खारघर: खारघर मधील गोल्फ कोर्ससाठी धामोळे पाड्यालगत टेकडीच्या खोदकाम रोखण्यासाठी सिडकोकडे पत्र व्यवहार करा,असा सल्ला पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिल्याने ग्रामस्थाकडून करण्यात येणारे मानवी साखळी आंदोलन तात्पुरता स्वरूपात थांबविण्यात आले.
धामोळे या आदिवासी पाड्या लगत असणारा डोंगर जमीनदोस्त केला जात आहे. सिडकोकडून उर्वरित गोल्फ कोर्सचे काम हाती घेताना लागूनच असलेल्या टेकडीवर खोदकाम करून गोल्फ कोर्सचे काम केले जात असल्यामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. सदर टेकडी लगत असलेल्या जमिनीत ग्रामस्थ शेती,तसेच भाजीपाला पिकवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. डोंगर खोदकामामुळे गावाला भविष्यात धोका होवू शकतो.त्यामुळे सदर डोंगराचे खोदकाम थांबविण्यात यावे यासाठी ग्रामस्थांच्या वतीने मानवी साखळी आंदोलन करण्यासाठी रविवारी ग्रामस्थ एकवटले होते. ग्रामस्थ आंदोलन करीत असल्याची माहिती खारघर पोलिसांना प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे या घटनास्थळी भेट देवून सदर खोदकाम बंद करण्यासाठी नियमानुसार सिडकोकडे लेखी पत्र व्यवहार करा,तसेच कोरोना नियमामुळे विना परवानगी आंदोलन करू नये असा सल्ला दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते थांबविण्याचा निर्णय घेतला. सोमवारी जिल्हाधिकारी व सिडकोला पत्र देऊन सिडकोने हे काम कायमस्वरूपी थांबवण्यात यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.