एपीएमसी कांदा बटाटा व्यापारी संप मागे घेण्याच्या तयारीत 

नवी मुंबई -: एपीएमसी कांदा बटाटा बाजारातील ५० किलो वजन हाताळणी तिढा सुरूच आहे, त्यामुळे माथाडी कामगार यांनी अतिरिक्त वजनाची हाताळणी करण्यास मनाई केली होती. त्यामुळे व्यापारी यांनी सोमवारी व्यवसाय बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र गुरुवारी माथाडी कामगार युनियन सरचिटणीस सी आर पाटील यांच्या समवेत व्यापाऱ्यांची  बैठक पार पडली . या बैठकीत माथाडी कामगारांनी ५० किलोपेक्षा अतिरिक्त वजन उचलण्यास संमती दर्शवली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सोमवारी पुकारलेला संप मागे घेण्याचा निश्चिय केला असून आज शुक्रवारी यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

   सोमवारपासून माथाडी कामगार यांनी अतिरिक्त वजनाची हाताळणी केली नव्हती त्यामुळे अतिरिक्त वजनाचा माल बाजारात पडून होता. यामध्ये शेतकरी आणि ग्राहक यांना वेठीस धरले जात आहे. तसेच शेतकरी आणि व्यापारी यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यापारी यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु गुरुवारी माथाडी युनियन सरचिटणीस आणि व्यापारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत जोपर्यंत इतर ३५० बाजार समितीत या नियमांची १००% अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत माथाडी कामगार यांनी ५० किलोपेक्षा अधिक वजन हाताळणीला सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली. याला माथाडी कामगार युनियन यांनी संमती दर्शवली असून सहकार्य करण्याचे मौखिक आश्वासन दिले आहे. त्यामुळे व्यापारी यांनी संप मागे घेण्याचा निश्चिय केला आहे. यावर आज दि. १८  शुक्रवारी पुन्हा बैठक घेण्यात येणार असून अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विकास कामांसाठी महाराष्ट्र सरकार मागे हटणार नाही