विकास कामांसाठी महाराष्ट्र सरकार मागे हटणार नाही

नवी मुंबई -: मुंबई मधून ज्या सेवांची  सुरुवात होते त्या सेवांचे अनुकरण संपूर्ण देशाला करावे लागते हा इतिहास आहे. देशातली पहिली वॉटर टॅक्सी सेवा आज आपण सुरू करत आहोत. सुरुवातीला ही वॉटर टॅक्सी बेलापूर ते भाऊचा धक्का आणि एलेफन्टा यांच्या दरम्यान धावणार असली तरी नंतर तिचा विस्तार वसई विरार पर्यंत करण्यात येणार आहे. जनतेला सुविधा देण्यासाठी उभा राहत असलेल्या प्रकल्पांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्राधान्य दिले गेले पाहिजे. जनतेच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार कधीही मागे हटणार नाही. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाला बलवान करण्यासाठी आम्ही सर्वांच्या सोबत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेलापूर जेटीच्या उद्घाटन प्रसंगी केले

केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत बेलापूर येथील आठ कोटी 38 लाख रुपये खर्च करून प्रवासी जेटी उभी करण्यात आली आहे. या जेटी चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीमध्ये आज दुपारी झाले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की पहिली रेल्वे सेवा मुंबई आणि ठाणे शहरात दरम्यान सुरू झाली होती. तिचे अनुकरण संपूर्ण देशभर झाले.त्याच धर्तीवर आज देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा आज सुरू होत आहे. समुद्रचा  उपयोग फक्त चौपाटीवर भेळ खाण्यासाठी आणि किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी होत नाही तर विकास कामांसाठी होतो. वॉटर टॅक्सी पाठोपाठ समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. हा प्रकल्प या तीन वर्षात मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हवाई मार्गामुळे मुंबई शहर हे संपूर्ण जगाशी जोडले गेले आहे. प्रवाशी जल वाहतुक हा शहराच्या अंतर्गत भागांना जोडणारा प्रमुख मार्ग ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी केंद्रीय जल वाहतूक मंत्री सर्बानंद सोनावाला, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, बंदरे विकास मंत्री असलम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, आशिष कुमार सिंह, राजीव जलोटा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, माजी विरोध पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक आदी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोने  खारघर हिल वरील नेचर पार्कचा प्रकल्प गुंडाळला