आगरीकोळी युथ फाउंडेशनच्या भूमिकेमुळे शिवसेनेची कोंडी ?
नवी मुंबई -; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव व घरांना प्रॉपर्टी कार्ड देणाऱ्यांचे मतांचे दान, त्यासाठी आगरी कोळी युथ फाऊंडेशन स्वतःचे उमेद्वार मैदानात उतरविण्याचा पवित्रा आगरीकोळी युथ फाउंडेशनने घेतल्याने आगामी महापालिका निवडणूकित शिवसेनेची मोठी कोंडी होणार आहे.
नवी मुंबई शहरातील गावठाणातील घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे म्हणून २०१६ साली अध्यक्ष निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगरीकोळी युथ फाउंडेशनची स्थापना झाली आणि मार्च २०१७ साली घरांचे सर्वेक्षण करून घरांना प्रॉपर्टी कार्ड द्यावे म्हणून मोठं जन आंदोलन अध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभे झाले होते.आणि यात नवी मुंबईतील सर्व भुमीपुत्रांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे म्हणून भुमीपुत्रांची मागणी असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली आणि सिडकोने तसा ठराव ही मंजूर केला. परत एकदा विमानतळाच्या नावासाठी साखळी आंदोलन, सिडको घेराव ते काम बंद आंदोलन अशी आंदोलने झाली. मात्र नामकरण बाबत अजुनही ठोस लेखी आश्वासन मिळाले नाही. भूमीपुत्रांच्या मागणीची दखल घेतली जात नाही म्हणून याआधी फाउंडेशनच्या माध्यमातून लोकसभा निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. मात्र आता आपल्या मागण्या घेऊन आगामी महापालिका निवडणूकिवर फाउंडेशनने लक्ष केंद्रित केले आहे. यात घरांना प्रॉपर्टी कार्ड व विमानतळाला दि बा पटील यांचे नाव त्यालाच देणार मतांचे दान असे कॅम्पेन समाज माध्यमातून राबवले जात आहे. परंतु जर सत्ताधाऱ्यांनी या मागण्यांची वेळीच दखल नाही घेतली तर आगरीकोळी युथ फाउंडेशन आगामी मनपा निवडणूकित आपले उमेदवार उतरवणार आहेत. मनपा निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीने होणार असून २० प्रभागात भुमीपुत्रांचे प्राबल्य असून त्याचा थेट परिणाम ५३ जागांवर होणार आहे.आगरी कोळी युथ फाउंडेशन सोबत नवी मुंबई शहरातील तरुणांची मोठी फळी आहे. आणि जर फाउंडेशन निवडणूकीच्या मैदानात उतरली तर त्याचा सर्वाधिक फटका सेनेच्या भुमिपुत्र उमेदवारांना होणार आहे. कारण विमानतळाला सेना प्रमुखांचे नाव देण्याची मागणी एकनाथ शिंदे यांची होती.