उड्डाणपुल, फुटपाथवरील बेघरांवर महापालिका-पोलिसांची धडक कारवाई
अश्रू
आत्तापर्यंत शेकडो कविता केल्या, अनेक पारितोषिके मिळवली, लोकांनी भरभरुन कौतुक केलं. छोटासा का होईना कवी म्हणून प्रसिद्धी मिळाली, तरीही माझी पहिली कविता आजही मला संदर्भासह लक्षात आहे ती म्हणजे ‘अश्रू' !
चोंढीसारख्या खेड्यातील शाळेतून पन्नास वर्षांपूर्वी मी अलिबाग शहरातील जे. एस. एम. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा माझ्याबरोबर माझा मित्र नंदू कर्वे आणि मैत्रीण शालू वेलणकर सुद्धा होती. आम्ही तिघेही अगदी पहिलीपासून बरोबरचे. तिघांनीही पी डी. कॉमर्सला ॲडमिशन घेतल्याने एकत्रच असलो तरी खेडं आणि शहर यातला फरक सतत जाणवायचा. शाळेत रुबाबात वावरणारा मी, तिथे मात्र थोडा बावरलेला, बुजलेलाच होतो. मनात कुठे तरी कमीपणा असल्याची भावना नि खंत वाटत राहायची. ती व्यक्त करण्याची संधी मिळाली ती कॉलेजच्या स्नेहसंमेलन निमित्ताने.
माझ्या मनातील भावना मी शब्दबद्ध केल्या एका कवितेत. आयुष्यातील पहिली वहिली कविता मी स्टेजवरुन सादर केली , जिचं नाव होतं ‘अश्रू'. ती अशी...
कां ? कोण जाणे
कधीतरी माझ्या डोळ्यातून
अचानकपणे ओघळतात
दोन अश्रू...
एक सुखाचा अन् दुसरा दुःखाचा
ओघळणारे अश्रू सुकून जातात
पण मन मात्र ओलावतं
पूर्वस्मृतींनी...
आणि
आठवू लागतो मी माझं पूर्वायुष्य
ज्यात मी म्हणजे कुणीतरी असतो
नि मन तुलना करु लागतं
वर्तमानाशी....
ज्यात मी कुणाचाच नसतो !
अगदी तुझासुद्धा...
सादरीकरणानंतर मित्रांनी आणि श्रोत्यांनी खूप कौतुक केलं. पण त्यांना कुठे माहीत होता त्यामागील अर्थ आणि मला जाणवत असलेलं दुःख ?
मनातील वेदना असोत किंवा आनंद, तो व्यक्त करण्यासाठी शेवटी अश्रूच येतात... कधी आनंदाश्रू तर कधी दुःखाश्रू. माणूस जसं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही तसंच पहिल्या कवितेचं असतं. आत्तापर्यंत शेकडो कविता केल्या, अनेक पारितोषिके मिळवली, लोकांनी भरभरुन कौतुक केलं. छोटासा का होईना कवी म्हणून प्रसिद्धी मिळाली, तरीही माझी पहिली कविता आजही मला संदर्भासह लक्षात आहे ती म्हणजे ‘अश्रू' ! - विलास समेळ