जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त सुलेखन प्रदर्शनातून अभिजात मराठीचा जागर
नवी मुंबई : 27 फेब्रुवारी रोजीच्या जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने 25 ते 27 फेब्रुवारी रोजी वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठी साहित्यातील वाचनीय कविता, विचार यांचे सुंदर हस्ताक्षरातील ' मायबोली मराठी - खुले सुलेखन प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिका आणि अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफी यांच्या संयुक्त विद्यमाने हे अक्षर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त अक्षर प्रदर्शन आयोजन करण्याच्या संकल्पनेला जगप्रसिध्द सुलेखनकार श्री. अच्युत पालव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून स्वत: सुलेखनकार अच्युत पालव यांच्या प्रमाणेच त्यांच्या अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफी मधील विद्यार्थीही यामध्ये सहभागी होत आहेत.
वाशी सेक्टर 16 येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पश्चिमेकडील बाजुला छत्रपती शिवाजी महाराज चित्रशिल्प वास्तू असून पुर्वेकडील बाजूस सार्वजनिक चौक आहे. याठिकाणी नागरिक, संस्था यांच्या मार्फत विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या सार्वजनिक चौक भागात 25 ते 27 फेब्रुवारी पर्यंत मराठी भाषेतील वाचनीय साहित्याचा सुलेखनाच्या माध्यमातून मायबोली मराठी या अभिनव उपक्रमाव्दारे जागर करण्यात येत असून या विनामूल्य प्रदर्शनाला भेट देऊन नागरिकांनी मराठी भाषेवरील प्रेम अधोरेखीत करावे असे आवाहन करण्यात येत आहे.