कोपरखैरणे बालमाता रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरू होणार
नवी मुंबई -:कोपरखैरणे सेक्टर २२ मधील माताबाल रुग्णालयाच्या जागेवर नवीन इमारत बांधण्याच्या कामाला लवकर सुरुवात होणार आहे. त्यामुळे मागील सात वर्षापासून कोपरखैरणे भागातील नागरीकांना आरोग्यविषयक कामासाठी वाशी संदर्भ व ऐरोली रुग्णालयात पायपीट करावी लागत आहे. मात्र आता नवीन इमारत बांधण्याच्या कामाची निविदा प्रकिया सुरू असल्याने लवकरच हे काम सुरु होणार आहे.
श्रीमंत महापालिका म्हणून समजल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिकेकडून शहरवासीयांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.आणि त्यासाठी मनपाने अद्ययावत रुग्णालये उभारली आहेत. मात्र शहरातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या कोपरखैरणे भागात मनपाचे कोपरखैरणे से. २२ येथील महापालिकेचे माता बालरुग्णालय होते. परंतु ती इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याने पाडण्यात आली. त्यामुळे मागील ७ वर्षांपासून कोपरखैरणे हा विभाग महापालिकेच्या आरोग्यसेवांपासून वंचित आहे. कोपरखैरणे से. २२ येथील महापालिकेचे माता बाल रुग्णालय नवीन बांधकामासाठी बंद करण्यात आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही बंद असलेली आरोग्य सुविधा आता लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर असून बहू प्रतिक्षित या माता बाल रुग्णालयाच्या नवीन बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकर येथील नागरिकांना आता विभागातच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.
कोपरखैरणे सेक्टर २२ येथे महापालिकेचे माता बाल रुग्णालय होते, परंतु ते मागील काही वर्षापासून बंद आहे. येथील अनेक गरोदर महिलांना ७ किमी अंतरावरील ऐरोली आणि ४ किमी अंतरावरील वाशी महापालिका रुग्णालय गाठावे लागत आहे. हे रुग्णालय बंद पडल्याने येथील नागरिकांना वाशी,नेरुळ, ऐरोली येथील पालिकेच्या सार्वजनिकरुग्णालयात ७ ते ८ किलोमीटरची पायपीट करून जावे लागत आहे. प्रसंगी खाजगी रुग्णालयाचा आधारही घ्यावा लागत आहे. हे माताबाल रुग्णालय नुतनीकरणाच्या फेऱ्यात अडकले होते. तर दरम्यानच्या कालावधीत महापालिकेने त्याच विभागात दुसरी आरोग्य सुविधायुक्त तयार इमारत खरेदी करण्याचे नियोजन आखले होते, परंतु त्या इमारतीत अनधिकृत बांधकाम आढळून आल्याने ती इमारत खरेदी करण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा कोपरखैरणे येथील माता बाल रुग्णालयाचा प्रश्न रेंगाळला होता. मात्र आता लवकरच या बहूचिर्चित रुग्णालयाची प्रतीक्षा संपणार आहे. या रुग्णालयाच्या नवीन बांधकामाची सुरुवात होणार असून सध्या हा प्रकल्प निविदा प्रक्रियेत आहे. त्यामुळे सदर इमारत पूर्ण होताच कोपरखैरणे भागातील रहिवाशांची आरोग्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे