आरपीआय नेते जगदिश गायकवाड यांच्या तडीपार आदेशाचा जाहीर निषेध

पनवेल ः लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, यासाठी सुरु असलेल्या चळवळीत प्रामुख्याने सहभागी असलेले ‘आरपीआय’चे कोकण प्रांत अध्यक्ष आणि ‘पनवेल’चे माजी उपमहापौर जगदिश गायकवाड यांना पोलिसांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेल्या तडीपारीच्या आदेशाचा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समिती तर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे. त्या संदर्भातील निषेधाचे पत्रक समिती द्वारे काढण्यात आले आहे.

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र एकत्र झाला आहे. या आंदोलनात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. त्याप्रमाणे ‘आरपीआय’चे नेते जगदिश गायकवाड देखील सहभागी आहेत. त्यांनी या चळवळीत बहुजन समाजाचे प्रश्न हिरीहिरीने मांडले. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठीची चळवळ अधिक फोफावली, असे असताना सदर चळवळ चेपण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पोलिसांच्या माध्यमातून जगदिश गायकवाड यांच्या तडीपारीचा आदेश काढला. या तडीपार आदेशाचा लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ सर्व पक्षीय कृती समिती जाहीर निषेध करीत असून लवकरच राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांची या संदर्भात भेट घऊन त्यांना सदर आदेश रद्द करणारे निवेदन देण्यात येणार आहे, असे ‘लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ सर्व पक्षीय कृती समिती’चे अध्यक्ष दशरथ पाटील आणि कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिकेकडून र्निबंधांमध्ये शिथीलता