खाद्य पदार्थ विकताना ग्राहकांच्या भावनाही जपायला हव्यात !

आपण खरेदी करत असलेल्या मांसाहारी बर्गरमध्ये कोणाचे मांस वापरले आहे हे ठणकावून विचारले पाहिजे. गाय किंवा म्हशीचे मांस असलेले खाद्यपदार्थ त्याठिकाणी विकले जात नाहीत ना याबाबत खात्री करून घ्यायला हवी. हिंदुबहुल भागात असलेल्या अशा दुकानांमध्ये गाय किंवा म्हशीच्या मांसाचे कोणतेही पदार्थ आमच्याकडे विकले जात नाहीत अशा प्रकारचा फलक दर्शनी भागात लावण्यास प्रवृत्त करायला हवे.    

       कल्याण येथील ‘गुड पिलपिन बर्गर्स' या बर्गर्स विकणाऱ्या दुकानातील एक व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तेथील एका बर्गर प्रकारामध्ये म्हशीच्या मांसाचा वापर करण्यात येत होता आणि त्याबाबत ग्राहकांना कोणतीच सूचना दिली जात नव्हती; तसेच दुकानात किंवा मेन्यू कार्डात तसे स्पष्ट नमूदही केले गेले नसल्याचे एका हिंदु ग्राहकाने तेथील ग्राहकांच्या लक्षात आणून दिले आहे.‘हिंदू म्हशीचे मांस खात नाहीत. त्यामुळे बर्गरमध्ये म्हशीचे मांस वापरायचे असेल, तर त्याविषयी ग्राहकांना माहिती द्यायला हवी,' असे या हिंदु ग्राहकाने दुकानातील कर्मचाऱ्यांना सुनावल्याचे या व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे. कल्याण वायलेनगर येथील ‘गुड पिलपिन बर्गर्स' या दुकानात एक हिंदु ग्राहक पत्नीसमवेत गेला असतांना त्याने ‘बर्गर' मागितला. बर्गरमधील मांसाविषयी शंका आल्यावर त्याने दुकानातील कर्मचाऱ्यांना ‘बर्गर'मध्ये कोणत्या प्राण्याचे मांस आहे, अशी विचारणा केली. त्यावर कर्मचाऱ्याने बर्गरमध्ये म्हशीचे मांस असल्याचे सांगितले. त्यावर त्या हिंदु ग्राहकाने बर्गरची केलेली मागणी रद्द केली. त्यावेळी दुकानामध्ये अन्यही काही ग्राहक ‘बर्गर' खात होते; मात्र ‘बर्गर'मध्ये म्हशीचे मांस असल्याचे कळताच तेथे बसलेले सर्व ग्राहक उठून गेल्याचे व्हिडिओत दिसत आहे. काही हिंदु ग्राहकांनी त्यांनी दिलेली ‘बर्गर'ची मागणी रद्द करून पैसे परत घेतले.

मांस असलेले बर्गर खाण्यात हल्लीच्या तरुणाईला अधिक रुची असल्याने मांस असलेले बर्गर जवळपास सर्वच बर्गर्सच्या दुकानात उपलब्ध असतात; मात्र अशा बर्गर्समध्ये साधारणतः कोंबडीचे मांस वापरले जात असल्याचा समज असल्याने आपण घेत असलेल्या बर्गरमध्ये कोणाचे मांस वापरले आहे याबाबत कोणताही ग्राहक दुकानदाराकडे कधी चौकशी करत नाही. ‘गुड पिलपिन बर्गर्स'ची मुंबई आणि परिसरात एकूण २४ दुकाने आहेत. देहली, पुणे, बेंगळुरू या ठिकाणीही त्यांची दुकाने आहेत. ‘गुड पिलपिन बर्गर्स'मध्ये सुद्धा कोंबडीचेच मांस असते असे गृहीत धरून आजतागायत ग्राहक या ठिकाणचे बर्गर्स चवीने खात होते; मात्र जेव्हा सत्य लक्षात आले तेव्हा अनेकांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे.‘गुड पिलपिन बर्गर्स'ची बहुतांश दुकाने ही हिंदुबहुल भागात वसलेली आहेत. हिंदू म्हशीचे मांस खात नाहीत; मग म्हशीचे मांस असलेले बर्गर्स नक्की कोणाच्या जिभेचे चोचले पुरवण्याकरिता वापरले जाते असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. हिंदू ग्राहकाने मीट बर्गरची मागणी केली असता ग्राहक हिंदू आहे हे लक्षात आल्यावर त्याला दिल्या जाणाऱ्या बर्गरमध्ये म्हशीच्या मासाचा वापर केला जात असल्याचे ग्राहकाला सांगण्यातही येत नव्हते किंवा मेन्यू कार्डात तसे स्पष्ट नमूदही करण्यात आले नव्हते. आजतागायत कितीतरी हिंदू ग्राहकांनी या ठिकाणचे म्हशीचे मांस घातलेले बर्गर्स खाल्ले असतील. हिंदू ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना अंधारात ठेवून म्हशीचे मांस असलेले बर्गर्स खायला देणे ही केवळ फसवणूक नसून त्यांच्या धार्मिक भावनांचाही अनादर आहे. आजमितीला मॅकडोनाल्ड, केएफसी, बर्गर किंग अशा कितीतरी खाद्य कंपन्या आपल्या आउटलेट्‌समधून मांसाहारी बर्गर्सची विक्री करतात. मांसाहारी बर्गरमध्ये कोंबडीचे मांस आहे असे समजून ग्राहक डोळे बंद करून या ठिकाणचे मांसाहारी बर्गर चवीने खातात; मात्र ‘गुड पिलपिन बर्गर्स'मध्ये घडलेल्या घटनेवरून ग्राहकांनी जागृत व्हायला हवे. आपण खरेदी करत असलेल्या मांसाहारी बर्गरमध्ये कोणाचे मांस वापरले आहे हे ठणकावून विचारले पाहिजे. गाय किंवा म्हशीचे मांस असलेले खाद्यपदार्थ त्याठिकाणी विकले जात नाहीत ना याबाबत खात्री करून घ्यायला हवी. हिंदुबहुल भागात असलेल्या अशा दुकानांमध्ये गाय किंवा म्हशीच्या मांसाचे कोणतेही पदार्थ आमच्याकडे विकले जात नाहीत अशा प्रकारचा फलक दर्शनी भागात लावण्यास प्रवृत्त करायला हवे, त्याशिवाय या कंपन्या वठणीवर येणार नाहीत. भारतात बहुसंख्य हिंदू राहतात आणि हिंदूंना गाय पूजनीय असल्याने आम्ही भारतात बीफ बर्गर विकत नसल्याचे मॅकडॉनल्ड्‌स कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे, मग ‘गुड पिलपिन बर्गर्स'ने यातून अद्याप बोध का घेतलेला नाही. खाद्य पदार्थ विकणाऱ्या कंपन्या, हॉटेल्स आणि रेस्टोरंट आपला खप वाढवण्यासाठी पदार्थ खमंग आणि स्वादिष्ट बनवण्याकरिता अधिक भर देतात; मात्र हे पदार्थ ग्राहकांच्या धार्मिक भावना आणि आरोग्य जपणारे असायला हवेत याकडे ही मंडळी केव्हा लक्ष देणार ?  - जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भ्रष्टाचार निर्मूलन साऱ्यांचीच जबाबदारी