उड्डाणपुल, फुटपाथवरील बेघरांवर महापालिका-पोलिसांची धडक कारवाई
कोकणातील नारळ लागवड
नारळ रोपांसाठी प्रत्येक खड्डा जंतुनाशक औषधी पावडरने स्वछ केला. त्यांत पांच-सहा नारळाची सोळणी पद्धतशीरपणे ठेवली. साधारण घमेलभर समुद्री पुळण (गोड्या पाण्याने धुतलेली) त्यांत पसरवली. नंतर अर्धा घमेले जुने वाळलेले शेण पसरवून घेतले. कुंपणीस लावलेली खताच्या झाडांची हिरवळ पानाचा थर पसरवून त्यावर लाल मातीचा थर दिला आणि अशा या लागवडीस तयार झालेल्या खड्ड्यात एक-एक करून नारळ रोप लावला. माणसानी कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं. उंच उंच वाढत रहावं.
१९७२ पर्यंत मी भाऊचा धक्का ते दाभोळ धक्का असा प्रवास केला आहे. दाभोळ बंदरात बोट येईपर्यंत किनाऱ्यालगत नारळाच्या असंख्य झाडांची लागवड दिसायची. हे दृश्य सुमारे ५४ वर्षे पूर्वीचे जुने आहे. नारळ झाडांची चक्क गचडी होईल एव्हढी तत्कालीन शेतकऱ्यांनी केलेली लागवड आजच्या प्रगत युगात जरा वेगळी वाटेल, पण हे सत्य आहे. प्रत्येक बंदरात ज्या-ज्या ठिकाणी रोहिदास, चंपावती, सेंट अंथोनी अशा आगबोटी प्रवाश्यांची ने-आण करत असत. त्या-त्या बंदरात माड लागवडीची रांग लागलेली असायची. मुंबई भाऊचा धक्का सोडल्यास पुढे जंजीरा-मुरुड, श्रीवर्धन, हर्णै ते थेट दाभोळ बंदरालगतचा जलप्रवास आठवतो. जसजसा खुष्कीचा मार्ग प्रगत होऊ लागला तसतसा कोकणी प्रवाश्यांचा बोटीचा प्रवास कायमचा बंद होत गेला. आजच्या पिढीला ती दृश्ये आजही गुगलवर पाहता येतील.
दापोलीतले कोकण कृषी विद्यापीठ आज सर्वत्र प्रगत कृषी युगाची ओळख म्हणून समजले जाते. आधुनिक शास्त्रीय पद्धत तसेच गतकाळातील रुढी-परंपरेने केली जाणारी कृषि लागवड ह्याची सांगड घालणारे तत्वज्ञान परिसरास सुजलाम सुफलाम करत आहे, हे निर्विवाद सत्य होय.
पस्तीस वर्षांपूर्वी जेव्हां मी बागायती शेती पूर्णवेळ करू लागलो तेव्हां "लागे ते न लागे, न लागे ते लागे” हे कृषि स्लोगन माझ्या वाचनात आले होते. जुन्या शेतकऱ्यांनी या क्षेत्रात मला बरेचसे मार्गदर्शन केले. मी या क्षेत्रात वेगळा प्रयोग करु इच्छित होतो. रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खतांकडे वळलो. विद्यापीठाकडून बाणवली, प्रताप, टी. डी. अशा विविध जातीचे मध्यम आकाराचे नारळ रोप विकत घेतले आणि त्याची लागवड एका विशिष्ट पध्दतीने करण्याचे ठरविले. तशी जमीन काहिशी खारट होती. नारळ लागवडीकरिता उत्तम असा शेरा मृदसंधारण विभागाकडून मिळाला होता. लागवडीसाठी उपयुक्त असे दोन बाय दोन बाय तीन (लांबी-रुंदी आणि खोली) असे खड्डे मारुन झाले. प्रत्येक खड्डा जंतुनाशक औषधी पावडरने स्वछ केला. त्यांत पांच-सहा नारळाची सोळणी पद्धतशीरपणे ठेवली. साधारण घमेलभर समुद्री पुळण (गोड्या पाण्याने धुतलेली) त्यांत पसरवली. नंतर अर्धा घमेले जुने वाळलेले शेण पसरवून घेतले. कुंपणीस लावलेली खताच्या झाडांची हिरवळ पानाचा थर पसरवून त्यावर लाल मातीचा थर दिला. आणि अशा या लागवडीस तयार झालेल्या खड्ड्यात एक-एक करून नारळ रोप लावला. रोप लावतांना त्याची ‘दक्षिण दिशा' जपली गेली पाहिजे, याची काळजी घेतली. हे जुन्या जाणकार शेतकऱ्यांचे शास्त्र होय! हे कुठल्या सिलॅबस मध्ये नसेल. माझ्या एकूण आयुष्यातील बारा वर्षे विदेशी नोकरीत गेली, ती सोडल्यास माझे संपूर्ण जगणे कोकणातील माझी मायभूमी कोळथर-पंचनदी ह्याच परिसरात झाले. इथले दगड-धोंडे, नदी-खाडी त्या लगतचे खाजण, समुद्री किनारा यातच मी रमलो. इथले रहिवासी मला ओळखतात, मी लोकांना ओळखतो. माझी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेची वास्तू आजही नवपिढीला ज्ञानदान करीत आहे. म्हणूनच माझ्या एकूण जगण्यावर इथल्या मातीचे ऋणानुबंध कायम आहेत. इथल्या काही रूढी परंपरा मी पाळतो. हे माझे वैयक्तिक मत आहे.
‘दक्षिण जपणे' म्हणजे ज्या ठिकाणी तो रोप नर्स केला गेला तेथील त्याची दक्षिण दिशा कोणती, ती आधीच खूण (मार्क) करून ठेवली की त्या रोपाची लागवड करणे सोपे जाते. दक्षिण जपलीच पाहिजे असा माझा आग्रह नाही. प्रायोगिक तत्वाने मला ते त्यावेळी गृहित धरावेच लागले. ज्याचा मला फायदा झाला. अंधश्रद्धा वगैरे हा विषय नसावा. मुळात अंधश्रद्धेसाठीसुद्धा श्रद्धा ही लागतेच. असो, तो विषय अलाहिदा.
आपल्याकडील नारळाची सोळणी तसेच जुन्या शेणाची पसरण यामुळे वरून दिलेले पाणी आत खोलवर जाऊन थांबते! रोपाच्या मुळांना ओलावा कायम मिळत राहतो. अशा तऱ्हेने सुमारे ४२ नारळी रोपे लावून झाली. त्यास साप्ताहिक एकवेळ पाणी देण्यात आले. पुढे एक मॉन्सून गेला. रोपांची वाढ समसमान होऊ लागली. रोपे हिरवीगार दिसू लागली. दक्षिण सांभाळली म्हणून रोपांची वाढ एकाच दिशेने झाली. हे महत्त्वाचे! कमीतकमी जागेत जास्त रोपे लागली तरीही गर्दी कुठेच जाणवली नाही. निसर्गाचा भाग म्हणून रानडुकरांचा त्रास सोसावा लागला. त्यामुळे ४२ पैकी १० रोपे दगावली गेली आणि ३२ रोपांनी पूर्णरूपी माड म्हणून आकार घेतला. (कोकणात नारळी झाडास माड असे म्हणतात). काही कृषि निरिक्षक आणि यज्ञ मंडळीसुद्धा येऊन गेली. स्वानुभवातून केलेली लागवड त्यांनाही आवडली.
नारळी रोपांची लागवड कशी व्हावी? त्याचे प्रत्यक्षिक करुन दाखविले. त्यावेळी एका दिवाळी अंकात त्यावर लेखही लिहिला होता. आजच्या पिढीने असा अनुभव घ्यायला हरकत नाही. कारण मुळातच कोकणातील जागा ही अपुरी असते शिवाय सरळ सपाट नसतेच. म्हणूनच लागे ते न लागे..अशा स्लोगनकडे शेतकऱ्यांनी लक्ष किती दयावे? हा ज्याचा त्याचा प्रश्न होय.
माणसानी कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं. उंच उंच वाढत रहावं. - इक्बाल शर्फ मुकादम