समुपदेशनाद्वारे २१६ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळले

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात देखील विवाहित जोडप्यांमधील वादाचे प्रकार वाढु लागले आहेत. मात्र त्यांचे योग्य समुपदेशन केल्यास पुढील दुष्परिणाम टाळता येतात हे नवी मुंबई पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाने दाखवून दिले आहे. योग्य समुपदेशन केल्याने २०२१ या वर्षामध्ये २१६ जोडप्यांचे उधळले जाणारे संसार पुन्हा जुळविण्यात नवी मुंबई पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाला यश आले आहे.  

संशय, मोबाईलचा वापर, व्यसन, पाश्चिमात्य संस्कृती, पैशांची मागणी, शारीरीक व मानसिक त्रास अशा विविध कारणांमुळे विवाहित जोडप्यांमध्ये कौटुंबिक वाद निर्माण होत असल्याचे आढळुन आले आहे. हे वाद विकोपाला पोहोचत असल्याने अशी प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात आहेत. मात्र याचे परिणाम जोडप्यांसह लहान मुलांनाही भोगावे लागतात. रागाच्या भरात अशी प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात असल्याने अशी प्रकरणे उद्भवू नयेत यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाकडुन जोडप्यांमधील वाद समुपदेशनाद्वारे मिटवून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पती पत्नीला एकत्र बोलावून त्यांच्या मधील वादाची कारणे शोधुन तज्ञांद्वारे त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.  

महिला सहाय्य कक्षाकडे 2021 मध्ये एकुण 1038 अर्ज दाखल झाले होते. यापैकी 216 प्रकरणांमध्ये महिला सहाय्य कक्षाने जोडप्यांचे समुपदेशन करुन त्यांचे संसार पुन्हा   जुळविले आहेत. तसेच काही महिला पिडीतांना त्यांच्या अधिकाराची माहिती देवून त्यांना न्यायालयात दाद मागण्यासाठी कौटूंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण अधिनियमाअंतर्गत मदत केली आहे. तसेच काही पिडीत महिलांना पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याकरिता शिफारस पत्र देण्यात आले आहे. 

त्यानुसार 2021 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात 498 ए प्रमाणे 191 गुन्हे दाखल झाले आहेत. खास महिलांच्या मदतीसाठी असलेल्या नवी मुंबई पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाकडून कौटूंबिक हिंसाचाराच्या बाबतीत विविध प्रकारे समुपदेशन व सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी सांगितले.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मार्च महिन्यात मेट्रो सुरु