्ली आम्हां योगाने
दीर्घ श्वास घेता घेता ३
अहो सरले दिवस मंतरलेले
इथले क्षणात बघता बघता ४
आभार कसे मानू शब्दांत
वंदना आमुचे जाता जाता ५
-निवृत्ती सयाजी जोरी, मंडळ कृषी अधिकारी, फुलंब्री