मना सज्जना नियमित लेखमाला

तुका म्हणे ऐसे आयुष्य नासिले। पाप ते संचिले पतनासी
या जगात कोणालाही सर्व काही मिळत नाही. जे मिळाले त्याचे समाधान न मानता जो न लाभलेल्या वस्तु, व्यक्ती, परिस्थितीचा हव्यास करतो, लाभ न झाल्यास शोक करतो, त्याचे अंतःकरण नेहमीच अशांत राहते. क्रोध, संताप, अपमान, दुःख या भावनांनी क्षुब्ध राहते.यातून त्याचे कल्याण तर होत नाहीच; उलट अधःपतन मात्र होत जाते.

अती मूढ त्या दृढ बुधी असेना।
अती काम त्या राम चित्ती वसेना।
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा।
अती विषई सर्वदा दैन्यवाणा । श्रीराम ६४।

   जो अति मूर्ख असतो त्याची बुध्दी स्थिर राहत नाही. ज्याच्या मनात अति कामना असतात. त्याच्या चित्तात भगवंताचे स्मरण ठरत नाही.जो अति लोभी असतो त्याला कधीही समाधान लाभत नाही. तो सदा अस्वस्थ राहतो.जो अति भोगी असतो, ज्याला देहसुखाची अत्यंत लालसा असते. तो सदैव लाचार असतो. बहुमोल नरदेह लाभून देखील एखादा जीव असा दैन्यवाणा, लाचार का होतो याचे विश्लेषण समर्थ करीत आहेत.

इतर प्राण्यांपेक्षा मनुष्याचा देह अधिक प्रगत आहे.त्याला बुध्दीची विशेष देणगी आहे. भाषेचे विशेष वरदान आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी पानांचे घरटे बांधणाऱ्या छोट्या पाखराला उद्देशून म्हणतात, "तिची उलुशीच चोच, तेच दात तेच ओठ। तुले दिले रे देवानं दोन हात दहा बोटं” आपल्या देहाची ही विलक्षणताकाय आहे,कशासाठी आहे, हे समजून न घेता जो अविचाराने वागतो त्याची अवस्था अतिशय केविलवाणी होते. जो अज्ञानी असतो, ज्याला आपल्या अज्ञानाची नम्र जाणीव असते तो एखाद्या समजुतदार माणसाचे सांगणे ऐकून घेण्यास तयार असतो. आपला अडाणीपणा दूर करून आपणही शहाणे व्हावे ही त्याची मानसिकता असते. पण जो मूर्ख असतो त्याला आपल्या मूर्खपणाची स्वीकृतीच नसते. आपले काही चुकते आहे, ते बदलले पाहिजे, सुधारले पाहिजे हा भाव त्याच्याकडे नसतो. अशा अतिशय मूढ माणसाकडे काहीही समजून घेण्याची पात्रता नसते. चांगले काही ऐकून घ्यावे ही मानसिकता नसते. कारण चांगले आणि वाईट यातला फरक कळण्यासाठी लागणारी विचारशक्ती, विवेकबुध्दी त्याच्यापाशी नसते. आपल्याला काही कळत नाही हेच त्याला मान्य नसते. अशा माणसाची बुध्दी अस्थिर असते. चंचल असते. भगवंत गीतेत म्हणतात, "व्यवसायात्मिकाबुध्दिरेकेह कुरूनन्दन। बहुशाखा ह्यनन्तार्श्च बुध्दयोऽव्यवसायिनाम २-४१)” हे कुरूनंदना ! व्यवसाय म्हणजे कार्याचा निश्चय करणारी बुध्दी, ह्या मार्गात एकाग्र असावी लागते. कारण ज्यांच्या बुध्दीचा अशाप्रकारे एकनिश्चय होत नाही, त्यांची बुध्दी म्हणजे वासना अनेक फाटे फुटलेल्या व अनेक प्रकारच्या असतात.

जगातील अनेक विषयांच्या मागे धावणारी बुध्दी ईश्वराचा निश्चय करून शकत नाही. ज्याला अति कामना असतात तो सतत त्या कामना आणि त्यांची पूर्तता यांच्या विचारात गुंतून राहतो. जगातील अनेक प्रकारच्या वस्तु, व्यक्ती, त्याला आकर्षित करतात. मोहात पाडतात. त्यांच्यापासून आपल्याला सुख लाभेल अशा भ्रमातअसलेला मूर्ख मनुष्य लाज, भय, नीती, मर्यादा सर्व सोडून अनैतिक वर्तन करतो. भ्रष्टाचार करतो. दुष्कर्म करणाऱ्या विषयांध माणसाला आपल्या ह्रदयस्थ सर्वसाक्षी परमेश्वराचे स्मरणही होत नाही. अशा करंटयाच्या चित्तात राम कायमचा वसेल ही अपेक्षा करता येत नाही. राम खरे तर प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी आहेच. पण काही थोड्या भाग्यवंतांनाच त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि नित्य राहते. स्वतःजवळ असलेल्या रामरूपी नित्य आनंदाची जाणीव नाही आणि विषयांमधील क्षणिक आनंद शोधण्यासाठी अविरत धडपड सुरू आहे अशा लोभी, हावरट माणसाला कधीही तृप्तीचा अनुभव येत नाही. कारण त्याच्या कामना कधीच संपतनाहीत. अजून हवे,अधिक हवे, हेही हवे अन्‌ तेही हवे अशी त्याची चंचल वृत्ती असते. या जगात कोणालाहीसर्व काही मिळत नाही. जे मिळाले त्याचे समाधान न मानता जो न लाभलेल्या वस्तु, व्यक्ती,परिस्थितीचा हव्यास करतो, लाभ न झाल्यास शोक करतो त्याचे अंतःकरण नेहमीच अशांत राहते. क्रोध, संताप, अपमान, दुःख या भावनांनी क्षुब्ध राहते. यातून त्याचे कल्याण तर होत नाहीच, उलट अधःपतन मात्र होत जाते. समर्थ अशा अति विषयांध, अति लोभी, अति मूर्ख माणसाला दैन्यवाणा म्हणतात. कारण त्याची शारीरिक,मानसिक, सामाजिक परिस्थिती अत्यंत केविलवाणी असते. तो हरप्रकारे लाचार होतो. आरोग्य बिघडते, नीतीा विलयाला जाते, कुटुंबात-समाजात मानहानी होते, शरीर, मन, बुध्दीची कार्यक्षमता संपते. दिशाहीन,परावलंबी, अपमानित जीवन जगणे हा जिवंतपणीचा नरकवासच होय.

अशा करंट्या लोकांना ज्ञानेश्वरमाऊली गोचीडीची उपमा देतात. गायीच्या सडाला चिकटलेली गोचीड आचळांतून मिळणारे शुध्द दूध प्राशन नकरता त्वचेखालचे अशुद्ध रक्त प्राशन करते. हे तिचे कमनशीबच आहे. माऊली म्हणतात, ”तैसा ह्रदयामध्येमी रामू।असता सर्व सुखाचा आरामू। की भ्रांतासि कामू।विषयावरी (ज्ञा.९-६०) अंतःकरणात सर्व सुखाचाठेवा असा मी आत्माराम प्रत्यक्ष असताना मूर्ख लोक सुखप्राप्तीसाठी विषयांकडेच धाव घेतात. ह्या दीनलोकांचे दैन्य सरावे ही सर्वच संतांची तळमळ आहे. समर्थांचा ”मनोबोध” तेवढ्यासाठीच सुरू आहे.

। जय जय रघुवीर समर्थ ।
-सौ. आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण (माई)