श्री गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वार भूमिपूजन सोहळा संपन्न
नवी मुंबई:- बेलापूर किल्ले गावठाण येथे श्री गोवर्धनी मातेचे प्रसिद्ध असे मंदिर असून अशा या मंदिरात दर्शनाला येण्यासाठी असंख्य भाविक ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येत असतात. अशा भाविकांना मंदिराला जाण्याच्या मार्गाची दिशा कळावी, याकरिता श्री गोवर्धनी माता मंदिराचे सुसज्ज असे प्रवेशद्वार एन.आर.आय. सागरी पोलीस ठाणे समोर पामबीच मार्गावर नवी मुंबई महापालिकेमार्फत उभारण्यात येणार आहे.
सदर प्रवेशद्वाराचे भूमिपूजन श्री गोवर्धनी माता मंदिर संस्थेच्या अध्यक्षा आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून संपन्न झाले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉ.राजेश पाटील, डॉ.जयाजी नाथ, संपत शेवाळे, अशोक गुरखे, दत्ता घंगाळे, गोपाळ गायकवाड, दीपक पवार, राजेश राय, विकास सोरटे, जयश्री चित्रे, न.मुं.म.पा.कार्यकारी अभियंता अजय संख्ये तसेच असंख्य ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते. सदर मंदिराचे प्रवेशद्वार हे दक्षिणात्य पद्धतीचे बांधण्यात येणार असून 39 लाख 34 हजार रुपयांचा अपेक्षित खर्च होणार आहे. मे.एस.आर.कंस्ट्रक्शन कंपनी सदर प्रवेशद्वार बांधणार असून 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत संपूर्ण बांधकाम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबईतील 400 वर्षापूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणजे श्री गोवर्धनी मातेचे मंदिर अशी अख्यायिका आहे. श्री गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवेकाळात झाली असून नवी मुंबईतील नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी आई म्हणून श्री गोवर्धनी माता प्रसिद्ध आहे. नवी मुंबईतील सोनार, ब्राम्हण, आगरी कोळ्यांची कुलदेवता असलेली भक्तांच्या हाकेला धावणारी व सर्व मनोकामना पूर्ण करणारी अशी श्री गोवर्धनी मातेची जनमाणसात ख्याती आहे. श्री गोवर्धनी मातेचे मंदिर हे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून मंदिराच्या जवळच असलेल्या शिवकालीन किल्ल्याचा संपूर्ण परिसर हिरवळीने नटलेला आहे. मंदिराच्या पाठीमागे विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभलेला आहे. अशा या मंदिरात दर्शनाला येण्यासाठी असंख्य भाविक कानाकोपऱ्यातून येत असतात. अशा भाविकांना मंदिराला जाण्याच्या मार्गाची दिशा कळावी, याकरिता पामबीच मार्गावर प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. आज विधीवत पूजा करून भूमिपूजन सोहळ्यास शेकडो भाविक उपस्थित राहिले त्याबद्दल आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी अनंता बोस, सुहासिनी नायडू, दर्शन भारद्वाज,जयवंत तांडेल, कल्पेश कुंभार, राजु तीकोने, श्रीराम घाटे, ज्योती पाटील, प्रियांका म्हात्रे, पांडुरंग आमले उपस्थित होते.