सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी दुसर्यांदा पटकावला मास्टर महाराष्ट्र श्री चा बहुमान
नवी मुंबई : महामार्ग पळस्पे केंद्राचे प्रभारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी नुकत्याच पार पडलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत दुसर्यांदा मास्टर महाराष्ट्र श्री हा बहुमान पटकावला आहे. त्यामुळे सुभाष पुजारी यांच्यावर सर्वच थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात पाँडिचेरी येथे देश पातळीवर होणार्या ‘मास्टर भारत श्री’ स्पर्धेकरिता सुभाष पुजारी यांची निवड झाली असून त्या स्पर्धेत ते महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
महामार्ग पळस्पे पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये यापूर्वी मास्टर भारत श्री 2021 किताब, तसेच मास्टर महाराष्ट्र श्री 2021 शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे. तसेच त्यांनी उझबेकिस्तान येथे पार पडलेल्या 12 व्या वर्ल्ड बॉडीबिल्डींग व फिजिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ब्राँझ पदक मिळवून परकीय भूमीवर भारताचा झेंडा फडकावला आहे. त्यानंतर सुभाष पुजारी यांनी महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित मास्टर महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये 80 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून मास्टर महाराष्ट्र श्री चा किताब दुसऱ्यांदा पटकावला आहे. सुभाष पुजारी यांनी पोलीस खात्याची शान वाढविल्यामुळे त्यांच्यावर पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी, अंमलदार व मित्रपरिवार, नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पाँडिचेरी येथे पुढील आठवड्यात होणार्या शरीरसौष्ठव स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्यातर्फे सुभाष पुजारी हे सहभागी होणार आहेत व त्या स्पर्धेत ते महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. सुभाष हे पोलीस खात्यातील त्यांचे दैनदिन कर्तव्य सांभाळुन आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटूच्या मार्गदर्शनाखाली रोज 5 तास सराव करत आहेत.